घरमहाराष्ट्रविठ्ठल विठ्ठल गजरी । अवघी दुमदुमली पंढरी॥

विठ्ठल विठ्ठल गजरी । अवघी दुमदुमली पंढरी॥

Subscribe

आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात लाखो भाविकांची अलोट गर्दी

आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविकांनी पंढरपुरात अलोट गर्दी केल्याचे चित्र आहे. रविवारी आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांनी शनिवारपासूनच पंढरपुरात गर्दी केल्याचे चित्र होते. एकादशीच्या दिवशी विठ्ठलाचे दर्शन व्हावे यासाठी अनेक वारकरी शनिवारपासूनच विठ्ठल-रुक्मिणी मंदिराबाहेर दर्शनाच्या रांगेत उभे होते. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या सावटामुळे भाविकांना आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेण्यात अडचणी येत होत्या.

यंदाच्या वर्षी मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यामुळे आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विठ्ठल दर्शनाची रांग मंदिरापासून दोन किलोमीटरच्या अंतरापेक्षाही पुढे गेल्याचे पाहायला मिळाले. दर्शनाच्या रांगेत एक लाखाहून अधिक भाविक असल्याचा दावा करण्यात येत आहे. केवळ मंदिर दर्शनासाठीच नव्हे, तर चंद्रभागा स्नानासाठीही भाविकांची गर्दी झाली आहे. संपूर्ण पंढरीनगरी विठुनामाने दुमदुमू लागली आहे. संपूर्ण वारीमार्ग विठ्ठलमय झाला आहे.

- Advertisement -

पंढरपूरमध्ये दाखल झालेल्या वारकर्‍यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी काळजी घेण्यात येत आहे. पंढरपूर नगर परिषदेसह पोलीस, एसटी महामंडळ, रेल्वे आदींसह सर्व प्रशासनाकडून योग्य प्रकारे वारकर्‍यांना सोयीसुविधा पुरविण्यात येत आहेत. वाखरी पालखी तळ, वाळवंट, दर्शन रांग या ठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्यात आली असून स्वच्छ पिण्याचे पाणीही उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधाही या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. तसेच नदीपात्रात स्नान करण्यास गेलेल्या भाविकांच्या जीवाला धोका होऊ नये यासाठी जीवरक्षक पथकही नदीपात्रात तैनात करण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -