Homeमहाराष्ट्रKurla Bus Accident : कामाच्या पहिल्याच दिवशी तिने गमावला जीव, 19 वर्षीय...

Kurla Bus Accident : कामाच्या पहिल्याच दिवशी तिने गमावला जीव, 19 वर्षीय आफरीनच्या घरच्यांनी काय सांगितले?

Subscribe

कुर्ला बस अपघातात 19 वर्षीय आफरीन शहा हिने जीव गमावला आहे. कामाच्या पहिल्या दिवशी तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती तिच्या कुटुंबियांकडून देण्यात आली आहे.

मुंबई : एका भरधाव वेगात असलेल्या बेस्टच्या बसमुळे मुंबईतील कुर्ला येथे मृत्यूचे तांडव पाहायला मिळाले. कुर्ला येथील एलबीएस रोडवर सोमवारी (ता. 09 डिसेंबर) रात्री 9.15-9.30 वाजताच्या सुमारास बेस्टचा भीषण अपघात झाला. कुर्ला (प.) रेल्वे स्थानक येथून निघालेली 332 क्रमांकाची बस ही अंधेरी पूर्व रेल्वे स्थानकाच्या दिशेने निघाली होती. परंतु, ही बस एलबीएस मार्गावर आल्यानंतर चालक संजय मोरे याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यानंतर साधारणतः 300 ते 400 मीटर अंतरामध्ये या बसने 50 पेक्षा अधिक वाहनांना आणि एकूण 49 जणांना धडक दिली. यामध्ये आतापर्यंत 06 निष्पाप जीवांचा मृत्यू झाला आहे. तर 43 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Kurla Bus Accident 19-year-old Afreen Shah lost his life on the first day of work)

कुर्ला बस अपघातात जीव गमावलेल्यांमध्ये 19 वर्षीय आफरीन शहा हिचा समावेश आहे. अपघाताच्या दिवशी आफरीनच्या नोकरीचा पहिला दिवस होता. परंतु, तिच्या नोकरीचा हाच पहिला दिवस शेवटचा दिवस ठरल्याने नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती देत 19 वर्षीय आफरीन शहा हिचे काका मोहम्मद युसूफ यांनी सांगितले की, आफरीन ऑफिसचा पहिला दिवस भरून घरी परतत होती. घटनेच्या दिवशी ती सायंकाळी कुर्ला स्थानकावर पोहोचली. इथे येऊन तिने तिच्या वडिलांना फोन केला. घरातील कोणी मला रेल्वे स्टेशनला घ्यायला येऊ शकते का? अशी विचारणा तिने तिच्या वडिलांना केली. परंतु, सध्या घरी कोणीही नसल्याने तिला कोणीही घ्यायला येऊ शकत नाही, असे तिच्या वडिलांकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा… Kurla Bus Accident : कुर्ला बेस्ट अपघातात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात हे कारण आले समोर

वडिलांशी फोनवर बोलणे झाल्यानंतर आफरीन घरी येण्यासाठी पायी निघाली. याचवेळी ती एलबीस रोडवर आली असता तिच्या या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर साधारण 10 वाजता घटनास्थळी तिचा फोन सापडला. यावेळी तिच्या फोनमध्ये तिने तिच्या वडिलांना शेवटचा फोन केल्याचे पाहायला मिळाले. ज्यामुळे तत्काळ तिच्या वडिलांना याबाबतची माहिती देण्यात आली. आफरीनचे कुटुंबीय रुग्णालयात पोहोचले असता त्यांना तिच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. परंतु, या घटनेनंतर आफरीनच्या कुटुंबियांवर मोठा आघात झाला असून नव्याने कामावर रुजू झालेल्या आफरीनचा असा करूण अंत झाल्याने अनेकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


Edited By Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -