अशंकालिन लोकप्रतिनिधी आणि पूर्णवेळ…, अंधारेंनी करून दिली सोमय्यांची नवी ओळख

sushma andhare and kirit somaiya

पुणे – शिवसेनेच्या फायर ब्रॅण्ड उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा आपला झंझावात सुरू केला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची प्रकरणे बाहेर काढणाऱ्या भाजपा नेते किरीट सोमय्यांवर सुषमा अंधारे यांनी आगपाखड केली आहे. किरीट सोमय्या अंशकालिन लोकप्रतिनिधी आणि पूर्णवेळ भाजपचे आरटीआय कार्यकर्ते आहेत, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. त्या पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

देशातील विरोधी पक्षातील नऊ नेत्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. स्वायत्ता यंत्रणांविरोधात हे पत्र आहे. पंतप्रधान हे या देशाचे घटनात्मक प्रमुख आहेत म्हणून त्यांना पत्र लिहिले आहे. या पत्राला त्यांनी किंवा त्यांच्या मंत्रालयातील सचिवांनी उत्तर देणे आपेक्षित आहे. मात्र त्याऐवजी भाजप प्रवक्त्यांकडून उत्तरे येऊ लागली आहेत. पंतप्रधान पदावरील व्यक्ती ही कोणत्याही पक्षाची नसते. त्यामुळे भाजपकडून उत्तर देण्याचे कारण काय असा सवाल सुषमा अंधारे यांनी यावेळी केला.

भाजपकडे ब्लॅकचे व्हाईट करणारे यंत्र आहे का? ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होतात ते भाजपमध्ये गेल्यानंतर व्हाईट होऊन जातात, असंही अंधारे म्हणाल्या. यावेळी त्यांनी कोणावर किती आणि कसे आरोप केले याचाही पाढा वाचला. प्रताप सरनाईक यांच्याविरोधात किरीट सोमय्या यांनी २२ पत्रकार परिषदा घेतल्या, ५५ ट्विट केले. आनंद अडसुळ यांच्यावरील आरोपासंबंधी ६ पत्रकार परिषदा घेतल्या, २० ट्विट केले. भावना गवळींच्या विरोधात ८ पत्रकार परिषदा घेतल्या आणि २२४ ट्विट केले, असं सुषमा अंधारे म्हणाले.

यशवंत जाधवांविरोधात १६ पत्रकार परिषदा घेतल्या. अर्जुन खोतकरांविरोधात ९ पत्रकार परिषदा घेतल्या.
अनिल परब यांच्यावर आरोप करताना ११ वेळा ते खेड, दोपोलीला गेले. किरीट सोमय्या कोण आहेत? जे तिथे हतोडा घेऊन गेले. ते ईडीचे कर्मचारी आहेत का, असा सवाल शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विचारला आहे. सोमय्यांनी अनिल परब यांच्याविरोधात आरोप करताना ४५ पत्रकार परिषदा घेतल्या आणि २४५ ट्विट केले आहेत, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

सदानंद कदम यांना अटक झालेल्या साई रिसॉर्ट प्रकरणाबद्दल सुषमा अंधारेंनी सोमय्यांना सवाल केला. “त्यांनी जे म्हटलेलं आहे की, एसआरएझेडचे भूखंड लाटल्याचा आरोप केला जातोय. एसआरएझेडच्या त्या जागेची जी परवानगी मिळाली आहे, ती एकट्या सदानंद कदम यांच्या रिसॉर्टला नव्हती. त्याच दिवशी अशीच परवानगी 35 लोकांना मिळाली. ज्या 35 लोकांना परवानगी मिळाली, नंतर एनए परवानगी मिळाली. जर एसआरएझेडची परवानगी नसती, तर एनएची परवानगी मिळाली नसती. परवानगी दिल्यावरच मी बांधकाम करेन ना? मग दोष कुणाचा आहे, अधिकाऱ्यांचा. अधिकाऱ्यांना का सोडून दिलं? 35 लोकांना परवानगी मिळाली, तर बाकीचे 34 जण कुठे आहेत? एकटा 35वा माणूसच कसा काय रडारवर येतोय? 34 लोक कुठे आहेत?”, असा सवाल सुषमा अंधारेंनी किरीट सोमय्या यांना केला.