नाशिक : एकेकाळी दिवाळी अंकाशिवाय सणाची मजा येतच नव्हती. पण काळ बदलला तसे वाचनाचे माध्यम बदलले. पुस्तकांची जागा गुगलने आणि विनोदी दिवाळी अंकांची जागा व्हॉटस अॅपच्या विनोदांनी घेतली. भलामोठा लेख वाचण्यापेक्षा चार ओळीतील निखळ मनोरंजन करणारे व्हॉटस अॅप संदेश वाचले तरी आनंद वाटतो, अशी भावना अनेकांची आहे. हीच भावना ‘कॅश’ करीत यंदा दिवाळीचे काही स्पेशल संदेश पाठवण्यात आलेत.. त्यातील निवडक संदेशांची ‘आपलं महानगर’च्या वाचकांना खास दिवाळीनिमित्त भेट…
- दिवाळीच्या सुटी आधीच्या परीक्षा बघता त्यावरही काही संदेश व्हायरल झाले. एका संदेशात म्हटले होते की,
दिवाळी येतेय म्हणून आनंदी आणि परीक्षा येतेय म्हणून दु:खी कधीच झालो नाही
कारण..
दोन्ही ठिकाणी दिवेच तर लावायचे होते.. आणि आम्ही ते भरपूर लावले.. - या संदेशानंतर दिवाळीच्या तयारीवरही काही संदेश झळकले. त्यात म्हटले होते की,
या आठवड्यात तुमच्या राशीभविष्यात जर असे लिहिले असेल की, लवकरच नवीन उंची गाठण्याचा योग आहे..
तर त्याचा खरा अर्थ इतकाच आहे की,
तुम्हाला स्टुलावर चढून घरचे पंखे पुसण्याचा आणि जळमटे काढण्याचा योग आहे ! - दिवाळीच्या काही दिवस आधी पाऊस पडत होता. त्यामुळे फटाकेशौकीनांना दिवाळीची चिंता लागून होती. त्यातूनच मग ‘दिवाळीला कपडे घ्यायचे की रेनकोट’ किंवा ‘वॉटर प्रुफ’ फटाके कोठे मिळतील? या संदेशांचा जन्म झाला. ‘लहाणपणी आम्ही दिवाळीत पाऊस लावायचो आता पाऊस आमच्या दिवाळीची लावतोय’ अशा नर्म विनोदांची ‘बरसात’ दिवाळीपूर्वी चालू होती.
- ‘यापुढे वेधशाळा पावसाऐवजी उन्हाचा अंदाज पाठवेल असं वाटतंय
येत्या काही दिवसात मध्यम ते तुरळक स्वरुपाचे ऊन पडेल..’
पावसाच्या अवेळी येण्याने वेधशाळेलाही कार्यपद्धती कशी बदलावी लागेल याचे मार्मिक वर्णन या विनोदात वाचायला मिळाले. - याच वेळी पुणेकराच्या प्रश्नाला नाशिककराने दिलेले उत्तरही चांगलेच व्हायरल झाले..
‘आम्ही पुण्यात राहतो की पाण्यात तेच कळेनासे झालेय: पुणेकर
लोकांना पाण्यात पाहण्याचा परिणाम -नाशिककर - पुणेरी पाट्या या देखील राज्यभरातील विनोदविरांचा आवडता विषय. पाऊस आणि दिवाळी असे समीकरण यंदा जुळत आल्याने त्यावर पुणेरी पाटी कशी असेल यावरील विनोद यंदा व्हायरल झाला.
दिवाळी स्पेशल ऑफर रेनकोटला पैठणीची काठ लाऊन मिळेल – तुळीबाग, पुणे.. - पुण्यातील लोकांच्या स्वभावावर आणखी एका संदेशाने चांगलाच हास्यकल्लोळ उडवला. त्या संदेशात म्हटले होते की,
पुण्यातील लोक ‘या फराळ करायला’ असं म्हणतात
तेव्हा भीतीच वाटते की, नेमकं कशाला बोलवताहेत.. खायला की तयार करायला..?? - उठा उठा दिवाळी आली, मोती साबणाची वेळ झाली.. ही गाजलेली जाहिरात ज्या साबणाची आहे त्यावर देखील यंदा संदेश व्हायरल झाले. एका संदेशात म्हटले होते की,
सर्वात कमी दिवस काम करुन वर्षभराचे पैसे कमवण्याचे कर्तव्य भारतात फक्त दोनच गोष्टींकडे आहे..
फाल्गुनी पाठक आणि मोती साबण ! - घराघरांतील डब्यांमध्ये चकल्या, शेव, चिवड्याने जागा बळकवल्यावर चकण्यात खाल्ल्या जाणार्या शेंगदाण्याला काय वाटत असेल याचे वर्णन देखील कुणा महाभागाने यंदाच्या दिवाळीत केले.. संदेश असा होता-
सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा
काही दिवसांचा ब्रेक घेतोय, माझी आठवण काढत जा
भेटू थोड्याशा विश्रांतीनंतर - तुमचे खारे शेंगदाणे..
आता चकण्याचेच मनोगत वाचण्यात आले तर दारुड्याचे मनोगत कसे सुटले बरं? तर एका महाभागाने दारु पिणारे आणि न पिणार्यांमधील साम्य चक्क विशद केले.
दारु पिणारे अन् दारु न पिणारे यांच्यात एक समान गोष्ट आहे..
दोघेपण एकमेकांना फालतू समजतात.. - लक्ष्मीपूजनात जेव्हा नोटांचे बंडल रबरला लावून ठेवले जातात त्यानंतर अचानक ते गायब होतात, त्यावेळचा नवरा-बायकोमधील संवाद देखील यंदा चांगलाच गाजला.
नवरा- अगं लक्ष्मीपूजनावेळी मी ५०० रुपयांचे बंडल ठेवले होते. लाल रंगाचे रबर होते बघ त्यावर&
बायको- (रबर हातात देत) हे घ्या ! जीव चाललाय त्या रबरासाठी ! - एकीकडे विदोनी संदेशांनी हास्याची आतषबाजी सुरु होती, तर दुसरीकडे दिवाळीचा माहोल तयार करणारे धीर गंभीर संदेशही भाव खावून जात होते.. दिवाळीच्या फराळाचे वर्णन एका संदेशात मजेशीरपणे करण्यात आले. त्यात म्हटले,
‘मित्रांचा ग्रुप हा फराळासारखाच असतो, कोणी लाडवासारखा गोड,
तर कोणी चकलीसारखा काटेरी तीखट, कोणी कडबोळी सारखा खुमासदार!
कोणी चिवड्यासारखा चटकदार तर कोणी शेवे सारखा तिखट !
जसा जिभेला चव आणणारा हा फराळ तसेच सगळे मित्र आयुष्याला चव आणतात..
असे हे सगळे मित्र सोबत आहेत हेच तर खरं मैत्रीचे सारं आहे!!
आपल्या स्वभावानुसार व प्रकृतीनुरूप फराळ खा व आनंदी रहा!!’
या संदेशाप्रमाणेच यंदाच्या दिवाळीत रिक्षावाल्याचे मनोगत देखील भावूक करणारे होते. यात म्हटले होते की,
रिक्षाची चाके हीच आमची चकली, प्रवाशांसाठी धावतांना ती कधी नाही थकली..
रिक्षाचा आरसा हाच आमचा अनारसा, प्रवाशांचा आम्हावर खूप भरवसा..
रिक्षाचे हेडलाईट हेच आमचे दिवे, प्रवासात तेच योग्य रस्ता दावे..
प्रवाशांसाठी झटतो आम्ही वेळी अवेळी,
प्रवाशांची सेवा हीच आमची दिवाळी..!
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -