Tuesday, April 13, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी जाणून घ्या कोरोना लसीकरणाचे समज , गैरसमज

जाणून घ्या कोरोना लसीकरणाचे समज , गैरसमज

Related Story

- Advertisement -

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य व्यवस्थेकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात असले तरीही दिवसागणिक पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमालीची वाढत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूची साखळी आता तुटणे गरजेचे आहे. सध्या तरी कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण हा एकमेव प्रशस्त उपाय आपल्याकडे आहे. लस हीच संजीवनी ठरत असली तरी, लसीकरणाविषयी अनेकांच्या मनात शंका आहेत. लसीकरणाची गरज काय येथपासून तर लसीकरण झाल्यानंतर कोणती काळजी घ्यावी येथपर्यंत अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. ४० वर्षांपुढील नागरिकांना आता लस दिली जात असल्याने त्याविषयीची कुतुहलता अधिक वाढली आहे. या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी ‘आपलं महानगर’ने विविध वैद्यकीय तज्ज्ञांशी चर्चा करुन तयार केलेला हा स्पेशल रिपोर्ट…

लस का घ्यावी?
l कोरोनामुळे १०० लोकांमध्ये २ ते ४ मृत्यू होत आहेत. लसीकरणामुळे दुष्परिणाम झाला तरी तो लाखात एक इतके कमी प्रमाणात आहे आणि तो सुध्दा प्राणघातक असेल असे नाही. म्हणून आजार उद्भवण्यापेक्षा लसीकरण करणे जरूरी आहे.
लसीकरणाची कार्यक्षमता आहे का?
l सर्व मंजूर लसींमध्ये कोविडमुळे मृत्यूपासून बचाव करण्यासाठी उत्तम कार्यक्षमता आहे. गंभीर कोविडच्या विरुद्ध अत्यंत उच्च कार्यक्षमता व रोगप्रतिकारक क्षमता आहे.
लस सुरक्षित आहे का?
l सर्व लसी पूर्णपणे सुरक्षित आहेत.

- Advertisement -

कोणती लस घ्यावी?
l आता तरी सगळीकडे कोविशिल्ड-सिरम आणि कोवॅक्सिन या दोन लसी उपलब्ध आहेत. या दोन्ही लसी अतिशय उपयुक्त आहेत. त्यामुळे लसीकरण केंद्रात जी लस उपलब्ध आहे ती घ्यावी.
तिसर्‍या टप्प्यात कोणकोण लस घेऊ शकतो?
l ४० वर्षावरील प्रत्येक व्यक्ती

लस घेतल्यानंतर काय दुष्परिणाम होऊ शकतात?
l ताप, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ, उलटी, अशक्तपणा हे सर्वसामान्य दुष्परिणाम साधारणपणे दिसतात. ते एक ते दोन दिवस राहतात.

- Advertisement -

लस कशाप्रकारे काम करते?
l शरीरामध्ये अँटीबॉडीज निर्माण करून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम लस करते. बाहेरील एखादे प्रोटीन किंवा विषाणू किंवा बॅक्टेरिया यांच्या स्वरूपात अँटीजेन शरीरात आल्यावर शरीर आपल्या अँटीबॉडीजच्या साठ्याच्या मदतीने प्रतिकारक्षमता उभारते, आता या अँटीबॉडीज संसर्गाविरोधात लढण्यासाठी सज्ज झालेल्या असतात. रोगप्रतिकारशक्ती काही दिवस, आठवडे किंवा काही महिन्यांच्या कालावधीत विकसित केली जाते.

लसीने प्रतिकारशक्ती वाढते का?
l संपूर्ण समाजात एखाद्या आजाराविरोधात रोगप्रतिकारशक्ती निर्माण होणे ही एक महत्त्वाची सुरुवात आहे. आजाराची नैसर्गिक लागण होऊन किंवा लसीमार्फत हे घडून येते, ही सक्रिय रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाली की त्या समाजात आजाराचा प्रसार होणे थांबते. हे म्हणजे संसर्गाची शृंखला तोडण्यासारखेच आहे, यासाठी देशातील ६० टक्के ते ७० टक्के व्यक्तींनी लस घेतलेली असणे गरजेचे आहे.

