विधानसभा निवडणुकीत सपाटून आटल्यानंतर आता शिवसेनेला ( ठाकरे गट ) गळती लागण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसू शकतो. तोही कोकणातून. जिथे आधीच शिवसेनेची पडछड झाली आहे. शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेले ( ठाकरे गट ) माजी आमदार राजन साळवी हे पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे
विधानसभा निवडणुकीत राजन साळवी यांचा पराभव झाला. मात्र, निवडणुकीत आणि निवडणुकीनंतर वरिष्ठांनी दखल घेतली नाही. त्यासोबत, साळवी यांच्यापाठीमागे ‘एसीबी’ चौकशीचा ससेमिराही चालू आहे. त्यामुळे साळवी हे पक्षाला ‘रामराम’ ठोकण्याचा निर्णय लवकरच घेऊ शकतात. परंतु, साळवी हे शिंदे गटात की भाजपत जाणार? हे कळू शकलेले नाही.
हेही वाचा : “शरद पवार आमचे देव, छाती फाडली तर साहेब दिसतील, आता…” अजितदादांच्या मंत्र्यांचं विधान
राजापूर विधानसभा मतदारसंघातून पराभूत…
विधानसभा निवडणुकीत राजन साळवी विरुद्ध शिंदे गटाचे किरण सामंत, अशी लढत झाली होती. या लढतीत, किरण सामंत यांनी राजन साळवी यांचा पराभव केला होता. तीनवेळा निवडून आलेल्या साळवी यांना चौथ्यांदा मात्र पराभवाचा सामना करावा लागला होता.
साळवींवर आरोप काय?
साळवींनी ऑक्टोबर 2009 ते 2 डिसेंबर 2022 पर्यंत या 14 वर्षांच्या कालावधीत बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. साळवींकडे 3 कोटी 53 लाख इतकी बेहिशेबी मालमत्ता सापडली. मात्र, साळवींची मूळ संपत्ती अंदाजे 2 कोटी 92 लाख रूपये इतकी होती. याप्रकरणी साळवींची सहावेळा ‘एसबी’नं चौकशी केली. तसेच, साळवींची पत्नी आणि मुलावर गुन्हा दाखल केला. तर भाऊ, पुतण्या, वहिनी आणि स्वीय सहाय्यकाला नोटीस पाठवली होती.
मरेपर्यंत ठाकरेंसोबत राहणार…
दरम्यान, राजन साळवी हे शिंदे गटात सामील होणार असल्याच्या चर्चा 2022 मध्ये रंगल्या होत्या. तेव्हा, मी मरेपर्यंत ठाकरेंसोबत राहणार असल्याचं साळवी यांनी म्हटलं होते.
“40 वर्षांपासून मी शिवसेनेत काम करतोय. शिवसेनेत विविध पदं भूषवलं. बाळासाहेब ठाकरेंचा सर्वाधिक सहवास मला लाभला. आधी शिवसैनिक, मग नगरसेवक, नंतर नगराध्यक्ष, ठाकरे परिवाराच्या आशीर्वादामुळे जिल्हाप्रमुख आणि मग शिवसेनेचा तीन वेळा आमदार झालो. आता शिवसेनेचा उपनेता म्हणून काम करतोय…. मला आणखी काय हवंय… मरेयपर्यंत ठाकरेंसोबतच राहिन… कोणत्या आमिषामुळे मी कोणत्या गटा-तटात जाणार नाही,” अशी भूमिका राजन साळवींनी मांडली होती.
हेही वाचा : “बंगालमध्ये सत्ता आल्यानंतर ममता बॅनर्जी तुरुंगात जाणार, कारण…”, भाजप नेत्याचा मोठा दावा