तीन दिवसांपूर्वी झालेल्या मुलांच्या वादातून महिला व युवकांच्या टोळक्याने एका तरुणाच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून धारदार हत्याराने वार करत निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.२४) रात्री 9.30 वाजेच्या सुमारास विडी कामगार नगर परिसरातील स्वामी समर्थ केंद्राजवळ घडली. पोलिसांनी दोन हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे. फरार पाच जणांच्या मागावर आडगाव पोलीस आहेत. विशांत उर्फ काळू राजाराम भोये (वय २४, रा. बिडी कामगार नगर, स्वामी समर्थ केंद्राजवळ, पंचवटी) असे मृत तरुणाचे नाव आहे. नितीन ऊर्फ विक्की पंजाबराव पवार असे अटक केलेल्याचे नाव आहे. (Killed with a sharp weapon by throwing chilli powder in the eyes of the youth)
पोलिसांनी दिलेल्या माहितेनुसार व प्रशांत राजाराम भोये यांच्या फिर्यादीनुसार, विशांत उर्फ काळू राजाराम भोये याने शुक्रवार (दि.२२) रोजी किशोरवयीन मुलांच्या झालेल्या भांडणावरून मच्छिंद्र जाधव याच्या मुलाला मारहाण केली होती. या मारहाणीचा राग डोक्यात ठेवून संशयित मच्छिंद्र जाधव याचा अल्पवयीन मुलगा नितीन ऊर्फ विक्की पंजाबराव पवार, मच्छिंद्र उत्तम जाधव, मंदा मच्छिंद्र जाधव, रेखा रवींद्र मोहिते, गोरख उत्तम जाधव, सूरज रवींद्र मोहिते (सर्व रा. विहंग सोसायटी, बिडी कामगार नगर) यांनी रविवार (दि. २४) रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास विशांत भोये याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये संशयित रेखा मोहिते आणि मंदा जाधव यांनी पहिले विशांत याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. विशांत खाली वाकून डोळे चोळू असतानाच संशयित हल्लेखोरांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मच्छिंद्र जाधव याने धारदार हत्याराने विशांतवर वार केले. विशांतच्या अंगावर धारदार चाकूने अनेक वार करण्यात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मयताचा भाऊ प्रशांत राजाराम भोये, (वय २८, रा. बिडी कामगार नगर) याच्या फिर्यादीवरून संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एक अल्पवयीन आणि नितीन पवार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
वाहनांच्या जाळपोळीेची माहिती मिळताच आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांनी पोलीस कर्मचार्यांसोबत घटनास्थळी धाव घेत काही संशयितांना ताब्यात घेतले. फरार झालेल्या संशयितांच्या मागावर पोलीस पथके पाठवली. खूनाच्या या घटनेमुळे विडी कामगार नगर परिसरात खळबळ उडाली आहे. तर महिन्याभरापूर्वी अमृतधाम परिसरात टोळ्यांकडून असाच युवकावर हल्ला झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक उरला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
खूनाच्या घटनेनंतर विडी कामगारनगरमध्ये वाहनांची जाळपोळ
विशांत भोयेचा खून झाल्याची माहिती मिळताच त्याच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींनी संशयित चालवीत असलेल्या दोन रिक्षांना आग लावून दिली. या आगीमध्ये दोन रिक्षा (एम. एच. १५ इ. एच. ५७५६) आणि (एम. एच. १५ एफ. यु. ४६४१) जळून खाक झाल्या. शेजारी उभ्या असलेल्या आयशर ट्रक (एम. एच. ०४ इ. एल. ९५१२)चे नुकसान झाले. तसेच, जमावाने रिक्षांची जाळपोळ केल्यानंतर परिसरातील आयशर (एम. एच. ४३ वाय. २०६४), पिकअप (एम. एच. १५ डी. के. ६२२७), छोटा हत्ती (एम. एच. ०५ डी. के. २६१३) या वाहनांच्या काचा फोडत नुकसान केले.
रास्ता रोकोमुळे तणाव
विशांत भोये याच्या अंत्यविधीसाठी जमलेल्या मित्रमंडळींनी सोमवार (दि. २५) विडी कामगार चौकात हातात मयत विशांत याचे फलक घेऊन एकत्र येत रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या परिसरात काहीकाळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांनी आंदोलकांची समजूत काढत त्यांना रस्तारोको करण्यापासून रोखले. त्यामुळे तणावमय परिस्थिती नियंत्रणात आली.
पोलिसांसह दंगल नियंत्रण पथक तैनात, दिवसभर बंदोबस्त
विशांत भोये खूनाच्या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाल्याने सहायक पोलीस आयुक्त पद्मजा बढे, आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच, क्यूआरटी, दंगा नियंत्रण पथक यांच्यासह विविध पोलीस ठाण्यातील पुरुष आणि महिला पोलिसांचा सशस्त्र फौजफाटा तैनात करण्यात आला होते.