घरताज्या घडामोडीLata Mangeshkar Passes Away: तुम मुझे यूँ भुला ना पाओगे... गानसम्राज्ञी,...

Lata Mangeshkar Passes Away: तुम मुझे यूँ भुला ना पाओगे… गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांचे देहावसान

Subscribe

गेल्या सात दशकांहून अधिक काळ अगणित संगीतप्रेमींचे भावविश्व समृद्ध करणारा दैवी स्वर अखेर शांत झाला. जगविख्यात पार्श्वगायिका, गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या ९३ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. मुंबईत दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर सायंकाळी त्यांच्यावर शासकीय इतमामात अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सिनेक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

लता मंगेशकर यांना ८ जानेवारी रोजी कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत असल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना न्यूमोनियाची लागण झाल्याचेही समोर आले होते. वयोमानामुळे त्यांना खबरदारी म्हणून उपचारासाठी आयसीयूत ठेवण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर २८ जानेवारीला त्यांचे व्हेंटिलेटर काढण्यात आले होते. मात्र, ५ फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. पण उपचादारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

- Advertisement -

लता मंगेशकर यांचे रविवारी सकाळी ८.१२ मिनिटांनी निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्या बर्‍याही झाल्या होत्या. मात्र, त्यानंतर अवयव निकामी होत गेले, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. प्रतीत समदानी यांनी दिली.

लता मंगेशकर यांना त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला होता. लता, आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ या मंगेशकर या भावंडांमध्ये लतादीदी सर्वात मोठ्या. लता मंगेशकर यांचे मूळ नाव हेमा असे होते. पण काही वर्षांनंतर दीनानाथ यांच्या नाटकातील ‘लतिका’ या पात्राच्या नावावरून त्यांनी लता असे नाव ठेवले असे म्हटले जाते. ऐ मेरे वतन के लोगो आणि वंदे मातरम ही लतादीदींनी गायलेली देशभक्तीपर गिते भारतीय जनमनावर कायम कोरली गेली आहेत. ऐ मेरे वतन के लोगो, हे गीत ऐकताना देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना अश्रू अनावर झाले होते.

- Advertisement -

वडिलांच्या मृत्यूनंतर अवघ्या 13 व्या वर्षी कुटुंबाची जबाबदारी आल्याने त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. १९४२ मध्ये सुरू झालेला त्यांचा प्रवास सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून होता. त्यांनी 36 प्रादेशिक भाषांमध्ये 30 हजारांहून अधिक गाणी गायली होती. यामध्ये 900 हून अधिक हिंदी चित्रपटांचा समावेश आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे ज्येष्ठ गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ज्येष्ठ संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर या सर्वांनीच संगीत क्षेत्रात अमूल्य असे योगदान दिलेले आहे.

सर्वोच्च पुरस्कार

लता मंगेशकर यांना १९६९ मध्ये पद्मभूषण, १९९९ मध्ये पद्मविभूषण आणि २००१ मध्ये ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांना २००९ मध्ये ‘ऑफिसर ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कारदेखील प्रदान करण्यात आला होता.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -