भास्कर जाधव मंत्री सामंत यांना अडचणीत आणतात तेव्हा…

Bhaskar Jadhav react on post of Assembly Speaker Shiv Sena should not leave the Forest Minister

सत्तेच्या अपेक्षेने राष्ट्रवादी काँगे्रसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत दाखल झालेल्या माजी मंत्री भास्कर जाधव यांची सेनेप्रति असलेली निष्ठा अधिकच कमी होत चालल्याचं दिसू लागलंय. कोकणच्या दौर्‍यात जाधव यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केला. पण तरीही ते सेनेलाच अडचणीत टाकण्याचा प्रयत्न करत असल्याच्या घटना घडत आहेत. सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्वतंत्र कोकण विद्यापीठाच्या मुद्यावरुन त्यांनी आपल्याच पक्षाचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना खडेबोल सुनावले आणि त्यांना माघार घ्यायला लावली. कोकणच्या स्वतंत्र विद्यापीठासाठी कमिटी नेमल्याचं जाहीर करणार्‍या सामंत यांना तारांकित प्रश्नाद्वारे जाधव यांनी जाब विचारला. अखेर अशी कोणतीही समिती स्थापन करण्यात आली नसल्याची जाहीर कबुली मंत्र्यांना भर सभागृहात द्यावी लागली.

स्वतंत्र विद्यापीठाच्या मुद्यावर कोकणात दोन नेत्यांमधील वाद टोकाचा बनला आहे. याला कारणीभूत ठरलेय ते विद्यमान महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये भास्कर जाधव यांना न मिळालेलं स्थान. जाधव हे पूर्वाश्रमीचे शिवसेसैनिक. राज्यात युतीची सत्ता गेल्यावर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले. काँग्रेस आघाडी सरकारमध्ये महत्वाची पदं भोगल्यावर २०१९च्या निवडणुकीत आघाडीची कमजोरी लक्षात घेत त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. मात्र बहुमत मिळूनही युतीची सत्ता आली नाही. नव्या समिकरणात शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला सोबत घेत राज्यात महाविकास आघाडीची स्थापना केली आणि मंत्रिपदासाठी अपेक्षित असलेल्या अनेकांच्या तोंडचा घास गेला. यात अर्थातच भास्कर जाधव होते. मंत्रिपद न मिळाल्याने संधी मिळेल तेव्हा जाधव आपल्या पक्षाला खडेबोल सुनावू लागले आहेत. जाधव नाराज असल्याचं लक्षात आल्यावर कोकण दौर्‍यावर असताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्यांची समज काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तेव्हाही ते आखडून होते.

आता सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी कोकणासाठी स्वंतत्र विद्यापीठाचा मुद्दा लावून धरला. कोकणासाठीच्या स्वतंत्र विद्यापीठाच्या मुद्यावरुन त्यांनी आपल्याच पक्षाचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतांना अडचणीत आणण्याचा चंग बांधला. सामंत यांनी स्वतंत्र विद्यापीठासाठी आपण पुढाकार घेतल्याचं दाखवत या विद्यापीठासाठी स्वतंत्र समिती स्थापन करत असल्याचं जाहीर केलं होतं. कोकणातील वर्तमानपत्रांमधून यासंबंधीच्या बातम्याही झळकल्या. हीच संधी घेत भास्कर जाधव यांनी सामंत यांना विधानसभेतच उघडं पाडलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे जाधव यांनी विद्यापीठाचा प्रश्न उपस्थित केला. याला उत्तर देताना सामंत यांच्यावर कोकणाच्या स्वंतत्र विद्यापीठासाठी कोणतीही समिती स्थापन झाली नाही, असं सांगण्याची नामुष्की ओढावली.