INS Vikrant घोटाळ्याचा पुरावा नसल्याचे पोलिसांनी हायकोर्टात सांगितले, सोमय्यांचा दावा

भाजप नेते किरीट सोमय्या यांना INS Vikrantघोटाळा प्रकरणी हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई हायकोर्टाने आज(बुधवार) सोमय्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. सोमय्यांविरोधात अद्याप कोणत्याही प्रकारचा पुरावा आढळून आलेला नाही, असं मुंबई पोलिसांनी हायकोर्टात सांगितलं. त्यामुळे किरीट सोमय्यांनी ट्विट करत घोटाळ्या संदर्भात कोणताही पुरावा नसल्याचे पोलिसांनी हायकोर्टात सांगितले, असा दावा सोमय्यांनी केला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांनी INS Vikrantच्या निधीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. या प्रकरणी संजय राऊत यांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. याप्रकरणी सोमय्या पिता-पुत्रांना अटक होण्याची शक्यता होती. मुंबई पोलीस दोघांचाही शोध घेत होते. मात्र, त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. पहिल्यांदा सत्र न्यायालयाने पिता-पुत्रांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर सोमय्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, पिता-पुत्रांविरोधात कोणतेही पुरावे मुंबई पोलिसांना आढळून आले नाहीत, त्यामुळे त्यांना हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

हायकोर्टाच्या निर्णयानंतर किरीट सोमय्या यांनी ‘सत्यमेव जयते’ असे ट्विट केले आहे. माझ्या आणि नील किरीट सोमय्या विरोधात 57 कोटींच्या विक्रांत घोटाळ्याच्या गेल्या 120 दिवसांच्या चौकशीत कोणतीही माहिती, कोणताही डेटा, कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत, असा दावा किरीट सोमय्यांनी केला आहे.

न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर हा निर्णय घेण्यात आला. न्यायमूर्ती डांगरे यांनी असे नमूद केले की, भाजप नेते आणि त्यांच्या मुलावरचे आरोप हे तथ्यहीन आहेत. दोघांवर निधीच्या गैरव्यवहाराचा आरोप आहे. तक्रारीत 57 कोटी रुपये गोळा केल्याचा आरोप असला तरी, गैरव्यवहाराचा कोणताही पुरावा नाही, असे हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करताना म्हटले. पोलिसांनी किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाला फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 41A अंतर्गत नोटीस बजावली होती आणि त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते, हेही न्यायालयाने नमूद केले.


हेही वाचा : उद्धव ठाकरेंमुळेच शिवसेनेत द्वंद्व, म्हणून सेना फुटली; आशिष शेलारांची टीका