गुटखा तस्करी प्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुख अडचणीत; पक्षप्रमुखांच्या आदेशानंतर पदावरुन हटवलं

गुटखा तस्करी प्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर पदावरुन हटवण्यात आलं आहे. नवीन शिवसेना बीड जिल्हा प्रमुखाची नियुक्ती लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे. कुंडलिक खांडे यांच्यावर दोन दिवसांपूर्वी गुटखा साठा प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण राज्यभर गाजलं. त्यांनतर फरार असतानाही शिवसेना सचिव अनिल देसाई यांच्या स्वागताला ते हजर होते. यावरून चांगलाच वाद पेटला. हेच सर्व खांडे यांच्या अंगलट आलं.

बीड जिल्ह्यातील तीन ते चार ठिकाणी पाच दिवसांपूर्वी गुटख्याच्या गोदामावर छापा घालत प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक कुमावत यांच्या पथकाने लाखो रुपयांचा गुटखा पकडला होता. यावेळी हा सगळा धंदा शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचा असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर कुंडलिक खांडे आणि आबा मुळे यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल झाला.

दरम्यान, बीड जिल्ह्याच्या इतिहासात एखाद्या जिल्हाप्रमुख पदावर असलेल्या व्यक्तीवर गुटखा तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच घटना आहे. या घटनेनंतर सुद्धा खांडे जिल्ह्यात पक्षाच्या कार्यक्रमात दिसले. या सगळ्या प्रकरणाची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये बीड जिल्हाप्रमुख पदाला स्थगिती अशा मथळ्याखाली वृत्त देण्यात आलं आहे. शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार शिवसेना बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या पदाला स्थगिती देण्यात आली असून नवीन जिल्हाप्रमुखाचे नाव पक्षप्रमुख लवकरच जाहीर करतील असं म्हटलं आहे.