मुंबई : देशभरात रविवारी (26 जानेवारी) प्रजासत्ताक दिन साजरा केला गेला. यावेळी राज्यभरात पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात ध्वजारोहण केले. पण, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सरकारने राज्यात पालकमंत्रिपदावरून वाद निर्माण झाल्यानंतर रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मंत्री आदिती तटकरे यांची नियुक्ती केली असतानादेखील ती रद्द करण्यात आली. असे असले तरीही प्रजासत्ताक दिनादिवशी त्यांनी रायगडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय ध्वजारोहन केले. अशामध्ये त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असताना लाडकी बहीण योजनेविषयी भाष्य केले. (Ladki Bahin Yojna Aditi tatkare statement after flag hoisting in raigad)
हेही वाचा : Coastal Road : मुंबईकरांचा प्रवास होणार वेगवान, उत्तर वाहिनी पुलाचे लोकार्पण, या वेळेत करू शकता प्रवास
महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, “आजच्या दिवशी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्याचा बहुमान मिळणे, म्हणजे तो दिवस लोकप्रतिनिधींसाठी भाग्याचा असतो. तो मला मिळाला याचा आनंद आहे,” अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. यावेळी त्यांना लाडकी बहिण योजनेतील 30 लाख अर्ज बाद होण्याच्या मार्गावर असल्याच्या बातम्या येत आहेत. यावर प्रतिक्रिया विचारली असताना त्या म्हणाल्या की, “मला नाही माहिती हे आकडे येतात कुठून?पण माझी सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की अशा कोणत्याही बातम्या आणि अफवांना बळी पडू नका. 2 कोटी 41 लाख महिलांच्या खात्यात लाभ थेट हस्तांतरण करण्यात आले आहे.” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, “पहिल्या दिवशी 1 कोटी 7 लाख महिलांना लाभ दिला तर शनिवारी (25 जानेवारी) सुद्धा 1 कोटी 25 लाख महिलांना लाभ वितरित झाला आहे. लाभार्थ्यांचे वितरण नेहमीप्रमाणेच सुरू असून ऑक्टोबरमध्ये 9 तारखेला 2 कोटी 34 लाख महिलांना लाभ दिला होता. आता लाभ वितरण 2 कोटी 41 लाख महिलांना झालेला असून त्यामुळे कोणत्याही अफवांना आणि अपप्रचारांना बळी पडू नये.” अशी माहिती त्यांनी दिली. तसेच, “अनेक महिला या दिलेल्या निकषमध्ये बसत नसल्याने स्वतःहून याबाबत आपली भूमिका मांडत आहेत. अनेक महिलांनी निकषात न बसल्याने स्वतःहून रक्कम जमा केली आहे. त्यामुळे, राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या अनेक शासकीय योजनेत आम्ही पुन्हा पडताळणी करत आहोत,” असे स्पष्टीकरण दिले.