मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास निश्चित झाला असून राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत येणार हे स्पष्ट झाले आहे. अद्यापपर्यंत महायुती 221 जागांवर आघाडीवर असून मविआला मात्र अजून 100 जागांचा टप्पाही गाठता आलेला नाही. तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने 56 जागा पटकावल्या आहेत. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 16 जागा मिळाल्या आहेत. मविआला भुईसपाट करणाऱ्या या निकालाचे श्रेय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. (Ladki Bahin impact in Maharashtra Election result election 2024)
हेही वाचा : Assembly Election 2024 : मोठा धक्का! काँग्रेसचे बडे नेते पिछाडीवर, CMपदाच्या रेसमध्ये असलेला नेताही बॅकफूटला
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने महिला मतदारांना आकृष्ट करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सुरू केली. ही योजना जुलै महिन्यापासून लागू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. पहिल्या टप्प्यात 31 जुलैच्या आधी अर्ज केलेल्या महिलांच्या बँक खात्यावर ही रक्कम थेट जमा झाली. जुलै-ऑगस्ट असे दोन महिन्यांचे पैसे महिलांना देण्यात आले. रक्षाबंधनाच्या काही दिवासांआधीच ही योजना सुरू करण्यात आली. त्यामुळे महिलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच पैसे देत असल्याचे वाटू लागले. त्यानंतर काहींना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे 4500 रुपये देण्यात आले. परिणामी, महिलावर्गात आनंदाचे वातावरण पसरले. पण लाडकी बहीण योजनेचे पैसे शिंदेमुळे मिळाल्याचा विश्वास महिलांमध्ये उत्पन्न झाला. यादरम्यान महिला मतदारांचा प्रतिसाद पाहता महायुतीच्या नेत्यांमध्ये लाडकी बहीण योजनेवरून श्रेयवादाची रस्सीखेच सुरू झाल्याचेही पाहायला मिळाले.
महिलांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कार्यक्रम, मेळावे घेत महिलांशी सेलिब्रीटी स्टाईल हस्तांदोलन करत त्यांना लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार असे आश्वस्त केले. याचपार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांचा ‘देवाभाऊ’ झाला. तर, अजित पवारांचा दादा झाला. महायुतीच्या नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात महिलांचे मेळावेही घेतले. तसेच निवडणुक प्रचारातही महायुतीच्या नेत्यांनी लाडकी बहीण योजनांचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला. यामुळे लाडकी बहीण योजना फसवी ती बंद होणार अशा विरोधकांनी केलेल्या विधानांचा महिलांवर परिणाम झाला नाही.
उलट भाजप, शिंदे सरकार गेले तर पैसे मिळणार नाही या भीतीने महिला मोठ्या संख्येने यावेळी मतदानासाठी उतरल्या. त्याचाही फायदा महायुतीला झाल्याचे बघायला मिळाले. यामुळे यावर्षी मतदानाची टक्केवारीही वाढली. विधानसभा निवडणूक मतदारांची आकडेवारी पाहता हा फरक लक्षात घेण्यासारखा असून लोकसभेला 2 कोटी 63 लाख 49 हजार 66 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला होता. हीच संख्या वाढून विधानसभेला 3 कोटी 6 लाख 49 हजार 319 महिलांनी मतदान केले. म्हणजेच 43 लाख 253 हजारांने महिलांचे मतदान वाढले. तर दुसरीकडे लोकसभेपेक्षा विधानसभेला पुरुष मतदार मात्र 27 लाख 80 हजारांनी वाढल्याचे पाहायला मिळाले.