फळांचा राजा हापूस आंब्याची पहिली पेटी मुंबईत दाखल; एवढी आहे किंमत

आंबा बागायतदारांनी आपल्या बागेतील हापूस आंब्याचे पीक नैसर्गिक पद्धतीने घेतले आहे.

फळांचा राजा अशी ओळख असलेलया हापूस आंब्याचा सुगंध आता बाजारात दरवळू लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील कातवण मधील आंबा बागायतदार दिनेश दीपक शिंदे आणि प्रशांत सिताराम शिंदे या दोन तरुण आंबा बागायतदारांनी आपल्या बागेतील हापूस आंब्याचे पीक नैसर्गिक पद्धतीने घेतले आहे. त्यांनी देव दिवाळी आणि मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारचा मुहूर्त साधत आंबा काढण्याचा शुभारंभ केला असून आंब्याची पहिली दोन डझनची पेटी नवी मुंबई मधील वाशी मार्केट येथील व्यापारी अशोक हांडे यांच्या पेढीवर आज पाठविली आहे.

Devgad Alphonso

कातवण येतील आंबा बागायतदार प्रशांत शिंदे आणि दिनेश शिंदे यांच्या गोरक्ष गणपती मंदिर या ठिकाणी असलेल्या घरानजीकच्या बागेत असलेल्या हापूसच्या कलमांना १५ ऑगस्ट २०२२ पासूनच मोहोर यायला सुरुवात झाली होती. पण, काही कलमावर आलेला मोहोर गळून पडला. तर चार ते पाचकलमांवरचा मोहोर तसाच टिकून राहिला. तो टिकवण्यासाठी शिंदे बंधूंनी मेहनत घेतली. त्यामुळे या चार कलमांवर मिळालेल्या आंब्याचे पहिले फळ काढून देवगड हापूसची पहिली पेटी आज मार्गशीर्ष महिन्याच्या सुरुवातीला या पेटीची विधिवत पूजा करून ही पेटी वाशी येथे जाण्यासाठी रवाना करण्यात आली.

ही आंबा पेटी दोन डझनची आहे. साधारणतः सात ते आठ हजार रुपयांच्या जवळपास भाव मिळेल असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र यावर्षी आंब्याचा सिझन पाहता अजूनही हापूसच्या कलमांना पालवी येत आहे मात्र अशावेळी हापूसच्या कलमांची योग्य निगा राखत पहिली पेटी या दोन तरुण आंबाबागायदारांनी पाठविली आहे. ऋतूयामध्ये सतत बदल होत असून देखील या दोन बंधूंनी आंब्याचा मोहोर टिकविण्यासाठी प्रयत्न केले. या वेळी आलेल्या आंबा पिकाची चव देखील स्वतः चाखून पहिली आणि त्यांनंतरच इतर आंबे काढत ही पेटी आज मुंबईला पाठविली आहे.


हे ही वाचा – सीमावादात कुणीही पक्षाचा वाद आणू नये; फडणवीसांचा शरद पवारांना टोला