नांगरे-पाटील यांच्या पत्नी, सासर्‍यांवर सोमय्यांचे आरोप

पुण्यातील दौऱ्यादरम्यान सीबीआय किंवा न्यायाधीशांमार्फत चौकशीची मागणी

मुंबई – अजित पवार यांच्या जरंडेश्वर घोटाळ्याप्रमाणेच जालन्याच्या अर्जुन खोतकरांनी घोटाळा केला आहे. त्यात विश्वास नांगरे पाटील यांच्या पत्नी रुपाली विश्वास नांगरे-पाटील, त्यांचे सासरे पद्माकर मुळे यांचीही नावे आहेत. या प्रकरणाची सीबीआय किंवा न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी रविवारी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली. हिम्मत असेल, तर माझ्या आरोपाचे उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्जुन खोतकरांनी द्यावे, असे आव्हानही त्यांनी दिले.

सोमय्या म्हणाले, चोरी केली नाही तर आनंद अडसूळ का लपून बसलेत. आता मी आणखी एक नाव वाढवत आहे. मी अर्जुन खोतकरांच्या जालना सहकारी साखर कारखान्याचा घोटाळा बाहेर काढला आहे. खोतकरांनी स्पष्टीकरण दिलेय की त्याचा आणि माझा संबंध काय. मात्र, माझ्याकडे त्याची कागदपत्रे आहेत. जालना साखर कारखान्याचा मालक अर्जुन इंडस्ट्रीज आहे. त्याचे मालक कोण आहेत. 2018 ला अर्जुन शुगर इंडस्ट्रीजची स्थापना अर्जुन खोतकर यांनी केली, असा दावाही त्यांनी केला. सोमय्या म्हणाले, फेब्रुवारी 2012 ला कारखाना आजारी पडला. त्याचे टेंडर 28 फेब्रुवारीला निघाले. निविदा तापडिया कंपनीच्या नावाने दिली गेली. या कंपनीने कारखाना विकत घेताना बांधकाम करणार म्हणून ताब्यात घेणार म्हटले. 42 कोटी 18 लाख 62 हजारांत विकत घेतला. हिम्मत असेल, तर मुख्यमंत्री आणि अर्जुन खोतकरांना उत्तर द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले.

सोमय्या पुढे म्हणाले की, जे महाराष्ट्र सहकारी बँकेला भरले ते पैसे कोणी दिले? 10 जुलै 2020 ला जे प्रतिज्ञापत्र मुंबई पोलिसांना दिले त्याचे पैसे हे अर्जुन खोतकरांनी दिलेत, असे तापडिया कंपनीने सांगितले. 23 नोव्हेंबरला 2012 ला आम्ही 43 कोटी रुपयांना कारखाना विकला. जे जरंडेश्वर कारखान्यात अजित पवारांनी केले तेच खोतकरांनी केले आहे. यात 6 शेअर होल्डर आहेत. 6 पैकी 5 जण खोतकर परिवारातील आहेत. 6 वं नाव आहे अजित सीड्स प्रायव्हेट लिमिटेड. जालना साखर कारखान्यांचे दोन मालक आहेत. अर्जुन खोतकर, पद्माकर मुळे आणि दुसरे नाव रुपाली विश्वास नांगरे-पाटील. नांगरे-पाटील म्हणजे मुंबई पोलीसचे सहआयुक्त अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

घोषणाबाजीमुळे तणावाचे वातावरण

किरीट सोमय्या हे पिंपरी चिंचवडमध्ये आल्याची माहिती मिळताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पिंपरी चिंचवड येथील भाजप कार्यालयावर धडक दिली. कार्यालयासमोर येऊन सोमय्यांना काळे झेंडे दाखवले आणि निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी काही शिवसैनिकांनी कार्यालयाच्या इमारतीत शिरण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पोलिसांकडून अडवण्यात आले आणि इमारतीचे गेट लॉक करण्यात आले. तर दुसर्‍या बाजूला भाजप कार्यकर्त्यांनीही गर्दी करत शिवसेनेला विरोध केला. दोन्ही बाजूकडून होणार्‍या घोषणाबाजीमुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.