स्वत:चा भाऊ मुख्यमंत्री झाला म्हणून इतका द्वेष करणं दुर्दैवी, किशोरी पेडणेकरांची राज ठाकरेंवर टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याविरोधात दिलेल्या अल्टिमेटमनंतर मनसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्यातील काही ठिकाणी मशिदींसमोर हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांना देखील पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं. अशातच स्वत:चा भाऊ मुख्यमंत्री झाला म्हणून इतका द्वेष करणं दुर्दैवी, अशी टीका मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.

स्वत:चा भाऊ मुख्यमंत्री झाला म्हणून इतका द्वेष करणं दुर्दैवी

स्वत:चा भाऊ मुख्यमंत्री झाला म्हणून इतका द्वेष करणं हे अतिशय दुर्दैवी आहे. त्यांना भोंगे उतरवायचे असतील तर केंद्राला सांगा. संपूर्ण देशभरात निर्णय व्हायला हवा. केवळ मतांच्या राजकारणासाठी यांना महाराष्ट्र आणि मुबंई दिसतंय का?, असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे.

…शिवसेनेला हिंदुत्व शिकवण्याचा प्रयत्न करू नये

शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अजूनही ठाम असून नकली हिंदुत्ववाल्यांनी शिवसेनेला हिंदुत्व शिकवण्याचा प्रयत्न करू नये. शिवसेना प्रमुखांनी सांगितलेल्या मार्गावरच आम्ही चालत आहोत, असे पेडणेकर म्हणाल्या.

ज्यांनी बाळासाहेब हयात असताना त्यांना त्रास दिला. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा दाखला तर देऊच नये. अशांनी शिवसेनेला बाळासाहेबांचा मार्ग दाखवूच नये, असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.


हेही वाचा : Raj Thackeray Video : भोंगे उतरवण्याचा बाळासाहेबांचा जुना व्हिडीओ ट्विट करत राज ठाकरेंनी साधला शिवसेनेवर निशाणा