घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रखरेंचे खोटे कारनामे : खरेच्या काळात जिल्हा उपनिबंधक कार्यालयात "रात्रीस खेळ चाले"

खरेंचे खोटे कारनामे : खरेच्या काळात जिल्हा उपनिबंधक कार्यालयात “रात्रीस खेळ चाले”

Subscribe

समको बँकेचे निकाल दिले रात्री 12.45 वाजता

नाशिक : सटाणा मर्चन्ट्स बँकेची निवडणूक बेकायदेशीर आणि नियमबाह्य पद्धतीने केल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या लाचखोर उपनिबंधक सतिश खरे याचे अनेक उद्योग उजेडात आले आहे. खरे याने समको बँकेच्या फारकतींवरील निकाल रात्री 12 वाजता दिल्याने एकुणच समको बँकेची निवडणूक प्रक्रिया संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक कार्यालयात अनेकदा ‘रात्रीस खेळ चाले’त असल्याचे स्पष्ट होत आहे.

सटाणा मर्चंट्स बँकेच्या निवडणुकीत लाचखोर उपनिबंधक सतीश खरे याने बेकायदेशीर पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबविल्याचा आरोप करुन बँकेचे सभासद मयूर अलई यांनी थेट न्यायालयात तक्रार दाखल केली. या निवडणुकीत खरे याने कोणत्या पद्धतीने शासकीय नियमांची पायमल्ली केली याचा लेखाजोखा अलई यांनी आपल्या तक्रारीत मांडला आहे. यातून खरे याने आपल्या मर्जीतल्या उमेदवारांच्या पॅनलला निवडून येण्यासाठी कशी मदत केली हे स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

मयूर अलई यांनी केलेल्या तक्रारीत निवडणुकीचा कार्यक्रम सार्वजनिक व शासकीय सुट्या वगळता राबविण्याचे आदेश होते. उमेदवारी अर्जांची छाननी 20 मे 2022 रोजी ठेवण्यात आली होती. त्या दिवशी शुक्रवार होता. शनिवार व रविवार या दिवशी शासकीय सुट्या असल्याने निवडणुकीचे कामकाज होणे अपेक्षित नव्हते. असे असताना खरे आणि निवडणूक निर्णय अधिकारी सुजय पोटे यांनी संगनमताने सार्वजनिक सुटीच्या दिवशी कार्यालयीन वेळ संपल्यानंतर रात्री 11.45 वाजता समको बँकेच्या हरकतींवरील निर्णय दिले.

खरे याची दादागिरी एवढी वाढली होती की काहीही केले तरी आपले कुणीच काही करू शकत नाही, अशी त्याची धारणा झाली होती. म्हणूनच नाशकातील एका माजी मंत्र्याचा एकेरी उल्लेख करत मंत्रीदेखील आपल्या खिशात आहे, असे तो मोठ्या अविर्भावात सांगत होता. म्हणूनच की काय सहकार क्षेत्रातील अनेक निकाल त्याने बेकायदेशीरपणे देऊन मोठी माया जमविल्याचे बोलले जाते.

- Advertisement -

बेकायदेशीर कामकाज अनेकदा रात्रीच्या वेळी होत असल्याची माहिती समोर आली आहे. समको बँकेच्या हरकतींवरील निकालही रात्रीच्या वेळेत दिल्याने यानिमित्ताने खरेचे रात्रीचे उद्योग उघडकीस आले आहेत. या सर्व प्रकारांमुळे समको बँकेची निवडणूक वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. त्यामुळे निकालांव्यतिरिक्त उपनिबंधक कार्यालयात रात्री काय काय चालत होते याचा तपास करण्याची मागणी होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -