घरताज्या घडामोडीLata Mangeshkar : लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर,...

Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर, शासकीय इतमामात अंत्यसंस्काराच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

Subscribe

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज ९३ व्या वर्षी निधन झाले. त्यांचे पार्थिव हे प्रभूकुंज या निवासस्थानी दुपारी १२.३० वाजल्यापासून ३ वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार सायंकाळी ६.३० वाजता केले जातील. लतादीदींच्या निधनामुळे देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रीय ध्वजदेखील दोन दिवस अर्ध्यावर उतरवण्यात येणार आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्या आहेत.

- Advertisement -

गेल्या २८ दिवसांपासून मुंबईच्या ब्रीच कॅंडी रूग्णालयात लतातदीदींवर उपचार सुरू होते. लतादीदींना कोरोनाचा संसर्ग झाला होता. कोरोनावर मात केल्यानंतर त्यांची चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यानंतर लतादीदींवर न्यूमोनियावर उपचार सुरू होते. पण शनिवारपासूनच त्यांची प्रकृती अधिक खालावत गेली. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. पण आज रविवारी सकाळी ८.१२ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचे निधन झाल्याची माहिती ब्रीच कॅंडी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिली.

केंद्रीय गृह सह सचिव आर के सिंह यांनी एका वायरलेस मॅसेजच्या माध्यमातून दोन दिवसांच्या राष्ट्रीय दुखवट्याची माहिती जाहीर केली आहे. दोन दिवसांच्या राष्ट्रीय दुखवट्याच्या कालावधीत राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येणार असल्याचेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे. याबाबतची माहिती त्यांनी सर्व राज्यांना दिली आहे. तसेच शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, असाही उल्लेख त्यांनी आपल्या पत्रात केला आहे.

- Advertisement -

लतादीदींच्या निधनानं मोठी पोकळी निर्माण झालीय. मी शब्दात भावना मांडू शकत नाही, असं ट्विट नरेंद्र मोदी यांनी केलंय. लतादीदींचे निधन हे अतिशय दुःखद असून जगभरातील लाखो चाहत्यांसाठी ही वेदनादायी अशी बातमी आहे. त्यांचे योगदान हे नेहमीच अतुलनीय राहील अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. तर लतादीदींचे संगीतासाठीचे योगदान हे शब्दांमध्ये मांडता येणार नाही, असे ट्विट देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे.

स्वरसम्राज्ञी लतादिदी आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत. अनादि आनंदघन म्हणून त्या स्वर अंबरातून आपल्यावर स्वरअमृत शिंपीत राहतील, अशा शोकमग्न भावनांसह मुख्यमंत्र्यांनी लतादिदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.


Lata Mangeshkar Passes Away: ज्येष्ठ गायिका लतादीदी काळाच्या पडद्याआड; ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -