लखीमपूर हत्याकांडावरून केंद्र सरकारची नियत कळली – पवार

Ncp chief Sharad Pawar

देशातील शेतकरी शांततेतच आंदोलनाचा प्रयत्न करतो. त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पण ज्यापद्धतीने उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकर्‍यांवर हल्ला झाला त्यावरून जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण झाली. केंद्रातील सरकारची नियत कळाली. तुमच्या हातात सत्ता आहे म्हणून काहीही करणार का? अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लखीमपूर घटनेवरून उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारवर केली.

शरद पवार यांनी मंगळवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यात पवार म्हणाले की, लखीमपूरमध्ये ज्यापद्धतीने शेतकर्‍यांवर हल्ला केला गेला त्याचा मी निषेध व्यक्त करतो. फक्त निषेध केल्याने मृत्यूमुखी पडलेल्यांना शांती मिळणार नाही. घडलेल्या घटनेची संपूर्ण जबाबदारी भाजप, उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारची आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या विद्यमान न्यायमूर्तींच्या नेतृत्त्वात सखोल चौकशी केली गेली पाहिजे. आरोपींना तातडीने कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी शरद पवार यांनी यावेळी केली.

शेतकर्‍याला त्याची बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांची अशापद्धतीने गळचेपी करणे योग्य नाही. या घटनेने केंद्र सरकारची नियत कळाली आहे. तुमच्या हातात सत्ता आहे म्हणून त्याचा गैरवापर करू नका. शेतकर्‍यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका. नाहीतर तुम्हालाच ते भारी पडेल. शेतकर्‍यांचा आवाज दाबण्यात तुम्हाला कधीच यश येणार नाही, असेही शरद पवार म्हणाले.

लखीमपूर घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्याची आणि संवेदना व्यक्त करण्याचाही अधिकार दिला जात नाही. हे नेमकं कोणत्या पद्धतीचं राज्य आहे? विरोधी पक्षाच्या नेत्यांची अडवणूक करता, त्यांना कोंडून ठेवले जात आहे हे योग्य नाही. देशाचा शेतकरी वर्ग एकटा नाही. संपूर्ण देश बळीराजाच्या पाठिशी उभा आहे, असे शरद पवार म्हणाले.