कोकणातील चाकरमान्यांच्या मार्गात खड्डे, पावसाचे विघ्न

१२ तासांच्या प्रवासाला २४ तास, १ लाख लोक सिंधुदुर्गात दाखल, खरेदीसाठी बाजारपेठा सजल्या

potholes on flyover in Bhiwandi

गणेशोत्सवासाठी खासगी आणि सरकारी वाहनांनी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या मार्गात खड्डे आणि पावसाचे विघ्न आले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर जागोजागी प्रचंड ट्रॅफिक जॅम झाल्याचे दिसून येत आहे. एरव्ही गाडीने मुंबई ते कणकवली हा प्रवास ११ ते १२ तासात पूर्ण होत असताना आता मात्र त्याच प्रवासासाठी २४ तासही कमी पडू लागले आहेत. सालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सवासाठी निघालेल्या चाकरमान्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, गणपतीसाठी सिंधुदुर्गात एक लाख चाकरमानी दाखल झाले असून खरेदीसाठी बाजारपेठा सजल्या आहेत. सिंधुदुर्गात प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात येत आहे.

दोन दिवसांवर गणेशोत्सव आला असताना यंदाही अनेक चाकरमानी रस्ता मार्गे कोकणाकडे निघाले आहेत. काही खासगी वाहनांमधून तर काहीजण खासगी बस, एसटीमधून कोकणात निघाले आहेत. मात्र, यंदा मुंबई-गोवा महामार्गावर वडखळ नाका, खेड, चिपळूण, लांजा, राजापूर अनेक इतरही ठिकाणी रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. त्यातून वाहन चालवताना वाहन चालकांची तारांबळ उडली. परिणामी वाहनांचा वेग कमी होत असल्यामुळे जागोजागी ट्रॅफिक जॅम होत आहे. पनवेल ते चिपळूण या प्रवासाला एरव्ही पाच तास लागतात. मात्र, खड्डे आणि त्यामुळे होणार्‍या ट्रॅफिक जॅममुळे सध्या या पाच तासांच्या प्रवासाला दहा तास लागत आहेत. त्यापुढीलही मार्ग काही चांगला नाही. त्यामुळे दहा-बारा तासांमध्ये होणार्‍या प्रवासाला चक्क २४ तासांपेक्षाही जास्त वेळ लागत आहे. रस्त्यावरील खड्डे आणि कोसळणारा पाऊस यामुळे वाहनांची गती कमी झाली आहे.

दरम्यान, गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे एक लाखांपेक्षा जास्त चाकरमानी दाखल झाले आहेत. यावर्षी कोरोनाचा संसर्ग कमी असल्याने चाकरमानी मोठ्या संख्येने जिल्ह्यात दाखल होत आहे. दोन लाखांच्या वर चाकरमानी येतील अशी शक्यता आहे. जिल्ह्यात 69 हजार 362 घरगुती गणपती विराजमान होणार आहेत. गणेशोत्सव शांततेत पार पाडावा यासाठी पोलीस खात्याने सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला आहे तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळून साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. जिल्ह्यात रेल्वे, एसटी, खासगी बस आणि मिळेल त्या वाहनाने गणेशभक्त जिह्यात दाखल होत आहेत गणेशोत्सवसाठो येणार्‍या चाकरमान्यांना अडचणी येऊ नयेत यासाठी जिल्ह्याच्या सर्व प्रवेशद्वारावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच रेल्वे व बस स्थानकांवरही पोलीस बंदोबस्त आणि तपासणीसाठी आरोग्य पथके तैनात केली आहेत. जिह्यात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.