बीड : राज्याच्या राजकारणात काका-पुतण्यांचा वाद हा कायम आहे. आत्तापर्यंत ठाकरे काका-पुतणे, पवार काका-पुतणे आणि मुंडे काका-पुतणे हे तर सर्वांनाच माहीत आहेत. पण आता या काका-पुतण्यांच्या नावामध्ये भर पडली आहे ते आणखी एका काका-पुतण्याची आणि ते आहेत क्षीरसागर काका-पुतणे. जयदत्त क्षीरसागर हे राजकारणातील प्रतिष्ठित नाव आहे. त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर जे राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार यांच्या गटात आहेत, गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहेत. पण आता जयदत्त क्षीरसागर यांचे आणखी एक पुतणे चर्चेत आले आहेत, ते म्हणजे योगेश क्षीरसागर. योगेश क्षीरसागर यांनी हे आज (ता. 23 ऑगस्ट) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. परंतु या प्रवेशाबाबत जयदत्त क्षीरसागर यांच्याकडून मोठा खुलासा करण्यात आला आहे. (Kshirsagar’s uncle-nephew sparks controversy in Beed politics)
हेही वाचा – Rohit Pawar : “भाजपच्या मुळावर घाव घालणे गरजेचे…” रोहित पवारांची सडकून टीका
योगेश क्षीरसागर आणि त्यांच्या पत्नी सारिका क्षीरसागर हे दोघेही मुंबईत येऊन प्रवेश करणार आहे. या निमित्ताने बीडमध्ये मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे. परंतु, या पोस्टरवर माजी आमदार जयदत्त क्षीरसागर यांचा सुद्धा फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या सहमतीनेच हा पक्ष प्रवेश होत आहे का? ते स्वतः सुद्धा पक्ष प्रवेश करणार आहेत का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत. परंतु, याबाबत आता खुलासा करत जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितले आहे की, आज मुंबईमध्ये होत असलेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाशी माझा कसलाही संबंध नाही. सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय मी कुठलाही राजकीय निर्णय घेणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मी यापूर्वीही जाहीर केली होती. तरीही माझा फोटोचा वापर करून कार्यकर्त्यांची व जनतेची दिशाभूल व संभ्रम निर्माण करणाऱ्या चुकीच्या जाहिराती व बातम्यांवर कृपया विश्वास ठेवू नये.
मागील आठवड्यात गुरुवारी (ता. 17 ऑगस्ट) शरद पवार यांची बीडमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेमध्ये जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे आणि बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी जोरदार भाषण केले. त्यानंतर आता या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी अजित पवार गटाकडून देखील सभा आयोजित करण्यात आली आहे. येत्या रविवारी 27 तारखेला ही सभा होणार आहे. त्यामुळे त्याआधीच योगेश क्षीरसागर यांचा पक्ष प्रवेश हा महत्त्वाचा मानला जात आहे. तर जयदत्त क्षीरसागर यांचा या पक्ष प्रवेशाला कोणताही पाठिंबा नसल्याचे त्यांनी केलेल्या खुलाश्यातून स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे संदीप क्षीरसागर यांच्याप्रमाणेच काकाला कंटाळून योगेश क्षीरसागर यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
तर याआधी देखील जयदत्त क्षीरसागर यांनी राज्याच्या राजकारणाबाबत मत व्यक्त करत म्हटले होते की, मागील 50 वर्षे जिल्ह्यातील जनतेने आणि माझ्या जिवलग कार्यकर्त्यांनी राजकीय व सार्वजनिक प्रवासात प्रेम आणि पाठबळ दिलेले अशा जिवाभावांच्या लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय मी कोणताही राजकीय निर्णय घेणार नाही. आपण कधीही राजकीय स्वार्थासाठी कुठलाही निर्णय घेतला नाही. जनतेचा कौल असेल तोच आपला राजकीय निर्णय असेल, असे जयदत्त क्षीरसागलर यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले होते.