सफाळ्यातून पहाटेची ट्रेन सोडा, चाकरमानी आणि शेतकऱ्यांची मागणी

safale station

सफाळे (जतिन कदम) – वैतरणा, सफाळे आणि पालघर परिसरातून मुंबई परिसरात होणारी दूध आणि शेतीमालाची निर्यात उशिराने होत आहे. सफाळे स्थानकातून रात्रीच्या काळात ट्रेन सुटत नसल्याने मुंबई परिसरात दूध आणि शेतीमालाची वाहतूक करणे कठीण झाले आहे. त्यामुळे पहाटे ३ वाजता डहाणू-चर्चगेट लोकल सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. याबाबत खासदार राजेंद्र गावीत यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.

कोविड पूर्व काळात विरमगाम एक्सप्रेस व लोकशक्ती एक्सप्रेसला वाणगाव, उमरोळी, केळवारोड, सफाळे, वैतरणा स्थानकात थांबा होता. त्यामुळे दूध आणि शेतीमाल वेळेत मुंबई पोहोचवला जात असे. तसेच पहिल्या शिफ्टमध्ये काम करणारे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व इतर ठिकाणी काम करणारे कर्मचारी वेळेत पोहोचत असत. मात्र, कोविड संसर्गानंतर या लांब पल्ल्यांच्या गाड्यांना स्थाकनांत थांबा देणे बंद करण्यात आले. तसंच, या काळात लोकल फेऱ्याही नसल्याने मुंबई पोहोचणे शेतकऱ्यांना कठीण जाले आहे.

रात्री ९.४५ मिनिटांनी डहाणू स्थानकातुन विरारसाठी शेवटची मेमू सोडण्यात येते. त्यानंतर ७ तासांनी पहाटे ४.४० मिनिटांनी डहाणू स्थानकातून चर्चगेटसाठी लोकल सोडण्यात येते. दरम्यानच्या वेळेत वाणगाव, उमरोळी, केळवारोड, सफाळे, वैतरणा या स्थानकांत एकही ट्रेनला थांबा नाही, त्यामुळे पहाटेच्या डहाणू-चर्चगेट लोकलला प्रचंड गर्दी होते.

लांब पल्ल्याच्या दोन्ही गाड्यांना सफाळे- वैतरणा येथे थांबा देणे शक्य नसल्यास पहाटे ३ वाजता डहाणू- चर्चगेट लोकल सुरू करण्यात यावी, असे लेखी निवेदन खासदार राजेंद्र गावीत यांना देण्यात आले आहे. तरी रेल्वे प्रशासन जाणीवपूर्वक प्रवाशांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहेत असे प्रवाशांचे म्हणणे आहे.