लस घेतल्यानंतर मास्क, सॅनिटायझर वापरण्याची आवश्यकता असते का?
l भारतीय वातावरणात जेव्हा एखाद्या मनुष्याला लस दिली जाते तेव्हा त्यानंतर १३-१४ दिवसांनी त्याच्या शरीरात बी पेशी म्हणजे अँटीबॉडीज विकसित होण्यास सुरुवात होते पण त्या अद्यापही सुरक्षा पातळीपर्यंत पोहोचलेल्या नसतात. त्यानंतर कमीत कमी दोन ते तीन आठवडे अँटीबॉडीज निर्माण होत राहतात आणि मग सुरक्षा पातळीपर्यंत पोहोचतात. दुसरा डोस किंवा बूस्टर दिला जातो जो रोगप्रतिकारशक्तीला अधिक प्रोत्साहन देतो, आता फक्त बी पेशीच नव्हे तर टी पेशीदेखील निर्माण होऊ लागतात, ज्या दीर्घकालीन रोगप्रतिकारशक्तीसाठी खूप आवश्यक आहे. आजाराची नैसर्गिक लागण झालेल्या व्यक्तीच्या शरीरात अँटीबॉडी संरक्षण तीन महिन्यांपर्यंत टिकू शकते आणि टी पेशी आठ महिन्यांपर्यंत टिकू शकतात. परंतु, दीर्घकालीन दृष्टीने ही रोगप्रतिकारशक्ती पुरेशी नाही. लसीमुळे अधिक जास्त, अधिक प्रभावी, अचूक आणि दीर्घकाळपर्यंत टिकून राहील अशी रोगप्रतिकारशक्ती मिळते. लस घेतल्यानंतर व्यक्तीच्या शरीरात अँटीबॉडीज कित्येक महिने, अगदी वर्षभर देखील निर्माण होत राहतात. त्यामुळे लस जरी घेतलेली असली तरी संसर्ग शृंखला तोडण्यासाठी मास्क सतत वापरणे, योग्य प्रकारे सॅनिटायझेशन करणे या उपाययोजना करत राहणे गरजेचे आहे.

गर्भवती महिलांनी लस घ्यावी का?
l सध्या तरी घेऊ नये.
लस घ्यायला जाण्यापूर्वी काय तयारी करावी?
l लस घ्यायला शक्यतो भरल्यापोटी जावे. उपाशीपोटी जाऊ नये. लसीकरण सेंटरवर कमी जास्त वेळ लागू शकतो. त्यामुळे पाण्याची बाटली, कोरडा खाऊ, बिस्किटे, सरबत किंवा लिंबू सरबत घेऊन जावे. तसेच जाताना सोबत आपले आधारकार्ड व पॅनकार्ड घेऊन जावे
लस घेतल्यानंतर कोरोना १०० टक्के होणार नाही का?
l असे अजिबात नाही. पण मास्कचा वापर करणे, नेहमी हात धूत राहणे, सुरक्षित अंतर ठेवणे ही त्रिसूत्री नेहमी पाळायची आहे.
दुसरी लस किती कालावधीनंतर घ्यावी?
l पहिला डोस घेतला की ६ ते ८ आठवड्यानंतर लस घ्यावी.
कॅन्सर व इतर आजारांच्या रुग्णांनी लस घ्यावी का?
l नक्कीच. फक्त आधी आपल्या कॅन्सर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
लहान मुलांना लस द्यावी का?
l १६ वर्षाखालील मुलांना लस देऊ नये.
हृदयरोग, मूत्रपिंडाचा रोग, प्रत्यारोपण, संधिवात या रुग्णांसह स्टिरॉइड घेणार्‍यांनी लस घ्यावी का?
l नक्कीच घ्यावी. मुळात लोक याच लोकांसाठी बनली आहे. ज्यांना असे आजार आहेत. फक्त लस घेण्यासाठी योग्य तो कालावधी कोणता हे कळावे म्हणून वरील रुग्णांनी आपल्या डॉक्टरांच्या लसीकरण करावे.
अ‍ॅलर्जीक कोन्कायटीस (दमा) असलेल्या लोकांनी लस घ्यावी का?
l नक्कीच घेऊ शकतो. परंतु, अ‍ॅलर्जी खूप तीव्र असेल तर त्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
लस घेतल्यानंतर रोग प्रतिकारशक्ती कधी तयार होणार?
l पहिला डोस घेतल्यानंतर ४५ दिवसांनंतर रोग प्रतिकार शक्ती तयार होते. पण त्यासाठी लस ६ आठवड्यानंतर दुसरा डोस घेणे गरजेचे आहे.
कोविड होऊन गेल्यावर लस घ्यावी का?
l हो घ्यावी. कोविड नंतर बनणार्‍या प्रतिकार क्षमता कालांतराने नष्ट होतात. लसीने मिळणारी प्रतिकार क्षमता जास्त कालावधीपर्यंत असते.
नुकताच कोविड झाला असेल तर लस कधी घ्यावी?
l कोविड होऊन गेल्यावर ७ ते १२ आठवड्यांनी लस घ्यावी

