कोल्हापूर, सांगलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

पूरग्रस्तांच्या मदतीला नौदल, हेलिकॉप्टरच्या सहाय्याने मदतकार्य सुरू; मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा आढावा

गेल्या चार ते पाच दिवसांपासून कोल्हापूर, सांगली परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे नद्या-नाले, धरण तुडूंब भरले आहेत. पंचगंगा, वारणा, कृष्णा या नद्यांना पूर आल्याने कोल्हापूर आणि सांगलीत पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले असून, हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

नौदल, हेलिकॉप्टरच्या सहाय्याने मदतकार्य सुरू

पूरग्रस्तांच्या मदतीला नौदल, हेलिकॉप्टरच्या सहाय्याने मदतकार्य सुरू असून एनडीआरएफ आणि नौदलाचे पथक पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कोल्हापूरात दाखल झाले आहेत. कोल्हापूर तसेच सांगली शहरातील परिस्थिती भयावह झाल्याने कोल्हापूर आणि सांगलीत एनडीआरएफच्या काही तुकड्या याआधीच मदतीसाठी दाखल झाल्या होत्या. यांच्या मदतीने पूरामध्ये अडकलेल्या नागरिकांना नौदलाचे पथक हेलिकॉप्टरच्या मदतीने एअरलिफ्टींग सुरू आहे.

मुंबईहून कोल्हापुरमध्ये भारतीय नौदलाच्या चार टीम दाखल करण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसाने कोल्हापुराला चारही बाजूने पाण्याने वेढले आहे तर साताऱ्यातही पावसाचा कहर सध्या सुरू आहे. यामुळे नद्या ओसंडून वाहत असून राधानगरी आणि त्यासोबतच इतर धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने कोल्हापुरात ही पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुराच्या पाण्यामुळे कोल्हापूर शहरातील असणाऱ्या ग्रामीण भागाचा संपर्क तुटला आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा आढावा

राज्यातील पूरस्थितीच्या परिस्थितीचा असणारा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधला असून मुख्यमंत्र्यांनी आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

मुसळधार पावसामुळे रोगराई वाढण्याची शक्यता अधिक असते आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.