Homeमहाराष्ट्रकोकणKudal News: कुडाळमध्ये ठाकरेंना धक्का! नगरपंचायतीवर भाजपने फडकविला झेंडा; एका नगरसेविकेने गेम...

Kudal News: कुडाळमध्ये ठाकरेंना धक्का! नगरपंचायतीवर भाजपने फडकविला झेंडा; एका नगरसेविकेने गेम केला

Subscribe

Kudal Nagarpanchayat election : कुडाळ नगरपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता होती. पण, येथे भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला आहे.

सिंधुदुर्ग : कुडाळ नगरपंचायतीत सत्ताधारी महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीचं एक मत फुटल्यानं कुडाळ नगपंचायतीची सत्ता भाजपकडे गेली आहे. येथून भाजपच्या नगरसेविका प्राजक्ता अशोक बांदेकर यांची नगराध्यक्षपदी निवड झाली आहे. नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीनं जोरदार फिल्डिंग लावली होती. मात्र, एका मतानं महाविकास आघाडीचा गेम केला आहे.

कुडाळ नगरपंचायतीत शिवसेना ( ठाकरे गट ) आणि काँग्रेस, अशी महाविकास आघाडीची सत्ता होती. दोन्ही पक्षात ठरलेल्या अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसच्या अक्षता खटावकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आपल्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे नगराध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला.

हेही वाचा : 16 जानेवारीच्या रात्री काय घडलेलं? सैफन दिली खडान-खडा माहिती; म्हणाला, हल्लेखोरानं…

सोमवारी 20 जानेवारीला नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीतर्फे शिवसेना ठाकरे पक्षाच्या नगरसेविका सई काळप तर महायुतीकडून प्राजक्ता बांदेकर या दोघींनी उमेदवारी अर्ज मुख्याधिकारी अरविंद नातू यांच्याकडे सादर केला होता. त्यापार्श्वभूमीवर आज शुक्रवारी नगराध्यपदाची निवडणूक झाली.

कुडाळ नगरपंचायतीची नगरसेवकसंख्या 17 आहे. यात ठाकरे शिवसेनेचे 7, काँग्रेसचे 2 मिळून महाविकास आघाडीचे 9 आणि भाजपचे 8 नगरसेवक, असे पक्षीय बलावल आहे. केवळ 1 नगरसेवक नगराध्यक्ष ठरवणार होता. त्यातच ठाकरे गटाच्या एक नगरसेविका नॉटरिचेबल होत्या. इथेच नगरपंचायत निवडणुकीचा गेम फिरला.

कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपच्या प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. प्राजक्ता बांदेकर यांना 9 मते पडली आहेत. ठाकरे गटाच्या नॉटरिचेबल असलेल्या नगरसेविकेने भाजपच्या पारड्यात मत टाकल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या ताब्यात असलेली नगपंचायत हातातून निसटली असून मोठा धक्का बसला आहे. विधानसभेला सिंधुदुर्ग-कुडाळमध्ये शिवसेनेचे ( ठाकरे गट ) वैभव नाईक यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यातच आता कुडाळची नगरपंचायतही ठाकरेंच्या ताब्यातून गेली आहे.

हेही वाचा : “आदित्य ठाकरे बालिश, बिघडलेले कार्टे, मंत्री असताना दोन वर्षे फक्त…”, भाजपच्या मंत्र्यानं सुनावलं