दिवाळी सुट्टीत पर्यटनसाठी कोकणाला पसंती

महाराष्ट्राबाहेर केरळ, राजस्थान ठरताहेत ‘फेव्हरट’

NIVATI BEACH

दिवाळीनिमित्त यंदा लागून आलेल्या पाच दिवस सुट्ट्यांमुळे मुंबईकरांचा आऊट डोअर ट्रीपचा मूड बनला आहे. त्यामुळे शुक्रवारपासून मुंबईकरांनी मुंबईला बाय बाय केला. लागोपाठ आलेल्या या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी मुंबईकरांनी यंदा महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळाले आहे. यात प्रामुख्याने अनेकांनी कोकणाला पसंती दर्शविली असून महाराष्ट्रा बाहेर केरळ, गोवा आणि राजस्थानला पसंती दर्शविली असल्याची माहिती पर्यटन व्यावसायिकांकडून देण्यात आली आहे.

दिवाळीच्या सुट्टीत पर्यटनाला जाण्याची क्रेझ मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यातही पर्यटनामध्ये नाविन्य शोधले जात आहे. पूर्वी पर्यटनाचा एक ठराविक साचा ठरलेला असायचा, यामध्ये निसर्ग सौदर्य किंवा देवदर्शन या दोनच गोष्टींना खूप महत्व दिले जात होते. मात्र सध्या नाईट लाईफ, कॅसिनो, हनिमून, पर्यटन आणि हटके डेस्टिनेशन असे पर्याय निवडले जातात. यातही परदेशी पर्यटनाचा ओघ असला तरी सामान्य मुंबईकरांकडून कोकणाला विशेष पसंती दिली जात असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये समुद्र किनारा, निसर्ग सौंदर्य आणि खाद्य संस्कृती हे मुद्दे केंद्र बिंदू ठरत आहेत. सरकारने कोकणात अनेक ठिकाणी पर्यटकांना सोयी-सुविधा पुरविल्या आहेत. याचाही फायदा कोकणातील पर्यटक घेत आहेत. या पाठोपाठ औरंगाबादला पर्यटक पसंती देत आहेत. यासाठी दोन महिन्यांपासून मुंबईतील ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम कंपन्यांकडून सामान्य मुंबईकरांना परवडेल असे ५ दिवसांचे पॅकेज तयार केले आहे. पर्यटकांची पहिला क्रमांकावरची पसंती कोकण आहे. त्यामुळे कोकणातील एमटीडीसीची सर्व हॉटेल्स फुल्ल झाली आहेत. डीजेच्या तालावर बीच पार्ट्या चागंल्याच रंगू लागल्या आहेत. हॉटेल व्यावसायिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी खास कोकणी पद्धतीच्या जेवणाची मेजवानीही देत आहेत. यंदाचा दीपोत्सव अर्थातच पर्यटकांसह कोकणातल्या व्यावसायिकांसाठी पर्वणीच ठरत आहे.

महाराष्टा्रबाहेर वाढतेय गर्दी
दिवाळीच्या पर्यटनासाठी बुकींग जोरात सुरु झाले आहे. महाराष्ट्रांतर्गत पर्यायांबरोबरच बाहेर राज्यातील पर्यटनालाही यामध्ये पसंती दिली जात आहे. त्यासाठी अगदी १५ ते २५ हजारांपासून पर्याय उपलब्ध आहेत. पर्यटक आता आपल्या पसंतीनूसार टुर आखत आहेत. राज्यस्थान आणि गुजरातलाही महाराष्ट्राचे पर्यटक पसंती देत आहेत. यामध्ये निसर्गसौंदर्य, जंगल सफारी आदी अवाडी निवडीला प्राधान्य दिले जात असल्याची माहिती पर्यटन व्यावसायिकांनी दैनिक ‘आपलं महानगर’ला दिली.

साडेपाच हजारात कोकण दर्शन
कोकणातील पुरातन मंदिर आणि विस्तीर्ण समुद्र किनारे मनाला भुरळ घालणारे आहेत. रत्नागिरीमधील आरे-वारेचा समुद्रकिनारा पर्यटकांना सर्वाधिक आकर्षित करत आहे. दिवाळीच्या सुट्टीत मालवण तारकर्ली देवबाग येथील स्कुबा डायव्हिंग, परसिलिंग व वॉटर स्पोर्टची मज्जा लुटायला देश – विदेशातून पर्यटक येतात. समुद्राच्या तळाशी असलेले अद्भूत निसर्ग सौंदर्य, विविधरंगी मासे पाहण्यासाठी पर्यटक कोकणाला विशेष पसंती देत आहेत. त्यासाठी कोकणची ट्रीप ५ हजार ५०० पासून सुरू होत असल्याने सर्व सामान्य पर्यटकांच्या आवाक्यात आहे.

दिवाळीच्या पर्यटनासाठी बहुतांश नागरिकांनी कोकणाचा पर्याय स्वीकारला आहे. त्यासाठी आम्ही सामान्य मुंबईकरांच्या आवाक्यात येईल असे पॅकेज तयार केले आहेत. सध्या दिवाळीच्या सुट्ट्यांमधील बुकींग फुल होण्याच्या मार्गावर आहे.
– शैलेश मराठे , पर्यटन व्यावसायिक