Homeमहाराष्ट्रकोकणPravin Darekar : आई वडिलांच्या काबाडकष्टाचे पांग फेडण्याची जबाबदारी आपली, दरेकरांचा विद्यार्थ्यांना...

Pravin Darekar : आई वडिलांच्या काबाडकष्टाचे पांग फेडण्याची जबाबदारी आपली, दरेकरांचा विद्यार्थ्यांना सल्ला

Subscribe

दापोली येथील श्रद्धा शिक्षण संस्था संचलित वेळवी पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा रौप्य महोत्सव वर्षपूर्ती सोहळ्याचे आज आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या भाजपा विधान परिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी विद्यार्थी व पालक यांच्याशी संवाद साधत आपले आई-वडील काबाडकष्ट, मेहनत घेत असतील तर त्यांचे पांग फेडण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची आहे, असा मोलाचा सल्ला दिला.

दापोली : येथील श्रद्धा शिक्षण संस्था संचलित वेळवी पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा रौप्य महोत्सव वर्षपूर्ती सोहळ्याचे आज आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या भाजपा विधान परिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी विद्यार्थी व पालक यांच्याशी संवाद साधत आपले आई-वडील काबाडकष्ट, मेहनत घेत असतील तर त्यांचे पांग फेडण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची आहे, असा मोलाचा सल्ला दिला. तसेच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकच या ठिकाणी पी. जी. इन्स्टिट्युट सुरू करणार, असे आश्वासनही दरेकरांनी दिले. याप्रसंगी माजी आमदार सूर्यकांत दळवी, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिंदे, भाजपा जिल्हाध्यक्ष केदार साठे, रोहित कटीयार, जया साळवी, संतोष घोसाळकर, श्रद्धा बेलोसे, जयवंत दळवी, नाना महाले यांसह मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक वर्ग उपस्थित होते. (Praveen Darekar statement that it is the responsibility of students to pay for the hard work of their parents)

विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधताना दरेकर म्हणाले की, एखादी संस्था सुरू करणे सोपी असते, परंतु सलग 25 वर्ष त्या संस्थेचा प्रवास अविरहितपणे सुरू ठेवणे अवघड काम असते. माणसाचे वय जसजसे वाढत जाते तसतसे माणूस म्हातारा होत असतो. परंतु संस्थेच्या बाबतीत नेमके उलटे आहे. संस्था जेवढी जुनी होईल तेवढी पुढे जात असते आणि तरुण होत असते. आज बदलत्या युगासोबत आपली संस्था प्रामाणिकपणे पुढे नेण्याचे काम सूर्यकांत दळवी यांच्या माध्यमातून होत आहे.

या ठिकाणी छोटे छोटे विद्यार्थी बघून मला माझे शालेय जीवन आठवले. मंडणगड सारखाही आमचा तालुका मागासलेला आहे. मी शाळेत जायचो त्यावेळी आई-वडील काबाडकष्ट करायचे. वडिलांची नोकरी गेली होती. आपली मुलं शिकली पाहिजेत हा माझ्या आईला ध्यास होता. म्हणून माझी आई डोक्यावर मासळीची पाटी घेऊन गावागावात विकायला जायची. तिने कष्ट घेतले, अपार मेहनत घेतली आणि मला शिकवले. म्हणून प्रवीण दरेकर आज तुमच्यासमोर प्रमुख पाहुणा म्हणून बोलायला उभा आहे.

हेही वाचा – Ajit Pawar : धनंजय मुंडेंवर खालचे कार्यकर्ते खापर फोडतायत, अजित पवारांची कोणावर टीका?

