‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ योजनेच्या यशानंतर ‘माझे लाईट बिल, माझी जबाबदारी’

kirit somaiya slams thackeray govt over electricity bills

लॉकडाऊनच्या काळात राज्यातील जनतेला राज्य सरकारने वाढीव बिलाचा शॉक दिला. लॉकडाऊन काळात वाढीव वीजबिल आल्याने लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. लोकांमधील असंतोषाची दखल घेत वीज बिलात सवलत देण्याची घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली होती. मात्र, सवलत दिली तर राज्य सरकारवर किमान दोन हजार कोटींचा आर्थिक भार पडणार असल्याने आणि राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने हा निधी देण्याबाबत अर्थ विभागाने सवलत देण्यास नकार दिला. त्यानंतर उर्जामंत्री नितीन राऊत यांनी सवलत देता येणार नसल्याची घोषणा केली. नितीन राऊतांच्या घोषणेनंतर वाढीव बिलावरुन राज्यातील राजकारण तापले आहे. भाजपचे ने किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. ठाकरे सरकारच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ योजनेच्या यशानंतर ‘माझे लाईट बिल माझी जबाबदारी’ नवी योजना आली आहे, असा टोला सोमय्या यांनी लगावला आहे.

सोमय्या यांनी ट्विटरवर राज्य सरकारने करोनाविरुद्ध लढण्यासाठी राबवलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या लोगोमध्ये बदल करुन त्यात वीज बिलाचा फोटो टाकत, “माझे कुटुंब माझी जबाबदारीच्या यशानंतर ठाकरे सरकारची नवीन योजना, माझे लाईट बिल माझी जबाबदारी,” असा टोला लगावला आहे. हे आपल्याला एका पत्रकाराने पाठवल्याचंही सोमय्या यांनी म्हटलं आहे.