हिंदू मनाचा राजा……

हिंदुत्वाची बुलंद तोफ, महाराष्ट्राची आन-बान-शान , तरुणांचे प्रेरणास्थान.. महाराष्ट्राचे भाग्यविधाते… मराठी ह्दय सम्राट.. प्रख्यात व्यंगचित्रकार.. मराठी मनाचा मानबिंदू ही सगळी विशेषणे आजच्या घडीला एकाच नेत्याला तंतोतंत लागू होतात. हे नेतृत्व म्हणजे राजसाहेब ठाकरे महाराष्ट्रातच नव्हे तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यांच्याची नावाची नेहमीच चर्चा असते असे व्यक्तीमत्व म्हणजे राजसाहेब !

‘जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवायचाय’ हे राजसाहेब ठाकरेंचे ब्रिद आहे आणि त्यानुसारच मनसेची वाटचाल सुरू आहे.

अंकुश अरुण पवार । नाशिक 

हिंदू ह्दयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांचे बोट धरुन मा. राजसाहेब ठाकरे राजकारणात आले. आक्रमक भाषा आणि भूमिका याच्या बळावर हिंदूहदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. या ठाकरी बाण्याचा वारसा खर्‍या अर्थाने पुढे चालवला तो राजसाहेबांनी. अनेक जुन्या लोकांना राजसाहेबांत बाळासाहेबांची छबी दिसते. तोच आक्रमकपणा, तिच ओघवती शैली राजसाहेबांत दिसते. प्रारंभी शिवसेनेत आणि त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वत:चा पक्ष स्थापन करुन राजसाहेबांनी वेगळा ‘राजमार्ग’ चोखाळला. स्वत:चा पक्ष स्थापन करुन त्याचा डंका जगभर वाजवणे ही सोपी गोष्ट नाही. पण राजकारणाचं बाळकडू प्यालेल्या राजसाहेबांनी कुणाचीही तमा न बाळगता हिंदूंच्या आणि मराठीच्या अस्मितेचे मुद्दे कायम पुढे तेवत ठेवले. राजसाहेबांचे व्यक्तीमत्व आणि राजकारणाची शैली याविषयी मी काही लिहीणे हे लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखे होईल. पण साहेबांचे राजकारणाच्या पलीकडे एक असे व्यक्तिमत्व आहे ज्याची ओळख आपल्या सर्वांनाच असायला हवी असे मला वाटते.

साहेबांचा करारी बाणा हा सर्वपरिचित आणि सर्वत्र चर्चेचा मुद्दा असतो. ‘डंके की चोट पर’ ते मुद्दे मांडतात.. त्या मुद्यांप्रमाणे कृतीही करतात. म्हणूनच त्यांच्याविषयी सर्वत्र आदरयुक्त दहशत तयार झाली आहे. पण खरं तर ते फणसासारखे आहेत. वरुन कितीही काटेरी वाटत असले तरीही आतून मृदू आहेत. साहेबांचा आणि माझा जुना परिचय. मनसेच्या स्थापनेनंतर मी त्यांच्या संपर्कात आलो. त्यांच्या आशिर्वादाने मी पक्षाचे काम करु लागलो. ते केवळ मार्गदर्शन करत नाहीत तर कुटुंबप्रमुखाप्रमाणे मनसैनिकांची ते काळजी देखील घेतात. याचाच अनुभव वेळोवेळी आला. आमच्यासारख्या मनसैनिकांच्या वैयक्तिक समस्या असो वा पक्षीय वाद ते जातीने त्यात पडतात आणि ती समस्या आणि वाद कसे सोडवता येईल यावर भर देतात. अनेकांना वैद्यकीय कारणास्तव साहेबांनी घरच्या सदस्याप्रमाणे मदत केली आहे. महत्वाचे म्हणजे त्यासाठी साहेब मुंबईत मनसेची यंत्रणा उभी करतात. नेता असावा तर असा. कुटुंबाप्रमुखाप्रमाणे कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा.

खरे तर, राजकारणात असलेल्या व्यक्तींची जनसामान्यांच्या मनात काय प्रतिमा आहे, ही अत्यंत महत्वाची बाब असते. कळत-नकळत ही प्रतिमा नकारात्मक होत गेल्यास लोकांचा ओढाही कमी-कमी होत जातो. तसं पाहिलं तर राजसाहेबांकडे कोणतीही राजकीय सत्ता नाही की पद नाही. तरीही परिस्थितीने भेदरलेले लोक राजसाहेबांची भेट घेऊन गार्‍हाणे मांडतात. लॉकडाऊन काळात ‘याची देही याची डोळा’ अनुभव आला. मंदिरातील पुजारी असो वा वारकरी, चित्रपट कलाकार असो वा मूर्तीकार, बडे उद्योजक असो वाशेतकरी, मंडप डेकोरेटर्स असो वा इव्हेंट मॅनेजर, जीम मालक असो वा मुंबईचे डबेवाले, डॉक्टर असो वा कोळी महिला, वीजबिल ग्राहक असो वा सरकारी कर्मचारी सगळ्यांनीच कृष्णकुंजवर भेट घेऊन आपली व्यथा मांडली. कारण सगळ्यांनाच विश्वास होता की साहेबांच्या निवासस्थानी न्याय हा मिळतोच. देवस्थानी जाऊन भक्त जशी आपली गार्‍हाणी मांडतो आणि सारे सुखरुप होण्याची मनोकामना करतो तशी मनोकामना राजसाहेबांसमोर विविध घटकांतील लोक करताना संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली. हे कशामुळे होते? साहेबांवरील विश्वासामुळे. म्हणूनच साहेबांना जननायक असं संबोधलं जातं.

नाशिकमध्ये आल्यावरही ते प्रत्येक कार्यकर्त्याची आस्थेवाईकपणे चौकशी करतात. प्रतिस्पर्धी पक्षातील कोणा लोकप्रतिनिधीचे निधन झाले तर त्या जागेवर होणारी पोटनिवडणूक लढण्यासाठी साहेब उत्सूक कधीच नसतात. यातून त्यांचा समंजसपणा आणि दिलदारपणा दिसून येतो. राजकारणात असा दिलादारपणा अभावानेच बघायला मिळतो. साहेबांच्या व्यक्तीमत्वाचे वैशिष्ठ्य म्हणजे त्यांना योग्य मुद्दा कोणता हे ओळखण्याची जाण आहे. सचिन तेंडूलकर जसा क्रिकेटमध्ये टायमिंग शॉट खेळायचा, तसाच राजकीय मैदानात साहेब टायमिंग शॉट मारतात. त्यांची वेळ कधीच चुकत नाही. अशा या बेधडक नेत्याचा आज वाढदिवस. हा वाढदिवस एका संघर्षमय नेतृत्वाचा आहे. हिंदू आणि मराठी अस्मितेवर होणार्‍या प्रत्येक हल्ल्याचा स्वत:च्या निधड्या छातीवर घेणार्‍या एका सक्षम मराठी जननायकाचा आहे. दरवर्षी आम्ही त्यांच्या वाढदिवशी मुंबईतील निवासस्थानी शुभेच्छा द्यायला जातो. त्यांचे मार्गदर्शन घेतो. मात्र, यंदा मात्र साहेबांच्या प्रकृतीच्या कारणास्तव आम्ही स्थानिक पातळीवरच विविध समाजोपयोगी कामे घेऊन त्यांचा वाढदिवस साजरा करणार आहोत. ज्यांनी मला नाव दिलं. ज्यांनी मला उभं रहायला शिकवलं.. ज्यांनी मला बिकट काळात आधार दिला, ज्यांनी मला समाजात ताठ मानेनं उभं केलं, त्या माझ्या साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
साहेबांना दिर्घायुष्य लाभो आणि त्यांनी पाहिलेले महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होवो ही परमेश्वरचरणी प्रार्थना !

राजसाहेबांनी उचललेले मुद्दे आणि त्याचे परिणाम

  • रेल्वे परीक्षांमधे उत्तर भारतीयांनाच का घेतले, हा मुद्दा राजसाहेबांनी उचलला. तेव्हा मोठ्या संघर्षानंतर मराठी तरुणांना रेल्वेत स्थान मिळाले.
  • जेट ऐअरवेजमधील कार्माच्यार्‍यांना कामावरून कमी करण्यात आले, तेव्हा हे सर्व कर्मचारी राज साहेबांना भेटले. साहेबांनी या सर्व कार्माच्यार्‍यांना पुन्हा कामावर रूजू करून घेण्यास फर्मावल्याने या सर्वांची नोकरी वाचली होती.
    मनसेची टोलनाक्यांवरील आंदोलने गाजली. या आंदोलनानंतर ६४ ते ७० टोलनाके बंद झालेत.
  • मुंबईत बॉलिवडूमध्ये पाकिस्तानी कलावंत येत होते. त्यांना देशातून हाकलून दिलं. त्यानंतर स्थानिक कलावंतांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झालीच; शिवाय पाकिस्तानलाही अद्दल घडली.
  • भोंगे उतरावेत, यासाठी अलिकडे जे आंदोलन झाले त्याचा परिणाम म्हणजे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील बहुसंख्य मशिदीवरील भोंगे उतरवण्यात आले. त्यामुळे परिसरातील जनतेला शांतता लाभतेय.
  • लॉकडाऊनमध्ये मंंदिरे बंद होती. या विरोधात मनसेने आंदोलने केलीत आणि त्याचा परिणाम म्हणजे काही काळातच मंदिरे उघडली गेली.

 

संवेदनशील अन् सहृदय नेता

गेल्या वर्षीच्या प्रसंगाचाही मी आवर्जून उल्लेख करेल. तेव्हा तौकी चक्रीवादळाचा पश्चिम किनारपट्टीला जोरदार तडाखा बसला. यात समुद्र किनार्‍याजवळ मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वसई येथील एका वृद्धाश्रमालाही वादळाचा फटका बसला. न्यू लाइफ फाऊंडेशनच्या वृद्धाश्रमाचे चक्रीवादळाने मोठे नुकसान झाले. याच वृद्धाश्रमात राजसाहेबांच्या शिक्षिका सुमन लक्ष्मीकांत रणदिवे राहत होत्या. त्यांचे हाल होत असल्याचे साहेबांना समजल्यानंतर काही तासांत त्यांच्यापर्यंत मदत पोहोचली. अमित साहेबांनी रणदिवे आजींशी संवाद साधत वृद्धाश्रमातील २९ जणांना सुरक्षित ठिकाणी हलवले. अशी मदत देवदूताशिवाय कोण करणार ?

कुटुंबप्रमुखाची भूमिका निभावतात तेव्हा..

मनसेच्या सैनिकांसाठीही साहेब जीव की प्राण आहेत. आपल्या कार्यकर्त्यांवर केसेस पडल्या तर साहेब स्वत: त्यात जातीने लक्ष घालतात. काही महिन्यांपूर्वी मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी मनसैनिकांनी केलेल्या आंदोलनात आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर ठिकठिकाणी गुन्हे दाखल झालेत. साहेबांनी यात स्वत: जातीने लक्ष घालत वकीलांची फौज उभी केली. प्रत्येकाला जामीन मिळवून दिला आणि केसचीही जबाबदारी घेतली. मुंबईतील फेरीवाल्यांच्या आंदोलनानंतर ते स्वत: पोलीस स्टेशनवर गेले आणि तिथल्या कार्यकर्त्यांनाही बिनधास्त रहा; मी आहे सोबत’ हा संदेश दिला. या प्रसंगाची क्लिपदेखील व्हायरल झाली. साहेब कुटुंबप्रमुखाची भूमिका नेहमीच निभवतात आणि म्हणूनच इतर पक्षातील कार्यकर्त्यांपेक्षा मनसैनिकांना आपला पक्ष आणि त्याचा नेता अधिक हवाहवासा वाटतो.

 

(लेखक मनसे नाशिक जिल्हाध्यक्ष आहेत)