घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रखरेंचे खोटे कारनामे : जिल्हा बँक दिवाळखोरीत आणली; हिटलरशाहीने १६ कर्मचाऱ्यांचे राजीनामे,...

खरेंचे खोटे कारनामे : जिल्हा बँक दिवाळखोरीत आणली; हिटलरशाहीने १६ कर्मचाऱ्यांचे राजीनामे, ५ जणांचा हृदयविकाराने मृत्यू

Subscribe

नाशिक : तब्बल ३० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर जिल्हा उपनिबंधक सतीश खरेचे खोटे कारनामे उघडकीस येत आहेत. नाशिक जिल्ह्याची अर्थवाहिनी समजल्या जाणार्‍या जिल्हा बँकेच्या दिवाळखोरीला खरेच जबाबदार असून त्यांच्या जाचाला कंटाळून १६ कर्मचार्‍यांनी राजीनामे दिले तर, ५ जनांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. याबाबत जिल्हा बँकेच्या कर्मचारी संघटनेने सहकार आयुक्तांकडे तक्रार केली आहे. बँकिंग क्षेत्राचा कुठलाही अनुभव नसताना खरे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र खरे यांची कारकिर्द बँकेतही वादग्रस्तच ठरली.

याप्रकरणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचारी संघटनेने सन २०१९ मध्ये सतीश खरे यांच्या कारभाराबद्दल तक्रार केली होती. यामध्ये खरे यांच्या कारभाराविषयी गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहे. 21 जून 2018 ते 10 ऑगस्ट 2020 या कार्यकाळात सतीश खरे जिल्हा बँकेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. बँकिंग क्षेत्रातील कुठलाही अनुभव नसताना खरे यांची इतक्या मोठ्या पदावर नियुक्ती करण्यात आली. मुळात ही नियुक्तीच चुकीची असल्याचे संघटनेने म्हटले आहे. खरेंच्या अज्ञानाचा फटका केवळ बँकेलाच नाही तर येथे कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांनाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. खरेंच्या बेजबाबदार कारभारामुळे बँकेची परिस्थिती डबघाईला आली.

- Advertisement -

खरे यांनी कधीही बँकेच्या कामकाजात प्रत्यक्षात उपस्थित राहून लक्ष घातले नाही. बँकेचा कारभार ते नेहमी घरातूनच करीत असत. बँकेचे अध्यक्ष ज्यावेळी बँकेत येतील त्याच वेळी खरे बँकेत उपस्थित रहात होते. बँकेच्या कारभाराविषयी कुठलीही माहिती नसल्याने खरे यांनी बँकेच्या अनेक महत्त्वाच्या विषयांना बगल दिली. त्यामुळे बँकेचे अतोनात नुकसान झाले.

नाबार्ड, रिझर्व्ह बँक, सहकार आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय सहनिबंधक कार्यालय महत्त्वाच्या बैठकींना खरे यांनी कधीच हजेरी लावली नाही. खरे त्यांच्या हिटलरशाहीमुळे बँकेतील १६ कर्मचार्‍यांनी राजीनामे दिले तर, ५ कर्मचार्‍यांचा हृदयविकारामुळे मृत्यू झाला. त्यामुळे खरे यांना मूळ सेवेत पाठवावे, अशी मागणी कर्मचारी संघटनेने दिलेल्या तक्रारीत केली आहे. त्यामुळे खरे यांच्या जिल्हा बँकेच्या कारभाराची चौकशी करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -
मनमानी कारभारामुळे वसुलीवर परिणाम

खरे हे कधीही कर्मचारी आणि अधिकार्‍यांशी सौजन्याने वागले नाहीत. खरेंकडून कर्मचार्‍यांचा नेहमीच पानउतारा होत असल्याने बँकेत खरेंविषयी दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. संचालक मंडळाच्या बैठकीत देखील खरे हे दीड तासाच्या वर कधीही बसले नाही. बहुसंख्य विषयावर खरे यांनी सह्या न केल्याने अनेक महत्त्वाचे विषय अद्याप प्रलंबित आहेत. खरे यांच्या उर्मटपणाचा ‘प्रसाद’ प्रत्येकालाच मिळाला आहे. त्यांच्या मनमानी कारभारामुळे बँकेच्या वसुलीवरही त्याचा मोठा परिणाम झाला. खरे यांनी ६ मे २०१९ रोजी ऐन आचारसंहितेच्या काळात तब्बल ८२ प्रथमश्रेणी अधिकार्‍यांच्या पदोन्नतीच्या नावाखाली बदल्या केल्या. याच अधिकार्‍यांनी कर्जवाटप केले होते. याचाच फटका बँकेच्या वसुलीवर पडला. खरे यांच्या कारभारामुळे संपूर्ण जिल्हाभर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे बँक आर्थिक दिवाळखोरीत सापडल्याचा आरोप कर्मचारी संघटनेने केला आहे.

तक्रारी असल्यास करा ‘आपलं महानगर’शी संपर्क

जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांच्या लाचखोरीची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून झडत होती. परंतु, त्यांचे हात एवढ्या वरपर्यंत पोहोचलेले होते की, त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नव्हती. आता मात्र खरेंचे खोटे कारनामे पुढे येत आहेत. या संदर्भात ‘आपलं महानगर’मध्ये बुधवार (दि. १७)पासून ‘खरेंचे खोटे कारनामे’ ही वृत्त मालिका सुरु झाली आहे. खरेंच्या कारनाम्यांसदर्भात पुराव्यांसह माहिती असल्यास ९९७५५४७६१६ या क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती देणार्‍याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -