प्रतापगढी यांना उमेदवारीने काँग्रेसमध्ये नाराजी

State Election Commission rejects Congress' objection to voting

महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसमधील नाराजी उफाळून आली आहे. काँग्रेसमधील इच्छुक उमेदवार आणि अभिनेत्री नगमा हिने व्टिट करून नाराजीला वाट करून दिली आहे. प्रतापगढी यांना उमेदवारी दिल्यामुळे दिल्लीतील काँग्रेस नेत्यांपासून मुंबईतील काँग्रेस नेत्यांमध्येही नाराजी पसरली आहे. या नाराजीचा फटका काँग्रेसला मुंबई महापालिका निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.

राज्यसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेसच्या दिल्लीतील काही ज्येष्ठ नेते तसेच माजी खासदार मिलिंद देवरा यांच्यासह मुंबईतील काही नेते इच्छुक होते. अभिनेत्री नगमाही स्पर्धेत होती. सुमारे अठरा वर्षांपूर्वी नगमा हिने मिलिंद देवरा यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मिलिंद देवरा हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वर्तुळातील म्हणून ओळखले जातात. त्यामुळे इतर अभिनेत्रींप्रमाणे आपल्यालाही राज्यसभेची उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा बाळगून नगमाने काँग्रेसचा झेंडा खाद्यांवर घेतला होता. पण राज्यसभेच्या आशेवर असलेल्या नगमला हिच्या नावाचा आताही काँग्रेस नेतृत्वाने विचार केला नाही. त्यामुळे नगमाने व्टिटच्या माध्यमातून नाराजीला वाट करून दिली आहे.

मी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यावर पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी २००३-२००४मध्ये राज्यसभेची उमेदवारी देण्याचे मला व्यक्तीशः आश्वासन दिले होते. पण तेव्हा काँग्रेस सत्तेत नव्हती. पण त्यानंतर अठरा वर्षांचा काळ उलटून गेला. आता प्रतापगढींना राज्यसभेची उमेदवारी दिली. या उमेदवारीसाठी मी कमी योग्यतेची होते का ?असा सवाल नगमाने व्टिटव्दारे केला आहे.

पराभूत उमेदवाराचे पुनर्वसन –

इम्रान प्रतापगढी यांनी २०१९मध्ये मुरादाबाद लोकसभा मतदासंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. पण त्यांचा दणकून पराभव झाला. त्यांना फक्त ५९ हजार १९८ मत मिळाली आणि ते तिस-या क्रमांकावर फेकले गेले होते. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे निकवर्तीय म्हणून त्यांची काँग्रेसच्या वर्तुळात ओळख आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव झाला तरी जून २०२१मध्ये प्रतापगढी यांची अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. आता महाराष्ट्रातून त्यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

काँग्रेस नेत्यांचा निर्णय अंतिम –

मुंबईच्या कोणाला उमेदवारी दिली असली तर पालिका निवडणुकीत काँग्रेसला निश्चित फायदा झाला असता. पण काँग्रेसच्या नेत्यांनी एकदा निर्णय घेतल्यावर त्यावर भाष्य करणे योग्य नाही. आमच्या नेत्यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम असतो. प्रतापगढी यांना पूर्ण ताकदीने मदत केली जाईल, असे मुंबई कॉंगेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी स्पष्ट केले.