Monday, February 15, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी ज्ञानभिंतींनी पाडला अप्रगत विद्यार्थ्यांत बौध्दिक प्रकाश

ज्ञानभिंतींनी पाडला अप्रगत विद्यार्थ्यांत बौध्दिक प्रकाश

चांदगिरी जिल्हा परिषदेच्या शाळेत दत्तू कारवाळ यांनी राबवला अभिनव उपक्रम

Related Story

- Advertisement -

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक म्हटला की, आपल्यासमोर उभी राहते ती ‘सरकारी छबी’.. शिक्षणबाह्य कामांमध्ये पिचलेला आणि खेड्यापाड्यांत पोहचता-पोहचता दमलेला शिक्षक! पण हा समज खोडून काढला आहे तो चांदगिरी शाळेतील शिक्षक दत्तू लक्ष्मण कारवाळ यांनी. त्यांनी पारंपारिक शिक्षणाला आधुनिकतेची जोड देत शाळेत नवा प्रयोग राबवला. मुलांना अभ्यासात रस यावा म्हणून त्यांनी वर्ग खोलीच्या भिंतीच बोलक्या केल्या. या भिंतींवर अभ्यासक्रमातील सगळ्याच बाबी वाचायला मिळतात. शिक्षणाच्या प्रवाहात काहीसा मागे राहिलेला विद्यार्थी वर्ग आता या ‘ज्ञान भिंतीं’मुळे खर्‍या अर्थाने ‘हुशार’ होत आहे.

नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील शेवटचे गाव म्हणजे चांदगिरी. या शाळेत संशोधक वृत्तीतून पहिली ते सातवीच्या अप्रगत विद्यार्थ्यांसाठी तसेच प्रौढ साक्षरांसाठी ‘ज्ञानभिंत’ उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमात शाळेतील रिकाम्या भिंतींचा अभिनव वापर करण्यात आला आहे. त्यासाठी शाळेतील वर्गाच्या मुख्य फळ्याच्या खालील व वरील भागातील रीकाम्या जागेचा शैक्षणिक नवनिर्मितीसाठी सुंदर उपयोग करण्यात आला आहे. त्यामुळे वर्गातच शैक्षणिक वातावरणाची निर्मिती होऊन विद्यार्थी खेळात रमावेत तसे वर्गातील अभ्यासात रमतात. अनेक शैक्षणिक साधने वर्गाच्या भिंतीवरच साकारलेले असल्याने शाळेच्या भिंतींनीच जणू आता विद्यार्थ्यांना शिकवण्याचा वसा घेतला आहे. या उपक्रमशिल शिक्षकास डायट नाशिकचे जेष्ठ अधिव्याख्याता योगेश सोनवणे, तालुका गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब ठाकरे, भाऊसाहेब जगताप, शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश वैष्णव, केंद्र प्रमुख वाल्मिक हिंगे, विषय तज्ञ यशवंत रायसिंग, शिक्षिका इंदिरा नागरे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तर स्थानिक पातळीवर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश हांडगे, उपाध्यक्ष जयराम वांजूळ व सर्व सदस्य, सरपंच शोभा कटाळे, सदस्य किरण कटाळे, सामाजिक कार्यकर्ते रमेश कटाळे, संतोष कटाळे, नंदू कटाळे, विजय बागूल, सोमनाथ बागूल, पोलीस पाटील लखण कटाळे आदींचे सहकार्य लाभले.

या उपक्रमाची उपयुक्तता अशी-

 1. -आनंददायी शिक्षणासाठी हातभार लावला जातोय
 2. अध्ययन व अध्यापन प्रक्रिया रंजक बनली
 3. विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययन पध्दतीने ज्ञान मिळविण्यासाठी अत्यंत प्रभावशाली साधन
 4. गणितासारखा अवघड वाटणारा विषय सोपा वाटायला लागला
 5. राष्ट्रीय साक्षरता प्रसारासाठी उपयुक्त
 6. मराठी, इंग्रजी विषयाच्या शुध्द लेखनासाठी
 7. सुंदर, आकर्षक, वळणदार हस्ताक्षर व वाचनासाठी
 8. शिक्षक व विद्यार्थ्यांना कमीत कमी वेळेत ज्ञानाची देवाण घेवाण साध्य
 9. विद्यार्थी व प्रौढ साक्षरांना पाटी, पेन्सिल, दप्तराविना शिक्षण घेता येत असल्याने पालकांच्या व शासनाच्या खर्चात बचत होते.
 10. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे हलके होते.
 11.  मोबाइल, टीव्हीला बाजूला सारत एका ठिकाणी बसून शांत चित्ताने अभ्यास होतो
- Advertisement -

“ज्ञानभिंतींच्या निर्मितीसाठीचा खर्च कारवाळ सरांनी पदरमोड करुन केला आहे. त्यांचे डिजीटल शाळेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी सहकार्य करु.”


रमेश कटाळे, माजी सरपंच

“पाया पक्का असला तरच इमारत मजबूत होते. इयत्ता पहिली, दुसरी हे शालेय जीवनाचा पायाच असतात. अशावेळी मुलांची अभ्यासाची आवड टिकून राहावी, मुलांनी मोबाईल, टीव्हीच्या अती आहारी जाण्यापासून मुक्त व्हावे, शिकविलेला अभ्यास त्यांच्या स्मरणपटलावर कोरला जावा या तळमळीपोटी ज्ञानभिंत उपक्रमाची निर्मिती करण्यात आली.”

- Advertisement -


-दत्तू लक्ष्मण कारवाळ

- Advertisement -