रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणपट्टीतील हजारो महिला मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या जाळ्यात अडकल्या आहेत. यातून या महिलांना बाहेर काढण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा. अन्यथा, कोकणात आत्महत्यांची लाट सुरू होईल, अशी भीती जनता दल सेक्युलर पक्ष तसेच कोकण जनविकास समितीने केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना जनता दल सेक्युलरने पत्र दिले आहे. (Konkan News : Appeal to the government to save women from the trap of micro finance companies)
केवळ रत्नागिरी जिल्ह्यात दहापेक्षा अधिक मायक्रो फायनान्स कंपन्या असून त्यांनी नियमबाह्यरीत्या कर्जवाटप करून आर्थिक साक्षर नसलेल्या महिलांना सापळ्यात अडकवले आहे. बंधन, ग्रामीण कुटा, समस्ता, इसाब फायनान्स, स्वस्तिक, विदर्भ, आरबीएल, संकष्टी, सारथी, उन्नती अशी या फायनान्स कंपन्यांची नावे आहेत. या कंपन्या एकावेळी दोन वर्षं मुदतीचे पन्नास हजार रुपयांपर्यंतचे कर्ज देत असल्या तरी, पहिले कर्ज फिटण्यापूर्वी दुसरे, तिसरे कर्ज देण्याचा प्रकार सुरू आहे. आधीचे कर्ज फेडण्यासाठी नवी कर्जे घेतली जात आहेत, असे जनता दल सेक्युलर पक्ष तसेच कोकण जनविकास समितीने या पत्रात म्हटले आहे.
हेही वाचा – Udayanraje Bhosle : सोलापूरकर दिसेल तिथे ठेचून काढा, अभिनेत्याविरोधात उदयनराजेंचा संताप
एकावेळी एका व्यक्तीला कमाल तीन कंपन्याच कर्ज देऊ शकतील, अशी तरतूद असताना आठ-आठ, दहा-दहा कंपन्यांनी एकेका व्यक्तीला कर्जपुरवठा केला आहे. परिणामी कर्जाची रक्कम दोन-तीन लाखापासून पाच-सहा लाखापर्यंत गेली आहे. मुख्यतः मजुरी तसेच आंबा-काजू बागांचे वर्षातून येणारे उत्पन्न या पलीकडे कसलेही नियमित उत्पन्न नसताना दरमहा पंधरा-वीस हजारांपासून 40 हजार रुपयांपर्यंतचे हप्ते फेडायचे कसे, असा प्रश्न आज या महिलांसमोर निर्माण झाला आहे, याकडे या पत्राद्वारे सरकारचे लक्ष वेधण्यात आले आहे.
दुसरीकडे, कर्जाच्या वसुलीसाठी या कंपन्यांचे एजंट दांडगाई आणि दादागिरी करीत आहेत. आधीचे हप्ते दिलेले असले तरी, हप्त्याच्या प्रत्येक तारखेला एजंट घरात येऊन बसतो. पैसे हातात पडल्याशिवाय तो घरातून बाहेर पडत नाही. कधी मध्यरात्रीही एजंट घरी येऊन पैशाची मागणी करत असतात. महिलांना अपशब्द वापरणे, अगदी धक्काबुक्की करण्यापर्यंत एजन्टांची मजल गेली आहे, असा दावाही या पत्रात करण्यात आला आहे.
व्याजाचा दर 24 टक्के असला तरी प्रत्यक्षात तो 28 ते 36 टक्क्यांपर्यंत जात आहे. त्यामुळे हे कर्ज फेडणे या महिलांच्या दृष्टीने अशक्य झाले आहे. त्यामुळे अनेक महिलांनी आपले गाव-घर सोडले आहे. केवळ रत्नागिरी जिल्ह्यातील कर्जबाजारी महिलांची संख्या अडीच ते तीन हजारांच्या पुढे आहे. सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, ठाणे या जिल्ह्यातही मायक्रो फायनान्स कंपन्यांची अशीच दादागिरी सुरू आहे. राज्याच्या अन्य भागातही हाच प्रकार असल्याचे असे जनता दल सेक्युलर पक्ष तसेच कोकण जनविकास समितीने म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर सरकारने हस्तक्षेप करून या महिलांना कर्जाच्या सापळ्यातून बाहेर काढावे, तसेच, महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या, त्यांना दमदाटी करणाऱ्या, वेळी, अवेळी त्यांच्या घरी जाणाऱ्या, एजंटांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत; अन्यथा हप्ताबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रवक्ते प्रभाकर नारकर, संघटन सचिव संजय परब, सुनील पोतदार, मुंबईचे युवा अध्यक्ष केतन कदम, जिल्हाध्यक्ष जगदीश नलावडे, संजीवकुमार सदानंद, युयूत्सु आर्ते तसेच कोकण जनविकास समितीचे सुरेश रासम, नम्रता जाधव, प्रकाश लवेकर, दिनेश राणे, संग्राम पेटकर यांनी दिला आहे.
हेही वाचा – Pankaja Munde : …अन् पंकजा मुंडे म्हणाल्या, पाहताय ना देवेंद्रजी; सुरेश धसांच्या कार्यक्रमात जोरदार टोलेबाजी