आस्थमा, फुफ्फुसाचे आजारअसलेल्यांनी काय काळजी घ्यावी?
l आस्थमा व फुफ्फुसाचे आजार असणार्‍या रुग्णांनी डायक्लोफिनॅक इंजेक्शन किंवा गोळ्या घेतल्या तर श्वास घेण्यास त्रास होवून गुदमरुन मृत्यू होण्याची शक्यता असते. इंजेक्शन किंवा गोळ्या घेण्यापूर्वी अ‍ॅलर्जीची माहिती डॉक्टरांना द्यावी.
ताप आला तरच लस अंगी लागली असा समज आहे. याविषयी काय?
l हा गैरसमज आहे. प्रतिकारशक्तीवर ताप येणे व न येणे अवलंबून असते. अर्थात लसीकरणानंतर शरीरातील तापमान वाढणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. तिला दाबण्याचा प्रयत्न करु नये. प्लेन पॅरासिटॅमॉल गोळीने थंडी, ताप, अंगदुखी बरी होते, त्यामुळे ती लसीकरण केंद्रावर दिली जाते.

लस घेतल्यानंतर सेक्स करावा की नाही?
l काही तज्ज्ञांच्या मते, लस घेतलेल्या व्यक्तींनी किमान एक वर्ष तरी सेक्स करताना गर्भनिरोधक वापरायला हवेत. कोवॅक्सिन लसीला भारतात आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली आहे. पण या लसीचं सध्या तिसर्‍या टप्प्यातील क्लिनिक ट्रायल सुरू आहे. लसीच्या चाचणीत सहभागी असलेल्या व्यक्तींना सेक्स करताना किमान तीन महिने कंडोम वापरण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. कारण याचा भ्रूण किंवा प्रजनन क्षमतेवर दुष्परिणाम होऊ शकतो. आऊटलूकच्या वृत्तानुसार सेक्सोलॉजिस्ट डॉ. प्रकाश कोठारी म्हणाले, लशीचा गर्भावर काय परिणाम होईल हे आपल्याला माहिती नाही. पण जर क्लिनिकल ट्रायलमध्ये लस घेतल्यानंतर सेक्स करताना कंडोम वापरण्याची अट असेल तर तसा परिणाम होण्याची शक्यता असू शकते. याआधी काही औषधांचे नवजात बालकांवर दुष्परिणाम झाल्याचे दिसून आले आहेत. त्यामुळे किमान एक वर्ष तरी सेक्स करताना गर्भनिरोधक वापरावेत.

