जिल्हा परिषद, पंचायत समितींची १३ जुलैला प्रभाग आरक्षण सोडत

राज्यातील २५ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या २८४ पंचायत समित्यांच्या आरक्षणाची सोडत १३ जुलै रोजी काढण्यात येणार आहे. सार्वत्रिक निवडणूकसाठी निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार याद्या १८ जुलै रोजी प्रसिद्ध होणार असून त्यावर २२ जुलैपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.

१३ जुलै रोजी जिल्हा परिषद प्रभागासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे तर पंचायत समिती प्रभागासाठी त्या-त्या तालुका तहसीलदार कार्यालय येथे आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी दिली आहे.

राज्य शासन इतर मागास वर्गाच्या आरक्षणासाठी जोपर्यंत त्रिस्तरीय चाचणी पूर्ण करत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता जागा राखून ठेवता येणार नाहीत, असे स्पष्टपणे आयोगाने या आदेशामध्ये नमूद केले आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या आरक्षणाची सोडत ही जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तर पंचायत समित्यांबाबत तालुक्याच्या मुख्यालयी संबंधित तहसीलदारांकडून आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.


हेही वाचा : खड्ड्यांमुळे जीवितहानी होणार नाही याची यंत्रणांनी दक्षता घ्यावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश