मुंबई : कुर्लामध्ये बेस्ट बसचा अपघात झाला आणि त्यामध्ये आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण राज्यभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईसारख्या वर्दळीच्या शहरामध्ये असा अपघात घडल्याने अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. या अपघाताची दखल आता राज्य सरकारने घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत मृतांच्या वारसांना 5 लाख देण्याची घोषणा केली आहे. तर, चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असल्याचेदेखील सांगितले आहे. (Kurla Bus Accident CM Devendra Fadnavis tweeted about incident)
हेही वाचा : Kurla Bus Accident : कुर्ला बेस्ट अपघातात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात हे कारण आले समोर
कुर्ला येथे झालेल्या बस अपघातात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून 49 जण जखमी झाले आहेत. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी असल्याचेही म्हटले आहे. तर, जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. तसेच, या घटनेमध्ये जखमी झालेल्यांवर उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यासाठी आदेश देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात काही लोकांचे मृत्यू झाले, त्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना…
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) December 10, 2024
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील ट्वीट करत मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच, या दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. “सर्वांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या घटनेची सखोल चौकशी केली जाणार असून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.” असे ट्वीट केले आहे.
कुर्ला रेल्वे स्थानक परिसरात एस जी बर्वे रोड येथे भरधाव बेस्ट बसनं अनेक लोकांना चिरडल्याची तसंच या अपघातात काहींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आहे. मृत्यू पावलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो.
या…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 10, 2024
दरम्यान, सोमवारी (9 डिसेंबर) रात्री कुर्ला येथील एलबीएस मार्गावर एका भरधाव बेस्ट बसने अनेकांना उडवले. यामध्ये एकूण 6 जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 49 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे कळते. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेस्ट बस चालक संजय मोरे याने मद्यप्राशन केले नसल्याचे सांगितले. तसेच, या बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नसल्याचेदेखील सांगण्यात आले. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.