मुश्रीफांच्या बेनामी संपत्तीवर लवकरच कारवाई तर अनिल परबांचे काऊंटडाऊन सुरु, सोमय्यांचा इशारा

kirit Somaiya warning action will be taken against Mushrif assets and Anil Parba's countdown will start
मुश्रीफांच्या बेनामी संपत्तीवर लवकरच कारवाई तर अनिल परबांचे काऊंटडाऊन सुरु, सोमय्यांचा इशारा

राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या बेनामी संपत्तीवर लवकरच कारवाई सुरु करण्यात येणार असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दिली आहे. तसेच परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या साई रिसॉर्टवरील (Sai Resort) कारवाईचा काऊंटडाऊन सुरु झाला असल्याचा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे. सोमय्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad Pawar) यांनासुद्धा मुश्रीफांच्या घोटाळ्यासंदर्भात थेट सवाल केला आहे.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बेनामी संपत्तीवर टाच येणार असल्याचा इशारा दिला आहे. सोमय्या म्हणाले की, हसन मुश्रीफ यांच्यावर बेनामी मालमत्ता प्रकरणी कारवाई सुरु झाली आहे. हसन मुश्रीफ यांनी १५८ कोटी रुपयांची मनी लाँड्रिंग केले. रजत कंज्यूमर सर्विसेस, मरुभूमी फायनान्स अँड डेव्हलपमेंट प्रा. लि., नवरत्न असोसिएट यासह आणखी दोन कंपन्यांमध्ये १५८ कोटींचे मनी लाँड्रिंग झाले आहे. आयकर विभागाने बेनामी मालमत्ता प्रकरणी कायदेशीर कारवाई सुरु केली आहे. दोन कंपन्यांना दिलेल्या नोटीसीची मुदत संपली आहे. आता ती मालमत्ता बेनामी घोषित करुन त्याच्या अटॅचमेंटची कारवाई सुरु केली आहे.

सोमय्यांचा शरद पवारांना थेट सवाल

किरीट सोमय्यांनी शरद पवारांना थेट सवाल केला आहे. शरद पवार तुम्ही शेतकरी शेतकरी करता मग सांगा हसन मुश्रीफ यांना हा प्रश्न कधी विचारणार कि तुम्ही सरसेनापती साखर कारखाना यामध्ये शेतकऱ्यांशी खोटं बोलून ४० हजार शेतकऱ्यांच्या नावाने हसन मुश्रीफ परिवाराच्या संस्थेमध्ये १६ कोटी ३१ लाख ९३५०० रुपये एवढे जमा केले आहेत. परिवाराची बिल्डर डेव्हलपर्स कंपनी आहे आणि त्याच्यामार्गातून सरसेनापती कारखाना आहे. कुठल्याही कंपनीला २० पेक्षा जास्त लोकांकडून पैसे जमवायचे असेल तर सेबीची परवानगी घ्यावी लागते. शेतकऱ्यांचे पैसे आहेत का त्यांच्या नावाने पैसे जमा करण्यात आले आहेत याचे सर्वेक्षण सुरु आहे, असे किरीट सोमय्या म्हणाले.

अनिल परब यांचे काऊंटडाऊन सुरु

अनिल परबांचे काऊंटडाउन सुरु झाले आहे. त्यांच्यावरील कारवाईची उलटी गिणती सुरु झाली आहे. पर्यावरण मंत्रालयाने ३१ जानेवारी २०२२ ला अनिल परब यांच्या साई रिसॉर्ट एनएक्स दापोली या रिसॉर्टला पाडण्याचे आदेश दिले होते. ते पाडण्यात आले नाही. यामुळे केंद्राच्या पर्यावरण मंत्रालय महाराष्ट्र सरकारला नोटीस पाठवणार आहे. महाराष्ट्र सरकारने सांगितले की, रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी कळवलय, ९० दिवसामध्ये अनिल परब यांनी रिसॉर्ट पाडला नाही. कालच रत्नागिरी जिल्हाधिकारी, महावितरण आणि महाराष्ट्र कोस्टल झोन अथॉरिटीकडे मागणी केली की, ताबडतोब रिसॉर्टचे वीज आणि पाणी कनेक्शन कापण्यात यावे. अनिल परब हे रिसॉर्ट बांधण्यासाठी आपल्या चोपड्यात एक पैशाचाही खर्च दाखवला नाही. परंतु त्यांच्या सीएने बांधकाम खर्च दाखवला आहे. हे सगळं आयकर विभागाच्या धाडीमध्ये समोर आलं आहे. अनिल परब २५ करोड रिसॉर्टचे मालक आहेत. प्रॉपर्टी टॅक्स भरत आहेत. परंतु खर्चाचा हिशोब शून्य दाखवला आहे. त्यामुळे या प्रकरणावर कारवाई सुरु झाली असल्याची माहिती सोमय्यांनी दिली आहे.

उद्धव ठाकरेंच्या पार्टनरमुळे हेमंत करकरेंचा मृत्यू

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे परिवारांशी संबंधित असलेले व्यावसायिक ज्यांनी हेमंत करकरेंची हत्या केली. हेमंत करकरेंचा मृत्यू दोन कारणांमुळे झाला आहे. कसाबचे सहकारी पाकिस्तानच्या अतिरेक्यांमुळे मृत्यू झाला. तसेच हेमंत करकरे यांचे बुलेटप्रूफ जॅकेट होतं ते नकली होते. त्यामुळे हेमंत करकरेंचा मृत्यू झाला आहे. ते बुलेटप्रूफ जॅकेट विमल अग्रवाल यांनी दिले होते. समित्या नेमल्या झाल्या बिमल अग्रवालची अटक झाली. तो विमल अग्रवाल ज्याने बोगस जॅकेटचा पुरवठा केला होता. याच बिमल अग्रवाल यांचे नाव यशवंत जाधव यांच्यावर धाडी टाकल्या होत्या तेव्हा समोर आले होते. बिमल कुमार रामगोपाल अग्रवाल तीन वेगवेगळ्या केसमध्ये अटक होऊन जामीनावर आहेत. बिमल अग्रवाल, किशोर कुमार अग्रवाल आणि यतिन यशवंत जाधव हे तीन नावे आहेत. यतिन यशवंत जाधव हा यशवंत जाधवांचा मुलगा आहे.


हेही वाचा : राज ठाकरेंनी शरद पवारांकडून काहीतरी शिकावं, बृजभूषण यांचा मनसेच्या आरोपानंतर टोला