नाशिकरोडला तडीपार गुंडाकडून चाकू हल्ला; एक गंभीर

हल्ला.. अटक.. जामीन.. अन् पुन्हा अटकेसाठी शोध...

crime
नाशिकरोड । श्रीधर गायधनी
येथील एकलहरे भागात दोन दिवसांपूर्वी तडीपार असलेल्या गुंडाने एकावर चाकूने हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. जखमीवर उपचार सुरु असून नाशिकरोड पोलिसांनी त्याला ताब्यात घेत प्रतिबंधात्मक कारवाई केली, मात्र न्यायालयाने सोमवारी (दि.२०) तडीपारीच्या गुन्ह्यात जामीन दिलेल्या गुन्हेगारावर उशिरा चाकू हल्ल्याचा गुन्हा दाखल झाल्याने त्याचा पुन्हा शोध सुरु करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी (दि.१९) रात्री साडे नऊ वाजता अरिंगळे मळ्यात राजू बापूराव पगारे (५०) यांच्या घरात देवीचे गाणे सुरु असतांना आषुतोष शेलार रा. अरिंगळे मळा याने पगारे यांच्या घरासमोर जाऊन धमकावत कुरापत काढून त्याच्या पोटावर चाकूने वार केला, यात राजू गंभीर जखमी झाल्याने त्याला बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  संशयित शेलार याच्यावर नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार दिगंबर मोरे करत आहे.

हल्ला.. अटक.. जामीन.. अन्.. पुन्हा शोध..

पोलिसांनी सांगितले की, आशुतोष शेलारने चाकू हल्ला केल्यानंतर त्याला ताब्यात घेत १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करुन न्यायालयात हजर केले. या गुन्ह्यात सोमवारी (दि.२०) त्याची न्यायालयाने जामीनावर मुक्तता केली. त्यानंतर सोमवारी (दि.२०) दुपारी पुन्हा चाकू हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने पुन्हा एकदा शेलारचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तडीपार गुंडांकडून हल्ल्यांचे प्रमाण वाढले

आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व गुंडगिरीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या आदेशाने सराईत गुंडांना तडीपारीची कारवाई केली होती. परंतू गेल्या कित्येक दिवसांपासून तडीपार गुंडाचा शहरात खुलेआम वावर सुरु झाल्याचे समोर आले आहे. देवळाली कॅम्प भागातील हाडोळा भागात झालेल्या गोळाबाराच्या प्रकारानंतर एकलहरे भागातही तडीपार गुंडाकडून चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आल्याने पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.