तुम्ही शिकला नाहीत तर भविष्यात आयुष्यात काहीच करू शकणार नाहीत. आज सुदैवाने तुम्हाला शिक्षणाच्या व्यवस्था उभ्या आहेत. तुमचे आई-वडील मेहनत घेत असतील तर त्याचे पांग फेडण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे नेतृत्व आहे. शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही विषयांना पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्त्व देत आहेत. या आधी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नव्हते, परंतु मोदींचे सरकार आल्यावर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण झाले. काँग्रेस सरकारच्या राजवटीत जेवढा आरोग्यावर खर्च केला गेला नाही तेवढा खर्च आणि योजना मोदी सरकारच्या माध्यमातून देशात झाल्या असल्याचेही दरेकर म्हणाले.

तुमच्यात आत्मविश्वास असेल आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर माझ्या कोकणातील, खेड्यातील मुलं सर्व ठिकाणी प्रथम क्रमांकावर आल्याशिवाय राहणार नाहीत. माझा कोकण विकसित झाला पाहिजे. कोकणात विद्वत्ता आहे. कोकणातील डॉक्टर अमेरिकेत शास्त्रज्ञ आहेत. विचारवंत, साहित्यिक, जे-जे थोर महापुरुष झाले ते कोकणातून जातात. ही आपल्याला कोकणाची विरासत आहे. कोकण जर एवढे वैभव संपन्न असेल तर मग त्या कोकणाला पुढे नेण्याचे काम आमच्यासारख्या राजकारणी लोकांनी करायला पाहिजे. पालकमंत्री पद मिळतेय का? यात वेळ घालवण्यापेक्षा मला जे काही पद मिळालेय त्यातून मी कोकणासाठी काय देऊ शकतो? हा विचार जेव्हा आम्ही करू तेव्हा कोकण हा महाराष्ट्रात सर्वाधिक संपन्न प्रदेश असेल, असा विश्वासही दरेकरांनी व्यक्त केला.

हेही वाचा – Suresh Dhas : ती क्लिप 15 दिवस चालणार, डिलीट करू नका; सुरेश धस यांचे आवाहन

मी आज मुंबई बँकेचा अध्यक्ष आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षण संस्था, कारखान्यांना मदत करतो. अनेक कारखाने, शिक्षण संस्था माझ्या मदतीने उभ्या आहेत. आपल्या कोकणातील माणूस समाधानी मानसिकतेचा आहे. परंतु आता जग बदलत आहे. त्यामुळे आपल्याला त्या मानसिकतेत राहून चालणार नाही. जगाच्या पाठीवर कोकणचा माणूस प्रत्येक क्षेत्रात पुढे असला पाहिजे, ही भूमिका घेऊन आपण सर्वांनी काम करण्याची गरज आहे. कोकणातील राजकारणात मला अजिबात रस नाही. परंतु तुमच्यासारखी माणसे पुढे आली तर जेवढी आर्थिक, सरकारी ताकद लागेल ती सारी ताकद उभी करू. पण आपला कोकण विकसित झाला पाहिजे, अशी भावनाही दरेकरांनी व्यक्त केली.

आपल्या पक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची भविष्यातील वाटचाल कशी असावी? जेणेकरून त्यांची वाटचाल योग्य दिशेने होईल यासाठी शिबीर, कॅम्प घेतले तर विद्यार्थी भरकटलेला दिसणार नाही. केवळ गावाला रस्ता पाहिजे, पाणी, सभा मंडप पाहिजे या तीन-चार गोष्टी भोवतीच राजकारण्यांचे राजकारण चालू आहे. परंतु मोदी राजकारणाची दिशा बदलत आहेत. देशाचे पंतप्रधान याआधी कधीच छोट्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत नव्हते. पण पंतप्रधान मोदी आठवणीने विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी बोलतात. त्यांना दिशा देण्याचे काम करतात. अशा प्रकारचा सजग पंतप्रधान देशातील पिढीला घडवण्यासाठी काम करतो आहे. त्या दिशेने आपण काम केले पाहिजे. भविष्यात तसे नियोजन भाजपाचे कार्यकर्ते करतील, असेही दरेकर म्हणाले.

हेही वाचा – Sam Pitroda : बेकायदेशीर बांगलादेशींबाबत सॅम पित्रोदांचे वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा काँग्रेसवर निशाणा