जाणून घ्या नाशिकमधील वैशिष्टपूर्ण राम मंदिरे

Kalaram Mandir Nashik

गोदावरी तिरावर वसलेले नाशिक हे चारही युगात प्रसिद्ध आहे. भगवान शिव आणि विष्णू यांचे या स्थळी वास्तव्य होते. त्यामुळेच यास हरिहर क्षेत्रही संबोधले गेले. प्रभू श्रीरामाच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या आणि यच्चयावत हिंदूंचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभव असलेल्या नाशिकमध्ये वैशिष्टपूर्ण राममंदिरे आहेत. कोरोनामुळे ही मंदिरे बंद आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील राममंदिरांची माहिती खास ‘आपलं महानगर’च्या वाचकांसाठी…

काळाराम मंदिराचा इतिहास

पूर्वी काळाराम मंदिराच्या ठिकाणी अरण्य होते. सध्या जेथे श्री काळाराम मंदिर आहे, त्या मंदिराच्या ठिकाणी श्रीरामांची ‘पर्णकुटी’ होती. श्रीराम सव्वा दोन वर्षे पंचवटीत वास्तव्याला होते. या स्थानाला वैष्णवांच्या दृष्टीने फार महत्त्व आहे. ओढा नाशिकरोड येथील जहागिरी असलेले पेशव्यांचे सरदार रंगनाथ ओढेकर यांना माधवराव पेशव्यांच्या मातोश्री गोपिकाबाई यांनी मंदिराचे बांधकाम करण्याची आज्ञा केली आणि याच काळात ओढेकर यांना प्रभु श्रीरामाचा ‘तुम्ही मंदिराचा जीर्णोद्धार करावा’ असा स्वप्नदृष्टांत झाल्याचे बोलले जाते.

मंदिराचे दगडी बांधकाम

काळाराम मंदिर असलेल्या ठिकाणी पूर्वी लाकडी मंदिर होते. समर्थ रामदासस्वामींनी याच मंदिरात श्रीरामाची उपासना केली होती. मंदिरातील मूर्ती काही शतकांपूर्वी नाशिकमधील गोदावरी नदीच्या ‘रामकुंडा’त मिळालेल्या आहेत. या मूर्ती वालुकामय आहेत. मंदिराच्या बांधकामासाठी नाशिकपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘रामशेज’ नावाच्या डोंगरावरून दगड आणण्यात आले. या डोंगरावर श्रीराम रात्री निद्रा करण्यासाठी जात असत. या डोंगरावरील दगड काढल्यानंतर दूध आणि नवसागर टाकून उकळून त्याची परीक्षा केली गेली. पूर्ण बांधकामासाठी सिमेंट अथवा पाण्याचा वापर झालेला नाही. बांधकाम या दगडांपासून झाले आहे. १७७८ ते १७९० या कालखंडात मंदिर पूर्ण झाले. त्यावेळेस या मंदिराच्या बांधकामाला २३ लाख खर्च आला.

वास्तूशास्त्राचा उत्तम नमुना

काळाराम मंदिर हे हेमाडपंथी वास्तूशास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखले जाते. मंदिराचा एकूण परिसर २६६ फूट लांब आणि १३८ फूट रुंद असून मंदिरास चारही दिशांना असलेली प्रवेशद्वारे हे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष याचे प्रतीक आहेत. आतील मंदिरास तीन दरवाजे आहेत. ते सत्त्व, रज आणि तम प्रवृत्तीची प्रतिके आहेत. मंदिराच्या भोवताली मोकळी जागा आणि यात्रेकरूंसाठी (१०० कमानी असलेल्या) ओवर्‍या आहेत. बाहेरच्या ओवर्‍यांना ८४ आर्च आहेत. ८४ लक्ष योनीनंतर मनुष्य जन्म प्राप्त होतो. याचे प्रतीक म्हणून ८४ आर्च आहेत. ४० खांबांवर भव्य सभामंडप उभा आहे. मंदिरावर सोन्याचा कळस असून त्या कळसासाठी पैसे अल्प पडल्याने शेवटी सरदार रंगनाथ ओढेकरांच्या पत्नीने तिच्या नाकातली ‘नथ’ दिली होती.

सूर्याची किरणे प्रभूंच्या चरणावर

उत्तरायण आणि दक्षिणायन काळात सूर्याची किरणे प्रत्यक्ष रामरायाच्या चरणांवर पडतात. गर्भगृहातील राममूर्ती आणि सभामंडपातील मारुतीची मूर्ती यांचे ‘नेत्रोमिलन’ होते. मंदिराच्या चारही दरवाज्याच्या बाहेरील बाजूस मारुति मंदिरे आहेत.

विशिष्ट भाव प्रगट करणार्‍या मूर्ती

काळाराम मंदिरातील राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती काळ्या रंगाच्या आहेत. श्रीराम आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती विशिष्ट भाव प्रगट करतात. श्रीरामाचा उजवा हात हा छातीवर असून डावा हात हा पायाकडे दर्शविलेला आहे. श्रीरामाने स्वीकारलेल्या मार्गाचे अवलंबन केले, तर त्या भाविकास ‘ब्रह्मानंद’ प्राप्त होतो असे म्हटले जाते. संतश्रेष्ठ चक्रधरस्वामी, समर्थ रामदासस्वामी, गोंदवलेकर महाराज आदी महापुरुषांनी याच श्री काळारामाची उपासना केल्याच्या इतिहासात नोंदी आहेत.

कोदंडधारी श्रीराम

भोसला मिलिटरी स्कूलच्या आवारात कोदंडधारी श्रीरामाचे सुंदर मंदिर आहे. या मंदिरात तरुण कोदंडधारी श्रीरामाची मूर्ती स्थापित केलेली आहे. देशात अशा प्रकारची ही एकमेव मूर्ती असल्याचे सांगितले जाते, कारण मंदिरामध्ये फ़क्त रामाचीच मूर्ती स्थापन करु नये असा दंडक आहे. या मूर्तीचे वैशिष्ट्य असे कि, येथील भोसला मिलिटरी स्कुलमध्ये प्रशिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी उडविलेल्या बंदुकीच्या गोळ्यांच्या रिकाम्या काडतूसाच्या धातुतून ही मुर्ती बनवली असल्याने तिची चकाकी कायम असते व मुर्तीवरही रासायनिक प्रक्रिया वा इतर परिणाम होत नाही. मूर्ती ख्यातनाम शिल्पकार सदाशिव साठे यांनी बनवली आहे.

गोराराम मंदिर

प्राचिन कपालेश्वर मंदिराच्या दक्षिण दरवाजाच्या अगदी जवळच सुमारे २००वर्षांहून अतिप्राचीन गोराराम मंदीर आहे. यामंदिराची निर्मिती पेशवेकालीन सरदार मुठे यांनी केली. अतिशय सुबक सागवाणी बांधणीचा नमुना म्हणजे गोराराम मंदिर होय. विषेश म्हणजे सरदार मुठे यांनी निर्माण केलेल्या मंदिरात अद्यापही कोणताही बदल न केल्यामुळे पूर्वजांचा हा ठेवा अजुनही जतन करुन ठेवला आहे. सरदार मुठे यांचे कार्य कर्तव्य चांगले असल्यामुळे त्यांना पेशवांनी सरदारकी बहाल केली होती. या वेळी झालेल्या घनघोर युद्धात मुठे घराण्यातील बहुतांशी सरदार धारातिर्थी पडले होते. येणार्‍या पिढीला त्यांचे स्मरण कायम रहावे यासाठी कपालेश्वर मंदिराच्या उत्तर दरवाजानजीक पवित्र रामकुंडावर या मंदिराची निर्मिती करण्यात आली. सरदार मुठे यांचे देवघर आजही याठिकाणीच आहे. या ठिकाणी पांढर्‍या शुभ्र संगमरवरी पाषाणात भगवान श्रीराम लक्ष्मण सिता आणि हनुमतंरायाची मुर्ती आहेत. तसेच मंदिरात लक्ष्मीनारायणाची मूर्ती देखिल आहे.

सीता गुंफा

ज्यावेळी प्रभुश्रीरामाला बारा वर्षांचा वनवास झाला त्यावेळी प्रभू श्रीराम हे आयोद्ध्येतून वनवासाला निघाले. दर कोस दर मजल चालत श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण हे नाशिकला म्हणजेच दंडकारण्यात आले. यावेळी त्यांना दररोज राक्षसांशी सामना करावा लागत असे. याच कालावधीत जेव्हा लक्ष्मणने शुर्पणखाचे नाक कापले तेव्हा भगवान राम आणि लक्ष्मण यांच्याशी लढायला १०हजार राक्षस आले.होते.. त्यावेळी पंचवटी एक घनदाट जंगल होते. म्हणून रामाने सिता आणि लक्ष्मण लपविण्यासाठी एका रात्रीत ही गुहा तयार केली गेली. आणि या गुफेत सितामाईला सुरक्षित ठेवण्यात आले होते याच गुहेत दोन छोटी मोकळी जागा वा खोल्या आहेत. प्रथम येथे भगवान राम, लक्ष्मण आणि माँ सीतेच्या मूर्ती आहेत. पुढील शेजारी शिवलिंग तेथे आहे त्याकाळी या भागात मोठे घनदाट आरण्य आसल्याने सितामाईला सुरक्षित ठेवलेले ठिकाण दिसुन यावे म्हणून या ठिकाणी भगवान श्रीरामाने पाच वडाची झाडे लावली असून या पाच वटवृक्षावरुन याभागाला पंचवटी असे नाव पडले.

