मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून येणारा हप्ता नियमीतपणे लाडक्या बहिणींच्या खात्यात जाणे, ही मोठी जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारवर आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही दिवसांमध्येच महिलांच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा करण्यात आला. पण त्यानंतर जानेवारीचा हप्ता सर्व महिलांना मिळणार की नाही आणि अनेक प्रश्न याबाबत निर्माण झाले होते. पण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे जानेवारी महिन्याचा हप्ता 26 जानेवारीआधी जमा करण्यात आला आहे. (Ladki Bahin Yojana eventh installment has arrived in the account of womens)
मंत्री आदिती तटकरे यांनी यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार, लाडक्या बहिणींच्या खात्यात 26 जानेवारीपूर्वी रक्कम जमा होणार आहे. त्यानुसार आता ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी, 24 जानेवारीला म्हणजेच, पहिल्या दिवशी एक कोटी 10 लाख महिलांच्या खात्यात रक्कम जमा झाल्याची माहिती तटकरे यांनी दिली. तर, 26 जानेवारीपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता जमा करण्यात येणार आहे. ज्यामुळे आता या योजनेमुळे लाडक्या बहिणींना सरकारकडून एकूण 10 हजार 500 रुपयांची रक्कम मिळाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला जुलै 2024 पासून सुरुवात करण्यात आली होती. या योजनेद्वारे जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची रक्कम ऑगस्ट महिन्यात एकाच वेळी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती.
हेही वाचा… Pravin Chakravarty : सहा महिन्यांत 48 लाख मतदार कसे वाढले? प्रवीण चक्रवर्तींनी मागितले पुरावे
विधानसभा निवडणुकीवेळी महायुती सरकारने आमचे सरकार पुन्हा आल्यास आम्ही योजनेची रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रुपये असे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता सरकारकडून हे 2100 रुपये कधी देण्यात येतील? याची आस महिलांना लागलेली आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पानंतर त्याबाबत निर्णय होईल, असे सांगितले आहे. त्यामुळे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर महिलांना 2100 रुपये मिळतील, अशी शक्यता आहे. 26 जानेवारीच्या आधी जानेवारी महिन्याचा लाभ मिळेल असा प्रयत्न सुरू आहे, असे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले होते. या सातव्या हप्त्याकरिता सरकारने 3.690 कोटी निधीची तरतूद केल्याचेही तटकरेंनी सांगितले होते. त्यानुसार, आता सातवा हप्ता अखेर महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
जानेवारी २०२५ महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. २४ जानेवारी २०२५ पर्यंत १.१० कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला असून, २६ जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी… pic.twitter.com/fU5dIUr8xe
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) January 24, 2025