(Ladki Bahin Yojana) मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाले. पण आता निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या महिलांनाच याचा लाभ मिळणार असल्याचे महायुती सरकारने जाहीर केले आहे. तर दुसरीकडे, राज्य उत्पादन शुल्काच्या माध्यमातून महसूल वाढीसाठी अभ्यासगट नेमण्यात आला आहे. यावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. (Sachin Sawant’s criticism of the Mahayuti regarding the increase in revenue through excise duty)
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राज्यातील महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जाहीर केली. या योजनेला तुफान प्रतिसाद मिळाला. परिणामी पाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने निर्विवाद विजय मिळविला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी या विजयाचे श्रेयही लाडकी बहीण योजनेलाच दिले. अजित पवार यांनी तर, ही योजना गेमचेंजर ठरेल, असे निवडणुकीपूर्वीच म्हटले होते.
एका बाजूला राज्यातील महिलांना लाडकी बहिण संबोधून ₹१५०० देत स्वतः:ला भाऊ म्हणवून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूला आपल्या भावोजींना दारुच्या आहारी पाठवत बेवडे करायचे. कित्येक महिला रोजंदारीवर काम करतात आणि त्यांचे पती मुले मारझोड करुन व्यसनासाठी पैसे हिसकावून घेतात.दारुच्या व्यसनातून… pic.twitter.com/tj7oIBIYQz
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) January 10, 2025
महायुती पुन्हा सत्तेवर आल्यानंतर, आता प्रत्येक अर्जाची काळजीपूर्वक छाननी झाल्यावरच पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे जाहीर केले. अर्जदार महिलेचे पती प्राप्तिकर भरतात का? अर्जदाराच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे का? एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत का? परितक्त्या, विधवा, निराधार योजनेचा लाभ घेत असतानाही लाडकी बहीण म्हणून लाभ घेतात का? हे तपासण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थिंची संख्या कमी होणार आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर टीकाही केली.
हेही वाचा – Polling in Parli : अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नसतील, आव्हाडांकडून आणखी एक व्हिडीओ शेअर
तर, आता, राज्य उत्पादन शुल्काच्या माध्यमातून महसूल वाढीसाठी गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. याबाबत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत महायुतीला लक्ष्य केले आहे. एका बाजूला राज्यातील महिलांना लाडकी बहिण संबोधून 1500 रुपये देत स्वतः:ला भाऊ म्हणवून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूला आपल्या भावोजींना दारुच्या आहारी पाठवत मद्यपी करायचे. दारूच्या व्यसनातून किती परिवार उद्ध्वस्त झाले आहेत याची गणती करता येणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
लाडकी बहिण योजना ही महिलांच्या उत्थानासाठी होती, असे म्हणणारे सरकार त्याच महिलांना उद्ध्वस्त करणार आहे, असे स्पष्ट दिसत आहे. घरादारावर उठलेले हे सरकार भाऊ की वैरी हे आता भगिनींनी ओळखावे, असे आवाहन करतानाच, राज्य सरकारने आता व्यसनमुक्ती कार्यक्रम बासनात गुंडाळून ठेवावे आणि खुलेआम ‘घरे बुडवा दारू जिरवा’ कार्यक्रम हाती घेऊन दारूचा प्रचार-प्रसार सुरू करावा, असा टोला त्यांनी लगावला आहे. (Ladki Bahin Yojana: Sachin Sawant’s criticism of the Mahayuti regarding the increase in revenue through excise duty)
हेही वाचा – Sanjay Raut : भाजप-ठाकरे गटाची जवळीक वाढली; राऊतांकडून फडणवीसांचे सातत्याने कौतुक