अहिल्याराम मंदिर

पंचवटीतील अतिप्राचीन रामकुंडाच्या अगदी कडेला असलेले अहिल्या राम मंदिर हे शके सतराशे आठ मध्ये बांधून पूर्णत्वास आले या मंदिर बांधण्यासाठी सुमारे वीस वर्षाहुन अधिक कालावधी लागल्याची माहिती मिळते. अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराची स्थापना केली. यवनांच्या आक्रमणामध्ये नेहमी मंदिर उध्वस्त होत असल्याने वाडा संस्कृतीमध्ये मंदिर बांधण्याची पद्धत त्या काळामध्ये रुजु झालेली होत. त्या अनुसार मंदिराचे बांधकाम करण्यात आलेले आहे. प्रभू श्रीरामाच्या सीतामाईच्या लक्ष्मणाच्या गरुड – हनुमान आणि अहिल्यादेवी यांची संगमरवरी मूर्ती या ठिकाणी आहेत. नैमित्तिक पूजा पाठ मंदिराचे मालक क्षेमकल्याणी परिवार करत असतात.

म्हसरूळचे श्रीक्षेत्र सीता सरोवर-श्रीराम मंदिर : एक प्रेक्षणीय स्थळ

श्रीक्षेत्र आयोध्या नगरातून बाहेर तब्बल चौदा वर्षे वनवासात असताना प्रभू श्रीरामचंद्र यांच्या समवेत लक्ष्मण व सीतामाई यांनी सर्वाधिक काळ नाशिक-पंचवटी तपोवनात काढला असल्याची माहिती अयोध्या दप्तरी आहे. वनवासात नाशिक-पंचवटी-म्हसरूळ भागात दाटपणे वेगवेगळ्या प्रकारे झाडे होती. हवामान व वातावरण अतिशय चांगले होते. म्हणून या भागात सर्वाधिक काळ प्रभू श्रीराम-सीतामाई व लक्ष्मण यांनी वास्तव्य करून वनवास भोगला आहे. पंचवटी-तपोवण याठिकाणी श्रीराम-सीता गुफा असून लक्ष्मणाकडून शुर्पनखा हिचे नाक कापले ते स्थान आजही आहे. दरम्यान, प्रभू श्रीराम-सीतामाई व लक्ष्मण यांच्या पदस्पर्शाने-वास्तव्याने पावन असलेल्या श्रीक्षेत्र पंचवटी नगरीतील म्हसरूळ गावात म्हणजे त्याकाळी दाट जंगल भाग असलेल्या भागात प्रभू श्रीराम-सीतामाई व लक्ष्मण हे भर उन्हात पायपीट करीत असताना सीतामाईंना तहान लागली होती. सीतामाईंची तहान भागविण्यासाठी प्रभू श्रीराम व लक्ष्मण यांनी इतरत्र पाणी मिळविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु शोधूनही पाणी मिळाले नाही. म्हणून प्रभू श्रीरामचंद्रांनी तेव्हा उभे असलेल्या ठिकाणीच जमिनीवर जोरदार बाण मारला. त्यावेळी जमिनीतून पाण्याची धार वाहू लागली. यावेळी या पाण्याने सीतामाईंची तहान भागवली गेली, अशी कथा आहे. पूर्वीच्या दाट वन अरण्यात म्हणजे आजच्या म्हसरूळ गावातील हे ठिकाण सीता सरोवर म्हणून ओळखले जाते.

म्हसरूळ याठिकाणी प्रभू श्रीराम-सीतामाई व लक्ष्मण यांनी तब्बल सव्वा महिना मुक्काम केला. जमिनीवर मारलेल्या बाणाने उपलब्ध झालेले पाणी पुढे पिण्याबरोबरच वापरासाठीही श्रीराम-सीतामाई व लक्ष्मण यांनी उपयोगात आणले, अशी अख्यायिका आहे. आज श्रीक्षेत्र सीता सरोवर म्हणून ओळखले जात असलेल्या या पवित्र सरोवरात श्रीराम व सीतामाई असे दोन कुंड आहेत. पूर्वी ब्रिटिश सरकारच्या काळात वाहत्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी योग्य असल्याने ब्रिटिशांनी दगड बांधकाम करून कुंड सुशोभित केले व गोड, चवदार, स्वच्छ पाणी म्हणून काही वर्षे ब्रिटिशांनी व पुढे म्हसरूळ ग्रामस्थांनी सीता सरोवरातील पाण्याचा पिण्यासाठी वापर केला असल्याचे ज्येष्ठ तसेच आजही अनेक वडीलधार्‍यांकडून सांगितले जाते. विशेषतः पूर्वी म्हसरूळ गाव – सीता सरोवर याठिकाणी दरवर्षी पौष महिन्यात दर रविवारी मोठी यात्रा भरते.

