भोंग्यांनी दाबला सोमय्यांचा आवाज

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या मागील अनेक दिवसांपासून शांत असल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचार आणि घोटाळ्याचे आरोप केले होते. तसेच किरीट सोमय्या आणि शिवसेना खासदार यांच्यामध्ये देखील आरोप -प्रत्यारोप सुरु होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून किरीट सोमय्या चर्चेत दिसत नाही आहेत. याचे कारण म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भोंग्यांविरोधातील भूमिका, सध्या राज्यात मशिदींवरील भोंग्यांवरुन वाद सुरु आहे. परंतु आरोप करुन चर्चेत राहणारे सोमय्या आता कुठे आहेत? असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर आरोपांची मालिका सुरु ठेवून माजी खासदार किरीट सोमय्या नेहमी चर्चेत होते. परंतु मशिदींवरील भोंग्यांच्या वादामुळे सोमय्यांची चर्चा काहीशी मागे पडली आहे. सोमय्यांच्या घोटाळ्यांच्या आरोपाची कुठे चर्चा होताना दिसत नाही आहे. एकंदरीत राज ठाकरेंची मशिदींवरील भोंग्यांविरोधातील भूमिका सोमय्यांच्या आरोपांवर भारी पडली असल्याचे दिसत आहे. किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत, खासदार भावना गवळी, मंत्री अनिल परब यांच्यासह अनेक नेत्यांचे घोटाळे बाहेर काढले आहेत. तसेच सोमय्यांच्या देखील अडचणी वाढल्या होत्या. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांवर आयएनएस विक्रांत प्रकरणी कोर्टाची पायरी चढण्यास भाग पाडले होते. सोमय्यांना न्यायालयाकडून अखेर दिलासा देण्यात आला आहे.

परंतु सतत चर्चेत असणारे सोमय्या मागील काही दिवसांपासून चर्चेतून मागे पडले असल्याचे दिसत आहे. परंतु हा शांतपणा वादळापूर्वीची शांतता ठरण्याची शक्यता आहे. कारण सोमय्या सध्या रायगड दौऱ्यावर असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या 19 बंगल्यांच्या आरोपांबाबत पाठपुरावा करण्यात व्यस्त आहेत. अलिबाग येथे 5 वकिलांची बैठक घेऊन “रश्मी उद्धव ठाकरे कोर्लई अलिबागचा 19 बंगलो घोटाळा” संदर्भातील याचिकेवर चर्चा करणार असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले आहेत. तसेच मे महिन्यात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे सोमय्या म्हणाले आहेत. त्यामुळे सोमय्यांचा हा शांतपणा खरच वादळापूर्वीच शांतता ठरु शकते.

माजी खासदार किरीट सोमय्या भोंग्यांच्या वादादरम्यान शिवसेनेच्या नेत्यांनी केलेल्या घोटाळ्याची माहिती घेत आहेत. तसेच सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आहे. घोटाळ्यांवरुन कायदेशीर बाजू तपासण्याचे कामही किरीट सोमय्या करत आहेत. त्यामुळे मशिदींवरील भोंग्यांविरोधात सुरु असलेला वाद शांत झाल्यास किरीट सोमय्या पुन्हा ठाकरे सरकारवर आरोपांची मालिका सुरु करणार का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. परंतु कोर्लई बंगलो घोटाळ्यात सोमय्या रश्मी ठाकरेंविरोधात याचिका दाखल करणार असल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.


हेही वाचा : भोंग्यांचा विषय फक्त एक दिवसाचा नाही, आंदोलन सुरुच राहणार, राज ठाकरे भूमिकेवर ठाम