अजित पवार तुमचा जरंडेश्वर साखर कारखान्याशी संबंध काय?; किरीट सोमय्यांचा सवाल

BJP leader kirit somaiya

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जरंडेश्वर साखर कारखान्यावरुन हल्लाबोल केला आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याचा मालक, चालक आणि लाभार्थी कोण? अजित पवार तुमचा जरंडेश्वर साखर कारखान्याशी संबंध काय? अशी प्रश्नांची सरबत्ती सोमय्या यांनी केली. सोमय्या यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत अजित पवार यांना लक्ष्य केलं.

कारखान्याच्या इथे मला शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ भेटलं. २७ हजार शेतकरी भागदारक त्यांना हा प्रश्न आहे की जरंडेश्वर साखर कारखान्याचा मालक, चालक आणि लाभार्थी कोण? अजित पवार हे उत्तर न देता हिन राजकारण करतात असं बोलतायत. राजकारण राजकाणाच्या जागेवर, अर्थकारणावर बोला ना, असं सोमय्या म्हणाले.

पवार कुटुंबाने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष, नामी-बेनामी किती साखर कारखाने…महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून जेव्हा त्यांचं केंद्रात आणि राज्यात सरकार होतं तेव्हा किती कर्ज घेतलं? त्यात किती शेतकरी होते आणि शेतकऱ्यांचे किती भागदार होते? त्यांनी दिलेल्या जमींनीचं काय केलं? अशी प्रश्नांची सरबत्ती केली.

जरंडेश्वरच्या सातबारा काढण्याचा प्रयत्न केला

“अजित पवार यांच्या जरंडेश्वरच्या सातबारा काढण्याचा प्रयत्न केला. मारुतीच्या शेपटीसारखं अजित पवारांच्या जरंडेश्वरच्या मालकीची रेषा पुढे पुढे जात आहे. आता पर्यंत १२ लेअर आहेत. खरे मालक कोण हे अजित पवारांना माहिती आहे. मग अजित पवार का घोषित करत नाहीत. प्रश्न फक्त एका कारखान्याचा नाही आहे,” असं सोमय्या म्हणाले.

“जरंडेश्वर साखर कारखान्याचं मुळ नाव जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना अजित पवारांनी तो बेनामी पद्धतीने घेतला. अजित पवार दोन दिवसांपूर्वी जाऊन आले. माझ्याच कारखान्याकडे लक्ष का असं जर वाटत असेल तर सांगा माझाच कारखाना आहे म्हणून. जर तो तुमचा आहे मग तुमच्याकडे कसा आला, किती पैशात विकत घेतला? नोंदीमध्ये जरंडेश्वर कारखान्याचा मालक जेलमध्ये आहे. गुरु कमोडीटीने साखर कारखाना घेतला आहे. कागदावर मालकी ओमकार बिल्डर्सची, बाबुलाल वर्माची. फेब्रुवारपासून बाबुलाल वर्मा DHFL घोटाळ्याप्रकरणी जेलमध्ये आहेत. मग अजित पवार आणि ओमकार बिल्डर्सचा संबंध काय?” असा सवाल सोमय्या यांनी केला.

“या विषयावर अजित पवार – शरद पवार का बोलत नाहीत. कारखाना जर गुरु कमोडीटीने घेतला असेल तर मग तुम्ही का वकिली घेत आहात? आपण सरकारमध्ये आहात. ओमकार बिल्डर्सला पैसे कोणी दिले विकत घेण्यासाठी? विकत घेतल्यानंतर हा जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड हा कारखाना गुरु कमोडीटीने घेतला आणि तो ४० वर्षांसाठी भाडेपट्टीवर जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड यांना दिला. जरंडेश्वर साखर कारखान्याचा चालक जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड झाली आहे. गुरु कमोडीटीने घेतला आणि तो ४० वर्षांसाठी भाडेपट्टीवर जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड यांना दिला. त्याचं भाडेतत्वाचं करारपत्र अजित पवार का दाखवत नाही आहेतय़ दरवर्षी किती भाडं दिलं जातं? जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड यांचे मालक कोण? शेअर होल्डर्स कोण? त्यांचे आणि अजित पवारांचे संबंध काय? जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड, गुरु कमोडीटी, ओमकार बिल्डर्स, बाबूलाल वर्मा जे जेलमध्ये आहेत त्यांचे आणि आजित पवारांचे संबंध काय?” अशी प्रश्नांची सरबत्ती सोमय्या यांनी केली.

“स्पार्कलिंग सॉईल प्रायव्हेट लिमिटेड, फायर पॉवर मार्केटींग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, नॉन कॉन एनर्जीस प्रायव्हेट लिमिटेड, आर्या अॅग्रो बायो इन हर्बल प्रायव्हेट लिमिटेड, जय अॅग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड, कल्पवृक्ष प्रोमोटर्स प्रायव्हेट लिमिटेड, सूर्यकिरण अॅग्रो इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड, ओमकार डेव्हलपर्स, शिवाली बिल्डर्स, ओमकार रियल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड, या सर्व कंपन्या जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या भागदारक आहेत. प्रत्येक कंपन्यांमध्ये दोन-दोन भागदारक आहेत. त्या भागदारक कंपन्यांमध्ये पण चार-चार कंपन्या भागदारक आहेत. एवढी लपवा छपवी अजित पवार का? याचे लाभार्थि कोण?” असा सवाल सोमय्या यांनी केला आहे.


हेही वाचा – चोरी की है तो कबूल करना पडेगा’; अजित पवारांच्या निकटवर्तीयांवरील IT छाप्यानंतर सोमय्यांची प्रतिक्रिया