म्हसरूळ ग्रामस्थांचे पुरातन श्रीक्षेत्र सीता सरोवर व ज्या ठिकाणी प्रभू श्रीराम-सीतामाई यांची कुटी होती, आज तेच ठिकाण पुरातन श्रीराम-सीतामाई व लक्ष्मण मंदिर असून हेही एक मुख्य श्रीराम मंदिर म्हणूनच ओळखले जात आहे. दरवर्षी सीता सरोवर- राम मंदिर येथे म्हसरूळ गाव भजनी मंडळ व श्रीराम भक्त परिवार आणि मंदिराचे प्रमुख पप्पूशेठ शर्मा परिवार यांच्या वतीने मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रम तसेच श्रीराम जन्मोत्सव साजरा केला जातो. याठिकाणी मुख्य नावाजलेले साधू-महंत यांनी भेट देऊन संत-महंत भोजनाचा लाभ घेतला आहे व आजही घेत आहेत. प्रामुख्याने आज म्हसरूळ ग्रामस्थांकडून सीता सरोवराची तर श्रीराम मंदिराची देखभाल शर्मा परिवाराकडून केली जाते. म्हसरूळचे पुरातन श्रीक्षेत्र सीता सरोवर सुशेभिकरणासाठी नाशिक महापालिकेचे सहकार्य मिळाले आहे. याशिवाय नुकतेच केंद्र सरकारने रामायण सर्किटमध्ये म्हसरूळ गाव-सीता सरोवरचा प्रेक्षणीय स्थळ म्हणून समावेश केला आहे. तर यापूर्वीच प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्या न्यास समितीने आपल्या दप्तरी नोंद केली आहे. त्याचा पुरावा म्हणून अयोध्या येथून संगमरवरीत श्रीराम यांच्या चरणपादूका सात वर्षे पूर्वीच म्हसरूळच्या पुरातन श्रीराम मंदिर येथे पाठविण्यात येऊन विधीवत पुजनाने प्रतिष्ठान करण्यात आले आहेत.

वाल्मिकी रामायण, अरण्यकांडमध्ये पंचवटीचे रंजक वर्णन

1 वनवासाच्या काळात श्रीराम, सीता आणि लक्ष्मण पंचवटी क्षेत्रात पर्णकुटी बनवून राहू लागले. पंचवटी नाशिकजवळ गोदावरीच्या काठावर आहे. लक्ष्मणने इथेच एक पर्णकुटी किंवा पर्णपाती बांधली होती. या ठिकाणी राम, सीता, लक्ष्मण झोपडी बनवून राहिले होते. इथूनच रावणाने माता सीतेचे हरण केले होते.
2 दंडकारण्यात मुनींच्या आश्रमात राहिल्यावर श्रीराम अगस्त्य मुनींच्या आश्रमात गेले. हे आश्रम देखील दंडकवनात होते. हे नाशिकच्या पंचवटी क्षेत्रात गोदावरीच्या काठी वसलेले आहे.
3 ह्याच ठिकाणी लक्ष्मणाने शूर्पणखाची नाक कापले होते. कदाचित म्हणून ह्या जागेला नंतर नाशिक म्हटले जाऊ लागले.
4 ह्याच ठिकाणी राम-लक्ष्मणाने खरं आणि दूषण सह युद्ध केले.
5 गिद्धराज जटायू आणि प्रभू श्रीरामाची मैत्री देखील इथेच झाली . पंचवटीला जाताना रामाला जटायू नावाचे गिधाड भेटले, जे राजा दशरथजींचे मित्र होते.
6 मारीच चे वधदेखील पंचवटीजवळ मृगव्याधेश्वर येथे झाले.
7 येथे श्रीरामाने बनविलेले एक मंदिर
आजदेखील भग्नावशेष रूपात आहेत.
8 पंचवटीमध्ये पांच वडाचे झाड आहे जे जवळपास आहे. या मुळे ह्याचे नाव पंचवटी देण्यात आले. नाशिकच्या पंचवटी क्षेत्रात सीता मातांच्या गुहेजवळ पाच प्राचीन झाडे आहेत ज्यांना पंचवटी नावाने ओळखतात. वनवासाच्या काळात राम,लक्ष्मण आणि सीताने काही काळ येथे घालवला. या झाडांचे धार्मिक
महत्त्वदेखील आहे.

संकलन : दिलीपराज सोनार