घरदेश-विदेशLal Krishna Advani BharatRatna : लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न जाहीर, राजकीय नेत्यांनी...

Lal Krishna Advani BharatRatna : लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न जाहीर, राजकीय नेत्यांनी दिल्या शुभेच्छा

Subscribe

भाजपा नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार भारतरत्न जाहीर करण्याता आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘X’ (ट्वीट) अकाउंटवर पोस्ट करत ही माहिती दिली. लालकृष्ण आडवाणी तीन वेळा भाजपचे अध्यक्ष राहिले. चार वेळा राज्यसभा खासदार आणि पाच वेळा लोकसभा खासदार राहिले. 1977 ते 1997 या काळात ते पहिल्यांदा केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री बनले, यावेळी त्यांच्याकडं माहिती व प्रसारण मंत्रालयाचा कारभार होता. त्यानंतर 1999 मध्ये अटल बिहारी वाजपेयींच्या पहिल्या सरकारमध्ये ते गृहमंत्री बनले. 29 जून 2002 मधील दुसऱ्या वाजपेयी सरकारमध्ये उपपंतप्रधान बनले.

लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत रत्न पुरस्कारची घोषणा करताना म्हटले आहे की, मला कळवायला अतिशय आनंद होत आहे. लालकृष्ण आडवाणीजी यांना भारत रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यासंदर्भात मी त्यांच्याशीही बोललो आहे. हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. ते आपल्या काळातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक आहेत. त्यांनी भारताच्या विकासात अविस्मरणीय योगदान दिले आहे. तळागाळात काम करण्यापासून ते उपपंतप्रधान म्हणून देशाची सेवा करण्यापर्यंत त्यांचे समर्पण महत्वाचे आहे. त्यांनी गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणूनही आपल्या कामाचा ठसा उमटवला. संसदेतील त्यांची कारकीर्द उल्लेखनीय राहिली आहे.

 

- Advertisement -

भारतरत्न सन्मान जाहीर झाल्याबद्दल ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचे अभिनंदन – एकनाथ शिंदे

सर्वसामान्य नागरिकांचे कल्याण, विकासाचा ध्यास आणि प्रखर हिंदुत्वाचा विचार अंगिकारत राजकीय, सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे पितृतुल्य व्यक्तिमत्त्व लालकृष्ण आडवाणी जी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर होणे ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभे राहावे या विचाराने रथयात्रा काढून आडवाणीजींनी जनजागृती केली. अयोध्येत राम मंदिराची उभारणी झाल्यावर आडवाणीजींच्या योगदानाचे स्मरण ठेवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी हा पुरस्कार जाहीर केला, हे आपल्या भारतीय संस्काराचे द्योतक म्हणावे लागेल. आणीबाणी आणि त्यानंतर ढवळून निघालेल्या राजकीय पटलावर जनसंघ आणि भाजपच्या माध्यमातून देशहिताचा विचार मांडत राहून त्यांनी विरोधी पक्षाची भूमिका कायम चोख निभावली. उपपंतप्रधान म्हणून त्यांचे योगदान कायम स्मरणात राहणार आहे. राजकारणातील तरुण पिढीसाठी मार्गदर्शकाची भूमिका निभावणाऱ्या आडवाणीजी आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची मैत्रीही अनोखी होती. हिंदुत्वाचा विचार आणि श्रीरामाचा ध्यास असलेली ही दोन व्यक्तिमत्वे सकारात्मक राजकीय साथीदार होते. भारतरत्न सन्मान जाहीर झाल्याबद्दल या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचे मी अभिनंदन करतो आणि त्यांना प्रणाम.

ही उपाधी जाहीर झाल्याबद्दल मला व्यक्तिगत आनंद – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारताचे माजी उपपंतप्रधान आणि आमचे ज्येष्ठ नेते, मार्गदर्शक लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर होणे, या एका कणखर व्यक्तिमत्त्वाचा यथार्थ सन्मान आहे, असे सांगत या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे आणि लालकृष्ण अडवाणींचे अभिनंदन केले आहे.

लालकृष्ण अडवाणी यांनी ‘लोहपुरुष’ या नात्याने एक कणखर गृहमंत्री म्हणून देशाची सेवा केली. विशेषत: श्रीरामजन्मभूमीच्या आंदोलनात त्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका राहिली. सुमारे 6 दशके त्यांनी राजकारणात घालविली. एक निष्कलंक व्यक्तिमत्त्व तर ते आहेतच, शिवाय राष्ट्रसेवेत त्यांची मोठी भूमिका राहिली आहे. राजकारणात अशाप्रकारचे चारित्र्य त्यांनी सांभाळले आणि विविध विषयांचा त्यांचा सातत्याने व्यासंग राहिला. त्यांना भारतरत्न ही उपाधी जाहीर झाल्याबद्दल मला व्यक्तिगत आनंद झाला आहे, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

पुरस्कारासाठी अडवाणी यांची निवड योग्य – शरद पवार

भारताचे माजी उपपंतप्रधान व ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याचे आनंद आहे. देशाच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान राहिलेले आहे, मनःपूर्वक अभिनंदन..!

रामभक्तांसाठी अभिमानाची बाब : चंद्रशेखर बावनकुळे

या देशाचे ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री लालकृष्ण अडवाणीजी यांना भारतरत्न देण्याची माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेली घोषणा अत्यंत आनंददायी व सुखद आहे. देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने त्यांचा गौरव होणे ही माझ्यासह प्रत्येक भारतीय व रामभक्तांसाठी अभिमानाची बाब आहे. त्यांचे खूप खूप अभिनंदन.

स्वातंत्र्यानंतर देशाच्या जडणघडणीत अडवाणीजी यांची महत्त्वाची भूमिका आहे. देशाचे उपपंतप्रधान म्हणून त्यांनी केलेली कामगिरी मोलाची आहे. आदरणीय अडवाणीजी यांना ‘भारतरत्न’ घोषित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यांचे मनापासून आभार.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -