संकटाचा धीरोदात्तपणे सामना करणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांमुळे मुंबई सुरक्षित – किशोरी पेडणेकर

Mayor kishori pednekar said All the systems of bmc are working for local travel from 15th August

एलपीजी गॅस गळती रोखण्यासाठी धीरोदत्तपणे सामना करणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमुळे मुंबई सुरक्षित असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले. कस्तुरबा रुग्णालयात दि.०७ ऑगस्ट २०२१ रोजी एलपीजी गॅस गळती झाली होती.

महिला सुरक्षा कर्मचाऱ्याच्या समयसुचकतेमुळे तसेच सर्व विभागाच्या सामूहिक प्रयत्नांमुळे या गळतीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेचा सुरक्षा विभाग, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, अग्निशमन दल, आपत्कालीन व्यवस्थापन विभाग, हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनी तसेच “ई” विभागाचे अधिकारी यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. या सर्व विभांगातील अधिकारी/ कर्मचाऱ्यांचा महापालिका मुख्यालयातील समिती सभागृहात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन आज दि.०२ फेब्रुवारी २०२२ रोजी सत्कार करण्यात आला, त्यावेळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात महापौर बोलत होत्या.

याप्रसंगी उप महापौर अँड. सुहास वाडकर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे ) श्री. सुरेश काकाणी, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. संजय कुऱ्हाडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार तसेच संबंधित विभागाचे अधिकारी/ कर्मचारी उपस्थित होते.

महापौर किशोरी पेडणेकर बोलताना पुढे म्हणाल्या की, गॅस गळती सुरू झाल्यानंतर महिला सुरक्षा कर्मचाऱ्याने ज्या समसूचकतेने संदेश देऊन वरिष्ठांना कळविले तसेच गळती रोखण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न केले. याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे व हा संदेश सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचण्याकरिता आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे महापौरांनी सांगितले. या प्रकारच्या अश्या कार्यक्रमातून कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढत असून कर्मचाऱ्यांवर टाकलेल्या विश्वासामुळे हे शक्य झाले आहे. यापुढील काळात अश्या प्रकारच्या घटना घडू नये यासाठी अधिकारी / कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात यावे असे निर्देशही महापौरांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे)श्री. सुरेश काकाणी यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, या घटनेच्या वेळी डॉक्टर, अग्निशमन दल, सुरक्षा दल या सर्वांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. भविष्यात याप्रकारच्या घटना होऊ नयेत, यासाठी सर्वांनी आत्मपरीक्षण करून नेमक्या काय सुधारणा केल्या पाहिजे हे लक्षात घेणे महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेराद्वारे वेळोवेळी माहिती घेऊन तसेच कोणकोणते प्राधिकरण आपल्यासोबत काम करीत आहे याचे नियोजन करून प्रथमोपचार माहिती व तयारी करून घेणे गरजेचे आहे.यासारख्या घटनांमधून बोध घेऊन अशा घटना घडू नये यासाठी काय करता येणे शक्य आहे ? ते लक्षात घेणे गरजेचे आहे.

सामूहिक जबाबदारी पार पाडली नाहीतर एक चूक किती महागात पडू शकते ? हे या घटनेवरून लक्षात घेणे गरजेचे आहे. अश्या घटनांपासून सुरक्षित राहण्याकरीता एसओपी तयार करून सर्वापर्यंत ती पोहोचवावी. जेणेकरून संभाव्य हानी टाळता येईल. या कर्मचाऱ्यांपासून इतरांनाही प्रेरणा मिळावी, यासाठी आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच महापौर किशोरी पेडणेकर यांनी विशेष पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी महापौरांचे विशेष आभार मानले.
याप्रसंगी सर्व कर्मचाऱ्यांना महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.


हेही वाचा : Mumbai : मुंबईतील विकासकामे नियोजित वेळेत पूर्ण करा, आदित्य ठाकरे यांचे निर्देश