घरमहाराष्ट्रKharghar incident : पैसे वाटून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न? संजय राऊत यांचा...

Kharghar incident : पैसे वाटून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न? संजय राऊत यांचा दावा

Subscribe

मुंबई : माणसांच्या जीवाची सध्या कोणालाही किंमत नाही व पातळी घसरलेल्या राजकारणाने तर सध्या मरण सगळ्यात स्वस्त केले. ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) सोहळा खारघरला भरदुपारी रणरणत्या उन्हात पार पडला. उष्माघाताने व चेंगराचेंगरीने 14 जीवांचे बळी गेले. हे सर्व प्रकरण पैसे वाटून मिटवण्यासाठी इस्पितळात व मृतांच्या घरी कोणाचे लोक पोहोचले? असा सवाल करत, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Home Minister Devendra Fadnavis), कृपया चौकशी करा, असे आवाहन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केले आहे.

‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळा भरदुपारी रणरणत्या उन्हात पार पडला. राजकारणी, श्रीमंतांच्या खाशा स्वाऱ्यांसाठी थंड मंडप आणि सावलीतले व्यासपीठ उभे केले व लाखोंचा जनसागर उन्हात. त्यात मुले, महिला, वृद्ध वगैरे 42 डिग्री तापमानात उघड्यावर होते. पुन्हा श्रीमंतांची भाषणे लांबत गेली आणि उष्माघाताने व चेंगराचेंगरीने 14 जीवांचे बळी गेले. हा आकडा खरा नाही. सरकारी बेफिकिरीचे हे बळी, पण सरकारला आता देवाचे स्थान. कारण गरीबांना सरकार देते. त्यामुळे मृत्यूही सरकारने दिला. मग 14 निरपराध्यांच्या मृत्यूबद्दल सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सरकारवर का दाखल होऊ नये? असा सवालही ‘सामना’ दैनिकातील ‘रोखठोक’ सदराद्वारे संजय राऊत यांनी केला आहे.

- Advertisement -

अमित शाहांकडून पाठ थोपटून घेण्यासाठी…
खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ सोहळ्याच्या निमित्ताने लाखोंची गर्दी जमवून गृहमंत्री अमित शाहांकडून पाठ थोपटून घ्यायची, हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजकीय स्वार्थ होता, हे दुसरे. पुलवामा आणि खारघर या दोन्ही दुर्घटनांत निरपराध मारले गेले, असा ठपकाही त्यांनी ठेवला आहे.

फडणवीसांसह भाजपा गप्प
गेल्या पंधरा दिवसांत सरकारपुरस्कृत सदोष मनुष्यवधाची दोन प्रकरणे समोर आली. ‘पुलवामा’ येथे 2019 साली घडलेल्या 40 जवानांचे हत्याकांड हे मोदी सरकारच्या निष्क्रियतेचे बळी होते. राजकीय फायद्यासाठी ‘पुलवामा’ हत्याकांडाचा वापर भाजपाने केला, हे पहिले. दुसरे प्रकरण खारघरचे आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दोन्ही बाबतीत सरकारकडून घडला. पण भाजपा दुटप्पीपणा करीत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पालघरला जमावाकडून तीन साधूंचे हत्याकांड झाले. त्यामुळे ठाकरेंच्या राज्यात हिंदुत्वाची हत्या झाली, अशी बोंब देशभरात मारून एक वातावरण निर्माण केले गेले. विरोधी पक्षनेते तेव्हा देवेंद्र फडणवीस होते व त्यांनी साधूंच्या हत्येबद्दल सरकारला जबाबदार धरून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली. डहाणूच्या गडचिंचले गावात जेथे साधू मारले गेले तेथे फडणवीस यांच्यासह संपूर्ण भाजपची जत्राच उसळली होती, पण आता खारघरमध्ये जे 14 श्री सेवक मारले गेले ते झुंडीचेच बळी होते. हे 14 जण हिंदुत्वाच्या कार्यासाठीच खारघरला आले होते व सरकारी बेफिकिरीचे बळी ठरले. मात्र या हत्याकांडावर फडणवीस आणि त्यांच्या भाजपाची संपूर्ण ‘तीर्थयात्रा’ गप्प आहे, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.

- Advertisement -

मोदी यांचा मौनी बाबा नक्की का झाला?
पालघरच्या तीन साधू हत्याकांडावर जो भाजपा व त्यांचे मंत्री उसळून उठले ते खारघरच्या ‘साधक’ बळींवर गप्प आहेत. पुलवामा हल्ल्याबाबत तर त्यांची दातखिळीच बसली आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी नोटाबंदीच्या अपयशावर आणि रांगेतल्या शेकडो बळींवर बोलत नाहीत, मोदी अदानींच्या घोटाळ्यावर बोलत नाहीत व जे मोदी सर्जिकल स्ट्राइकच्या फटाकेबाजीवर जाहीर सभांतून बोलत राहिले, ते मोदी पुलवामाच्या निर्घृण हत्याकांडावर जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जो स्फोट केला, त्यावरही बोलत नाहीत. मोदी यांचा मौनी बाबा नक्की का झाला? त्यांच्या जिभेला असा मौनाचा आजार का जडला? असा ‘रोखठोक’ सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -