संजय राऊतांविरोधात 100 कोटींचा मानहानीचा दावा

किरीट सोमय्या जाणार उच्च न्यायालयात

Kirit Somayya mp bjp

भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती सोमय्या यांनी रविवारी दिली. सोमय्या सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात जाऊन हा दावा दाखल करणार आहेत.

सोमय्या यांच्या युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून 100 कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता, परंतु या घोटाळ्याबाबत त्यांनी एकही पुरावा सादर केलेला नाही. त्यामुळे केवळ बदनामी करण्याच्या हेतूने राऊत आपल्यावर आरोप करीत असल्याचे किरीट सोमय्या यांचे म्हणणे आहे.

शिवडी येथील न्यायालयात सोमय्या दाम्पत्याने याआधीच संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. राऊतांविरोधात सोमय्या कुटुंबीयांनी याआधी पोलिसांत धाव घेतली होती. कोणताही पुरावा नसताना राऊतांकडून बदनामीकारक वक्तव्य होत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली होती, पण पोलिसांकडून त्यावर कोणतीही कारवाई न करण्यात आल्याने त्यांनी शिवडी येथील न्यायालयात राऊतांविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे.