राज्यपाल कोश्यारी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; 26/11 मुंबई हल्ल्यातील शहिदांना चप्पल घालून केले अभिवादन

koshyari controversy governor bhagat singh koshyari salutes mumbai attack martyrs by wearing slippers

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सातत्याने वादग्रस्त विधान करत नव्या राजकीय वादाला तोंड फोडत आहेत. त्यामुळे राजकारणात कोश्यारी आणि वाद हे समीकरण झालेय. कोश्यारी आज पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आज मुंबईतील पोलीस मुख्यालयात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 26/11 मुंबई अतिरेकी हल्ल्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यातील चप्पल बाजूला काढून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. मात्र राज्यपाल या प्रतिष्ठीत पदावर बसलेल्या भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई हल्ल्यातील शहिदांना चप्पल घालून अभिवादन केले. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावरून विरोधकांनी आता राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 26/11 मुंबई अतिरेकी हल्ल्यातील शहीद जवानांना अभिवादन केले. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच सेवानिवृत्त पोलीस अधिकारी उपस्थित होते.


26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या जखमा आजही भरल्या नाहीत. या हल्ल्यात अनेक पोलीस जवांनी जीवाची बाजी लावत मुंबईकरांचे प्राण वाचवले. मात्र यावेळी लढताना करकरे, कामटे, साळस्कर या पोलीस अधिकाऱ्यांना वीरमरण आले. त्यांच्या कर्तृत्त्वाची आणि त्या काळ्या दिवसाची आजही आठवण काढली तरी अंगावर काटे येतात. या शहीदांना अभिवादन करण्यासाठी मुंबई पोलिसांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

शहीदांच्या अभिवादन कार्यक्रमासाठी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये , पोलिस महासंचालक रजनीश सेठ व मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी पायातील चप्पल काढून हुतात्मा स्मारकात शहिदांना पुष्पचक्र अर्पण करत आदरांजली वाहिली. मात्र राज्यपाल कोश्यारींनी अभिवादनावेळी चप्पल काढलीच नाही, यातून त्यांनी शहीदांचा अपमान केल्याचं म्हटंल जात आहे. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी आता पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

या अभिवादन कार्यक्रमात पोलिस बँड पथकाने ‘सलामी शस्त्र’ व ‘बिगुलर लास्ट पोस्ट’ वाजवत आदरांजली वाहिली. सर्व मान्यवर, गणवेशातील अधिकारी व पोलिस जवानांनी हुतात्म्यांना सलामी दिली. यावेळी राज्यपालांनी देखील उपस्थित हुतात्मा पोलिस कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काही दिवसांपासून सतत वादग्रस्त विधान करत आहे. यात अलीकडेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान करत नवा राजकीय वाद ओढावून घेतला. त्यांच्या वक्तव्यावरून राज्यात वातावरण प्रचंड तापलेय. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.


हेही वाचा : देशावर पुन्हा दहशतवादी हल्ला होऊ नये म्हणून नागरिकांनी सतर्क राहावे; फडणवीसांचे आवाहन