मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्नीच्या नावे सासरे, मेहुण्यांनी केल्या कोट्यवधींच्या मिळकती

बनावट कागदपत्रांद्वारे प्लॉटची खरेदी विक्री केल्याप्रकरणी मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांच्या पत्नीसह त्यांच्या सासर्‍यांवर गुन्हा दाखल झाला आहे. सासर्‍यांनी २००६-०७ ला खरेदी केलेला भूखंड २०१८ ला हिस्से वाटपात आपल्या पत्नीच्या नावे केल्याचा खुलासा दवंगे यांनी केला आहे.

बनावट कागदपत्रांद्वारे प्लॉटची खरेदी विक्री केल्याप्रकरणी मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांच्या पत्नीसह त्यांच्या सासर्‍यांवर गुन्हा दाखल झाला आहे. सासर्‍यांनी २००६-०७ ला खरेदी केलेला भूखंड २०१८ ला हिस्से वाटपात आपल्या पत्नीच्या नावे केल्याचा खुलासा दवंगे यांनी केला आहे. प्रत्यक्षात दवंगे यांचे सासरे आणि मेहुणे या दोघांनी तब्बल दोन कोटी 25 लाख 73 हजार इतक्या किंमतीच्या आणि अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या मिळकती स्वाती दवंगे यांच्या नावे बक्षीस पत्राने केल्याची बाब पुढे आली आहे. इतका मोठा भूखंड सासरे आणि मेव्हण्याने बक्षीसपात्र दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

बनावट कागदपत्रे आणि बोगस व्यक्ती वारसदार व साक्षीदार खरी असल्याचे भासवत मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांच्या पत्नी स्वाती दवंगे आणि सासरे सुरेश कारे यांच्यासह तब्बल 29 जणांनी ३० प्लॉटची परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी न्यायालयाने 29 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांची प्रतिक्रिया घेतली असता तेजपाल श्रॉफ नावाच्या व्यक्तीकडून आपले सासरे सुरेश कारे यांनी प्लॉट विकत घेतला आणि नंतर कौटुंबिक  हिस्से वाटपात आपली पत्नी स्वाती दवंगे यांच्या नावावर केल्याचे त्यांनी सांगितले. या प्रतिक्रियेच्या अनुषंगाने अधिक माहिती घेतली असता दवंगे यांचे सासरे सुरेश कारे व मुलगा सचिन कारे  या दोघांनी मिळून तब्बल 2 कोटी 25 लाख 73 हजार रुपयांची अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या मिळकती स्वाती दवंगे यांच्या नावे बक्षीस पत्राने केल्याचे पुढे आले आहे. इतकी मोठी मिळकत बक्षीस पत्राने देण्यामागे कारे कुटुंबांचा नेमका उद्देश काय होता याबाबत मात्र माहिती मिळू शकली नाही.

हा निव्वळ योगायोग का?

बक्षीस पत्र दस्त क्रमांक 10264/2017 इतक्या मिळकती कैलास दवंगे यांचे सासरे सुरेश कारे आणि मेव्हणे सचिन कारे यांनी कैलास दवंगे यांच्या पत्नी स्वाती दवंगे यांच्या नावे बक्षीस पत्राने केल्या आहेत. तर दिंडोरी तालुक्यातील जवळके वणी येथील गट क्रमांक 148 मध्ये  66 गुंठे  बागायती जमीन वडील रामचंद्र जगन्नाथ दवंगे यांनी कैलास दवंगे यांना बक्षीस पत्राने दिली. दवंगे यांना तीन भाऊ आणि दोन बहिणी आहेत. एखाद्या शासकीय अधिकार्‍याच्या पत्नीला इतकी मोठी मिळकत बक्षीस स्वरूपात मिळणे हा निव्वळ योगायोग समजावा का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.  सुरेश काळे आणि सचिन कारे यांनी या मिळकती कधी आणि कशा खरेदी केल्या? इतक्या मोक्याच्या ठिकाणच्या  मिळकती मुलीच्या नावे करण्यामागे कारे कुटुंबांचा नेमका उद्देश काय होता, याची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

मूळात हे प्रकरण माझ्याशी नव्हे तर माझ्या पत्नीशी संबंधित आहे. त्यामुळे माझे नाव त्यात घेण्याचा संबंध नाही. शिवाय प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही. न्यायालयाच्या निकालातून सत्य समोर येईलच. – कैलास दवंगे, मुद्रांक जिल्हाधिकारी

या मिळकती मिळाल्या बक्षिसपत्र

  • आनंदवली येथील सर्व्हे क्रमांक  42 /1,  प्लॉट नं.18,  क्षेत्र 275 चौरस मीटर – किंमत 35 लाख 48 हजार (बक्षिसपत्र)
  • मौजे चांदशी येथील गट नंबर 52/10,  प्लॉट नंबर 12 पैकी क्षेत्र 145.445 चौरस मीटर- किंमत १० लाख 44 हजार (अदलाबदल पत्राने)
  • नाशिक शिवारातील राठी अमराई सर्व्हे क्रमांक  683+684, प्लॉट नंबर 15+22,  क्षेत्र 494.55 चौरस मीटर – एक कोटी 54 लाख 64000 (बक्षिसपत्र)
  • ठाणे जिल्ह्यातील घोडबंदर रोडवरील मोघरपाडा येथील सर्व्हे क्रमांक 64/1,     66/2/65,  सदनिका क्रमांक 504,  क्षेत्र 45.71चौरस मीटर (पार्किंग)
  • जी व्ही  पुरानिक सिटी +  पार्किंग एस एफ-१- ३५ लाख ६१ हजार ५०० (बक्षिसपत्र)