सिंधुदुर्ग – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थिर सर्वेक्षण पथके तैनात केली आहेत. या पथकांमार्फत वाहनांची तपासणी करून संशयास्पद वस्तू जप्त केल्या जात आहेत. ज्यात आतापर्यंत 3 कोटी 14 लाख 94 हजार 747 रुपयांची बेकायदा मालमत्ता जप्त करण्यात आली, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी रवी पाटील यांनी दिली आहे.
पोलीस, आयकर, उत्पादन शुल्कचे अधिकारी तैनात
निवडणूक काळात लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेनुसार राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी मतदारांना कोणत्याही प्रकारचे प्रलोभन दाखवू नये, अशी तरतूद आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या अंमलबजावणी यंत्रणा कार्यरत असून, जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात स्थिर सर्वेक्षण पथके (एस.एस.टी.) आणि व्हीडीओ व्हीविंग टीम (व्ही.व्ही.टी) पथकांबरोबरच पोलीस दलाची पथके, तसेच जिल्हा व राज्य सीमावर्ती पथके, राज्य उत्पादन शुल्क विभाग, आयकर, वस्तु व सेवाकर, वन विभाग यांची संयुक्त पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच विविध विभागाच्या अंमलबजावणी यंत्रणाही नियुक्त करण्यात आल्या आहेत.
सर्वच नागरिकांच्या वाहनांची तपासणी
स्थिर आणि भरारी पथकांना प्रत्येक वाहनाची तपासणी करून संशयास्पद काही आढळल्यास पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना आहेत. निवडणूक काळात विविध पक्षांचे नेते आणि स्टार प्रचारक हवाई मार्गाने दौरे करतात. त्यांचे हेलिकॉप्टर्स आणि विमानांची देखील तपासणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे. सर्वच नागरिकांच्या वाहनांची तपासणी केली जाते व त्यामध्ये राजकीय पक्ष किंवा इतर कोणत्याही प्रकारचा अपवाद केला जात नाही. स्थिर सर्वेक्षण पथक नियुक्त असलेल्या ठिकाणांहून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी होते, पथकामध्ये पोलीस कॉन्स्टेबलसह महसूल आणि इतर विभागाचे कर्मचारी असतात. तपासणी करताना नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेतली जाते. संशयास्पद वस्तू आढळल्यास, जसे की पैसा, दारू, मौल्यवान धातू, त्या जप्त करून नियमाप्रमाणे कारवाई केली जाते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीतील आचारसंहितेदरम्यान एसएसटी, एफएसटी पोलीस दल आणि आयकर विभागामार्फत आतापर्यंत एकूण 28 लाख 90० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तर एफएसटी, एसएसटी, पोलीस दल व राज्य उत्पादन शुल्क विभागाने 02 कोटी 55 लाख 95 हजार रुपयांची अवैध दारु जप्त केली असून 47 हजार 400 रुपयांचे अंमली पदार्थ तर 29 लाख रुपयांचे इतर साहित्य (सिगारेट पॅकेट्स, मद्य निर्मितीसाठी लागणारे रसायन) सर्व अंमलबजावणी यंत्रणा व स्थिर आणि भरारी पथकांनी जप्त केले आहे. एकूण 3 कोटी 14 लाख 94 हजार 747 रुपये किंमतीचा माल जप्त करून कार्यवाही केली आहे. यामुळे मतदारांना प्रलोभन देऊन मते मिळवण्याच्या प्रकाराला आळा बसला आहे. तरीही असा कोणताही प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आल्यास, सी-व्हिजिल ॲपद्वारे तक्रार करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे.
हेही वाचा : NCP Sharad Pawar : शरद पवारांच्या सभेत पावसाची हजेरी; म्हणाले, आता निकाल चांगला लागेल
Edited by – Unmesh Khandale