घरताज्या घडामोडीलॉजिस्टीक पार्कसाठी आडगावला १०० एकर जागेचे भूसंपादन

लॉजिस्टीक पार्कसाठी आडगावला १०० एकर जागेचे भूसंपादन

Subscribe

स्थायी सभापती गिते यांचा प्रस्ताव महासभेत मंजूर; अनुदानासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविणार

पर्यावरणपूरक, प्रदूषणमुक्त शहराची ओळख कायम राखण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास व नौकावहन मंत्री नितीन गडकरी यांच्या निर्देशांनुसार प्रस्तावित सुरत-चेन्नई महामार्गालगत आडगाव शिवारात लॉजिस्टीक पार्क उभारण्यासाठी १०० एकर जागेचे भूसंपादन करण्याच्या स्थायी समिती सभापती गणेश गिते यांच्या प्रस्तावाला महासभेने शुक्रवारी मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून अनुदान प्राप्त होणार आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्याचे निर्देश महापौर सतीश कुलकर्णी यांनी प्रशासनाला दिले.

के.के.वाघ ते हॉटेल जत्रा दरम्यान उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण गेल्या महिन्यात केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते पार पडले. या लोकार्पण सोहळ्यात गडकरी यांनी नाशिक शहरातील राहण्यायोग्य वातावरण, तुलनेत कमी असलेले प्रदूषण, सुटसुटीत वाहतुकीविषयी कौतुक करताना भविष्यात पुण्यासारखी नाशिकची परिस्थिती होवू नये यासाठी आतापासूनच काळजी घेण्याच्या सूचना महापालिकेतील पदाधिकारी आणि आयुक्तांना केल्या होत्या. नाशिकला प्रदूषणापासून वाचवायचे असेल तर आतापासूनच प्रदूषणकारी घटकांना शहरापासून दूर ठेवले पाहिजे, असे नमूद करताना अवजड वाहने, कंन्टेनर शहरात येऊ न देता शहराबाहेर एखादा लॉजिस्टीक पार्क उभारून त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था करण्याचे सूचित केले होते. मीरा भाईंदर, बदलापुर व भिवंडी येथे तीन हजार कोटी खर्चून तीन लॉजीस्टीक पार्क मंजुर केले आहे. नाशिकमध्ये केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार व खासदार हेमंत गोडसे यांनी पुढाकार घेतल्यास असे लॉजिस्टीक हब उभारता येईल, असे सूचित करताना सुरत-चेन्नई मार्गालगत स्मार्ट सीटीही करता येईल, त्यादृष्टीने प्रशासकीय यंत्रणा, पालिकेने चाचपणी करावी असेही आवाहन गडकरी यांनी केले होते.

- Advertisement -

नाशिकमधून १२२ किलोमीटर लांबीचा सूरत-चेन्नई महामार्ग जात आहे. या महामार्गालगत महापालिकेने जागा उपलब्ध करून दिल्यास लॉजिस्टिक पार्कसाठी सत्वर निधी दिला जाईल, यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश त्यांनी पालिका आयुक्त कैलास जाधव यांनाही दिले होते. स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी यासंदर्भात शुक्रवारी महासभेत पत्र सादर करत आडगाव शिवारात १०० एकर जागेत लॉजिस्टिीक पार्क उभारण्यासाठी जागा संपादीत करून केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची मागणी केली होती. गिते यांच्या या पत्राचे प्रस्तावात रूपांतर करत या प्रस्तावाला मान्यता देत असल्याचे महापौर कुलकर्णी यांनी जाहीर केले.

आडगाव शिवारात प्रस्तावित लॉजिस्टीक पार्कमध्ये ट्रक टर्मिनल, वर्कशॉप, कुलींग प्लांट, गोडावून, शेतीमाल विक्रीसाठी बाजाराची व्यवस्था असेल. याद्वारे शहरात येणारी अवजड वाहतूक लॉजिस्टीक पार्कमध्येच रोखण्यात येईल. येथूनच रिंगरोडद्वारे अन्य शहरांच्या दिशेने वाहने पाठविली जातील.
गणेश गिते, सभापती, स्थायी समिती, नाशिक महापालिका

Manish Katariahttps://www.mymahanagar.com/author/kmanish/
गेल्या १७ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. राजकीय, प्रशासकीय मुद्यांवर वृत्तांकन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -