Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र कामगार चळवळीत पुर्वीसारखी ताकद राहिली नाही - शरद पवार

कामगार चळवळीत पुर्वीसारखी ताकद राहिली नाही – शरद पवार

Related Story

- Advertisement -

“एक काळ असा होता की, मुंबई कामगारांची नगरी म्हणून ओळखली जायची. मुंबईतील कापड गिरण्या बंद झाल्या की मुंबई बंद व्हायची. मुंबईची ट्रेन किंवा लोकल बंद झाली की मुंबई बंद झालीच म्हणून समजा. कामगारांची एक जबरदस्त शक्ती मुंबईत होती. आज महानगरपालिकेची कामगार संघटना वगळली तर इतर कोणत्याही कामगार संघटनेत अशी शक्ती उरलेली नाही. ही वस्तूस्थिती आहे. याचे कारण म्हणजे संघटनेचे नेतृत्व करणाऱ्या लोकांनी कामगारांच्या आणि नागरिकांच्या हिताचे रक्षण करण्याची भूमिका आणि संघटना चालवण्याची खबरदारी न घेतल्यामुळे आज कामगार चळवळीचे वाईट चित्र पाहायला मिळत आहे.”, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले. पुणे जिल्ह्याच्या तळेगाव येथे दिवंगत कामगार नेते शरद राव यांच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्याहस्ते करण्यात आले.

- Advertisement -

आपल्या भाषणात शरद पवार पुढे म्हणाले की, “या देशामध्ये तीन नेत्यांची आठवण मला पुन्हा पुन्हा होते. अलीकडच्या काळात मृत्यू पावलेले अटलबिहारी वाजपेयी हे जवळपास सहा वर्ष बेशुद्ध अवस्थेत होते. दिवंगत कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस आठ ते नऊ वर्ष बेशुद्ध अवस्थेत होते. माझे आणखी एक मित्र भारताचे माजी अर्थमंत्री जसवंत सिंह देखील सहा वर्ष बेशुद्ध अवस्थेत होते. देशासाठी काम करणाऱ्या या तीनही नेत्यांशी माझा जवळचा परिचय होता. जॉर्ज फर्नांडिज यांनी कामगार चळवळीचे रोपटे लावले, त्याचे वृक्षात रुपांतर करण्याचे काम मुंबईतील महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केले.”, अशा शब्दात पवार यांनी म्युनिसिपल मजदूर युनियनचे कौतुक केले.

सरकारचा विरोध म्हणजे नक्षलवाद होत नाही

शरद पवार यांना माध्यमांनी सध्या नक्षलवादाचा आरोप असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांना अट केली आहे, यावर पवार यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्याव ते म्हणाले की, “महाराष्ट्र पोलीसांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले की, सरकार बदलण्याची चर्चा काही लोक करत होते. लोकशाही मध्ये एखादी विचारधारा मान्य नसेल तर तो बदलायचा अधिकार लोकांना आहे की नाही? लोकशाहीमध्ये लोकशाहीच्या चौकटीत बसून निर्णय घेण्याचा अधिकार लोकांना आहे. तो अधिकार कुणी गाजवला तर त्यांना नक्षलवादी म्हणून संबोधायचे हे काही योग्य नाही. सनातनच्या प्रतिगामी चळवळीने डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली. समाजातील प्रागतिक विचारांच्या लोकांवर हल्ले करत राहायचे आणि प्रतिगामी फोर्सेसवरील लक्ष हटवण्यासाठी काही वेगळे करण्याचा प्रयत्न सध्या होताना दिसत आहे.”

आणि पवार कामगारांवर वैतागले

- Advertisement -

कामगार नेते शरद राव यांच्या अर्ध पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवार कामगारांना पुरते वैतागले. मंचावर स्वागत करायला येणाऱ्या हौश्या-नौश्यांना अक्षरशः शरद पवारांनी खाली उतरवले. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून म्युनिसिपल मजदूर युनियन आणि म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशनच्या सदस्यांनी गोंधळ सुरु केला. सभागृह छोटे असल्याने इतर तीन ठिकाणी स्क्रीन लावण्यात आल्या होत्या. मात्र पवारांचे स्वागत करायला इच्छुक असणाऱ्यांनी एकच गर्दी केली. पवारांनी ही गर्दी सुरुवातीलाच हटवली, मात्र मंचावरचा कामगार वर्ग काही हलला नाही. पण ते स्क्रीन समोरच उभे असल्याने मग पवारांनी त्यांनाही खाली उतरवले.

- Advertisement -