लस कोणी घेऊ नये?
l ज्या व्यक्तींना कोणत्याही औषधाने, अन्नपदार्थामुळे किंंवा लसीमुळे एलर्जीचा गंभीर (एनाफिलेक्सिसचा) त्रास होतो त्यांनी लस घेऊ नये
l ज्यांना वारंवार ताप येते किंवा ज्यांच्या रक्तामध्ये ताप उतरलेला असतो किंवा रक्त पातळ असण्याची समस्या असणार्‍या ंनी लस घेणे टाळावे
l इम्यूनोकॉम्प्रमाइज लोकांनी म्हणजेच रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम होणारी औषधं घेणार्‍यांनाही ‘लस’ घेऊ नये.
l जी महिला गरोदर आहे किंवा गरोदर होण्यासंदर्भातील विचार करत आहेत त्यांनी लस घेऊ नये.
l गरोदर महिलांनी, स्तनपान करणार्‍या महिलांनी लस घेऊ नये
l ज्या लोकांनी आधीच करोनाची दुसरी लस घेतली आहे त्यांनी लस घेऊ नये
l ज्या व्यक्तींना पहिल्या डोसमुळे एलर्जीचा त्रास झाला होता त्यांनी पुढचा डोस घेऊ नये
l पहिला डोस एका कंपनीचा आणि दुसरा डोस दुसर्‍या कंपनीचा असे करु नये. एकाच कंपनीचे दोन्ही डोस घ्यावेत
l मद्यपानानंतर तीन दिवस डोस घेऊ नये

लस घेण्यापूर्वी काय काळजी घ्यावी?
l उपाशीपोटी जाऊ नये. शक्यतो नाश्ता अथवा जेवण करुन जावे. कारण उपाशी पोटी इंजेक्शन घेतल्यास जास्त वेदना जाणवतात.
l जवळ पाण्याची बाटली ठेवावी. कारण उन्हाळा आहे. त्यामुळे शरीराला पाण्याची गरज असते.
l ज्यांना ऑस्पिरन सारखी रक्त पातळ करणारी औषधे आहेत, त्यांनी लसीकरणापूर्वी दोन दिवस आधी बंद ठेवावी. इतर आजाराची औषधे वेळेप्रमाणे घेऊ शकता.

लस घेतल्यानंतर काय काळजी घ्यावी?
l नेहमीच्या वेळेला जेवण आणि औषधे घ्यावीत
l तीन दिवस लांबचा प्रवास करणे टाळावे
l कोणताही त्रास जाणवल्यास, लक्षण आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत
l अन्य कोणत्याही प्रकारची लस लगेच घेऊ नये
l काही दिवस अंगदुखीचा समस्या येऊ शकते. त्यामुळे व्यायाम टाळावा
l शरीरात पाणी कमी पडू देऊ नये; त्यातून रोगप्रतिकारशक्ती वाढते
l काही दिवस शरीरावर टॅटू काढू नये; काढला तर रिअ‍ॅक्शन होऊ शकते

लसीकरणासाठी अशी करा नावनोंदणी
l नावनोंदणीसाठी www.cowin.gov.in यावर लॉगिन करा किंवा Cowin app वापरा
l रजिस्ट्रेशनवर क्लिक करुन मोबाईल क्रमांक टाका
l गेट ‘ओटीपी’वर क्लिक करा
l एसएमएसच्या माध्यमातून आलेला ओटीपी नंबर टाकून व्हेरिफाय करा
l ओटीपीची पडताळणी झाल्यानंतर तुमच्या स्क्रिनवर ‘रजिस्ट्रेशन ऑफ व्हॅक्सिनेशन’ पेज येईल
l वय आणि छायाचित्र असलेले ओळखपत्र निवडा
l जन्मवर्ष, लिंग, सहव्याधी असा सर्व तपशील नोंदणी करताना भरावा
l नोंदणी पूर्ण झाल्यावर त्याची सविस्तर माहिती दिसेल

- Advertisement -